माजी आमदार कॉम्रेड आप्पासाहेब स.ना. भालेराव यांना विनम्र अभिवादन…!
![]()

माजी आमदार कॉम्रेड आप्पासाहेब स.ना. भालेराव यांना विनम्र अभिवादन…!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या पवित्र बोरी नदीकाठी आपल्या राजकीय जीवनाची प्रतिज्ञापूर्वक सुरुवात करणाऱ्या स. ना. भालेराव यांना आम्ही संपूर्ण खानदेशवासी मानाचा मुजरा करून विनम्रपणे लाल सलाम करतो. जळगावचे माजी आमदार, जळगाव पालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्यसैनिक, कष्टकरी, शेतमजूर दलित, आदिवासी यांचे श्रद्धास्थान हजारो गिरणी कामगारांचे नेते व विशेष म्हणजे परमपूज्य साने गुरुजींचे एक धडपडणारे विद्यार्थी म्हणून स. ना. भालेराव ओळखले जात होते. मातृहृदयी प. पू. सानेगुरुजी त्यांना प्रेमाने ‘सदू’ म्हणत असत. कै. सदाशिवरावांनी स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेतला होता. त्यांनी गोवा मुक्तिसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन उल्लेखनीय कार्य केलेले होते. माजी खासदार राजाभाऊ कुलकर्णी, गोदी कामगारांचे नेते कै. एस आर कुलकर्णी. माजी प्राचार्य डॉ. ग. ना. जोशी, माजी आमदार प्रकाशभाई मोहाडीकर व त्यांचे बंधुराज माजी आमदार रामभाऊ मोहाडीकर, स्वातंत्र्य सैनिक कॅप्टन मल्हारी रावजी चिकाटे, कॉम्रेड विश्राम पाटील, कॉम्रेड पुना झगा मराठे (स्वातंत्र्यसैनिक) ही सर्वच मान्यवर मंडळी आप्पासाहेबांची समवयस्कर नेते मंडळी होती. विशेष म्हणजे ही मंडळी प.पू. साने गुरुजींना आदरस्थानी मानणारी होती. प. पू. साने गुरुजींनी संयुक्त खानदेशात शेकडोंनी स्वातंत्र्य सैनिकाची निर्मिती केली होती. साने गुरुजी अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्या ऐतिहासिक प्रताप हायस्कूलने महाराष्ट्राला खोऱ्याने स्वातंत्र्य सैनिक दिलेले होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्या शाळेला लाल शेरा मारून ‘मोस्ट डेंजरस झोन’मध्ये ठेवले होते. आप्पासाहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमळनेरला झाले होते. आप्पासाहेब स्वतः विचारांनी कम्युनिस्ट असून त्यांनी दिनांक 27, 28, 29 डिसेंबर 1936 साली झालेल्या ऐतिहासिक फैजपूर काँग्रेसच्या महाअधिवेशनात प. पू. साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कार्य केलेले आहे हे विशेष.
कॉम्रेड स. ना. भालेरावांचा जन्म दिनांक 4 डिसेंबर 1916 रोजी जळगाव कानळदे येथे झाला होता. कानळदे येथे दुसरीपर्यंत शिक्षण व त्यानंतर मोठ्या भावासोबत अमळनेरला आगमन झाले आणि तिथेच त्यांचे उर्वरित प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण प्रताप हायस्कूलला झाले. त्यावेळी त्यांच्या आयुष्यात प.पू. सानेगुरुजी आले आणि तिथूनच त्यांची खऱ्या अर्थाने राजकीय सुरुवात झाली. सन 1935 साली मॅट्रिकची परीक्षा पास, जुलै 1932 मध्ये सर फेडरिक साईक्स गो बॅक या सत्याग्रहात सहभाग व राष्ट्रीय स्वतंत्र चळवळीत भाग घेतल्यामुळे पन्नास रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा तसेच सन 1935 व 1936 मध्ये परम पूज्य साने गुरुजींचा सहवास व सोन्या मारुती, श्यामची आई व पत्रि काव्यसंग्रहाच्या प्रकाशनात सक्रिय सहभाग नोंदविला. डिसेंबर 1936 मध्ये फैजपुर काँग्रेस महाअधिवेशनात बहुमूल्य कामगिरी व किसान मोर्चात सक्रिय सहभाग घेतला. सन 1937 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सभासद झाले. त्यानंतर दोन वर्षे अमळनेरच्या प्रताप हायस्कूलला शिक्षक म्हणून नोकरी केली. सन 1940 साली पुण्यात एम ए उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. सन 1942 साली त्यांनी अमळनेर गिरणी कामगार युनियनचा विस्तार करून सोळा वार्डात कमिट्याची स्थापना केली. सन 1942 सालापासून जळगाव जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाची पायाभरणी केली सन 1943 साली राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यात उडी घेऊन त्यांच्यावर स्वातंत्र्यलढ्याबाबत पत्र व प्रेस ऍक्ट खाली राजगृहाचा खटला दाखल झाला. सन 1944 मध्ये महाराष्ट्रात पुरोगामी मित्रमंडळाची स्थापना केली. सन 1946 साली गुंडा कायद्याविरुद्ध कामगारांचा संप केला व 27 ऑगस्ट 1946 साली खानदेश मिल संपाबाबत 21 दिवसांची शिक्षा झाली. सप्टेंबर 1946 ते डिसेंबर 1946 तुरुंगात असताना हद्दपारीचा खटला दाखल होऊन मुंबई राज्याच्या बाहेर बेमुदत हद्दपार करण्यात आले. हद्दपार झालेले असतानाही आईच्या मृत्यूची बातमी कळली आणि कलेक्टरने येण्याची परवानगी नाकारलेली असतानाही हद्दपारीचा हुकूम तोडून जळगावला अंत्यविधीला हजर झाले होते. सन 1947 साली हद्दपार असताना मध्यप्रदेशातील इंदोर येथे पक्ष कार्यास सुरुवात केली. त्या वेळचे इंदूर संस्थान भारतात विलीन झालेच पाहिजे व त्या ठिकाणी लोकनियुक्त मंत्रिमंडळ आले पाहिजे यासाठी महू येथील परिषदेत सहभाग घेऊन इंदोरच्या होळकरांच्या राजवाड्यावर मोर्चा नेला. याप्रकरणी लाठीमार व धरपकड झाली त्या दरम्यान पोलिसांचा ससेमीरा चुकवून पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने त्यांना स्पायनल कॉर्डचे फ्रॅक्चर झाले. सहा महिने अर्धा शरीरावर प्लास्टर असताना पोलिसांची नजर चुकवून इंदोरहून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आगमन केले व तेथेहि पक्ष संघटना उभारून पक्ष कार्यास सुरुवात केली. सन 1952 साली पुन्हा एकदा त्यांचे जळगाव येथे आगमन झाले. जळगाव आल्यानंतर पक्ष संघटना बांधणीची जबाबदारी स्वीकारून मजबूत पक्ष बांधणी केली. त्यामुळे त्यांचेवर पक्षाने महाराष्ट्र कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी सोपविली. त्यावेळी त्यांनी जळगावच्या गेंदालाल मिलचा टाळे तोडीसाठी विराट सत्याग्रह केलेला होता. त्यावेळी ते गोवा मुक्ती संग्रामचे जिल्हा सेक्रेटरी व संयुक्त महाराष्ट्र चळवळ समितीचेही जिल्हा सेक्रेटरी होते.
कॉम्रेड अप्पासाहेब सदाशिवराव नारायणराव भालेराव हे सतत दहा वर्ष सन 1952 ते 1962 जळगाव विधानसभा मतदार संघात कम्युनिस्ट पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून आले होते. या दहा वर्षाच्या त्यांच्या आमदारकीच्या दरम्यान त्यांनी शेतकरी शेतमजूर कष्टकरी आदिवासी यांच्यासाठीच कार्य केलेले होते. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठीच वेचले.
कै. सदुभाऊ भालेराव यांच्या आयुष्यात दिनांक 6 मार्च 1959 रोजी इंदुताई आल्यात आणि ते त्या दिवशी विवाहबद्ध झाले. पूर्वाश्रमीच्या कुमारी इंदुमती दादासाहेब पाठक या सौ इंदुमती भालेराव झाल्यात. सन 2013 साली इंदुताईंनीही या जगाचा निरोप घेतलेला आहे. इंदुताई व्यवसायाने प्राथमिक शिक्षिका होत्या. आप्पासाहेबांच्या अनेकजण आंदोलनात त्या सक्रिय सहभागी असायच्या जगाच्या पाठीवर जनसामान्यासाठी संघर्ष करणारे भालेराव सारखे दांपत्य दुर्मिळच असते. दिनांक 17 मार्च 2000 रोजी या कर्मयोगांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आजही ते वीस वर्षानंतर त्यांचे नाव संयुक्त खानदेशात अत्यंत आदरपूर्वक घेतले जात आहे. भालेराव दाम्पत्यांना दोन्हीही मुली झाल्यात त्या दोन्हीही मुली आज जळगावात आपले वास्तव्य करून आहेत. मोठी मुलगी तेजोमयी भालेराव व लहान मुलगी आनंदमयी भालेराव. तेजोमयी या पीएच. डी. मायक्रोबायोलॉजी झालेल्या असून त्या सायंटिस्ट म्हणून कार्य करीत आहे. तर आनंदमयी एम. ए. मराठी झाल्यात. दोन्हीही मुली नशीब काढून आलेले आहेत. एवढे भाग्यशाली माता-पिता मिळणे हे मात्र नियतीला मंजूर होते. वाघाच्या पोटी छाव्या जन्माला आल्या.
कॉम्रेड आप्पासाहेब भालेराव यांनी आमदार असताना सन 1962 साली महाराष्ट्र शेतमजूर संघटनेची स्थापना करून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतमजुरांच्या हितासाठी जनआंदोलने केली होती. तसेच पोलंड येथे भरलेल्या विसाव्या विश्व कामगार परिषदेला पोलंड येथे जाऊन भारतीय कामगार संघटनेचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी त्यांनी पोलंड आणि रशियाचा दौरा केला होता. या कामगार विश्वव्यापी परिषदेमध्ये त्यांनी एक वेगळा ठसा उमटविला होता. सन 1969 साली त्यांनी त्या वेळेचे मंत्री पारवेकर यांच्या इजातदारी जमिनीवर सत्याग्रह केल्यामुळे त्यांना एक महिन्याची शिक्षा झाली होती. त्याच काळात त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविले होते. सन 1970 साली जळगाव शहरात जातीय दंगल झाली होती त्या दंगलीची सुरुवात शनिपेठ व कोळीवाड्यातून झालेली होती. त्या दंगलीत अनेक जण जखमी व मृत्युमुखी पडलेले होते त्यावेळी आप्पासाहेबांनी थेट दिल्ली येथे जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार वसंतरावजी नाईकांच्या राजीनाम्याची बेधडक मागणी पंतप्रधान इंदिराजी गांधींकडे केलेली होती. त्याचप्रमाणे सन 1971 साली आप्पांनी 15000 आदिवासी व शेतमजुरांचा जळगावला विराट मोर्चा काढला होता. या मोर्चाची दखल सरकारला घ्यावीच लागली.
दिनांक 16 नोव्हेंबर 1974 हा दिवस आप्पासाहेबांच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस होता या दिवशी जळगावकरांनी भरघोस मतांनी आप्पांची जळगावच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड केलेली होती. त्यांचा नगराध्यक्षपदाचा कालावधी हा दिनांक 16 नोव्हेंबर 1974 ते 5 फेब्रुवारी 1981 असा होता त्या काळातही त्यांनी तीन महिने नगराध्यक्ष पदाची रजा घेऊन महाराष्ट्रातील सुमारे दहा लाख राज्य कर्मचारी सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 54 दिवसांचा ऐतिहासिक संप घडवून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्या संपाच्या आधी त्यांनी इतर कामगार नेत्यांच्या साक्षीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नामदार वसंतदादा पाटील हे होते त्या संपासाठी त्यांची नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी होती. त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत जळगावच्या हुडको घरकुल योजना यशस्वीरित्या राबविली. त्यावेळी 65 लाखांची पाणीपुरवठा योजना पूर्ण केली. प. पू. सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाची जळगावात निर्मिती केली. 50 बालवाड्या व मूकबधिरांसाठी शाळेची निर्मिती केली. बेघरांना मोकळ्या प्लॉटचे वाटप केले. नगरपालिकेतर्फे अनेक ठिकाणी बागबगीच्यांची निर्मिती केली
कम्युनिस्ट पक्षाचे कार्य करताना आप्पांचे अनेक मान्यवर नेतेमंडळींची कनिष्ठ संबंध आले त्यात प्रामुख्याने सर्वश्री- कॉम्रेड भाई डांगे, कॉम्रेड रोझा देशपांडे, कॉम्रेड ए.बी. वर्धन, कामगार नेते र.ग. कर्णिक, कॉम्रेड एडवोकेट रामनाथ गीते, कॉम्रेड सुरेश निकाळजे, कॉम्रेड ना. श गोडसे , कॉम्रेड गोविंदराव पानसरे, कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड लिट्टो घोष, कॉम्रेड राजेश्वरराव, कॉम्रेड एन. के. कृष्णन, कॉम्रेड ज्योती बसू (पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री), कॉम्रेड माधवराव गायकवाड, कॉम्रेड मोरे, कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी, कॉम्रेड कॅप्टन मल्हारी चिकाटे, कॉम्रेड विश्राम पाटील, कॉम्रेड रेड्डी, कॉम्रेड पटनाईक, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य, कॉम्रेड लुंबा, कॉम्रेड उषाताई चौधरी, कॉम्रेड पुना झगा मराठे, कॉम्रेड दयाराम पाटील कॉम्रेड ए.के. देशपांडे, कॉम्रेड ज का फडके, कॉम्रेड बुवा, कॉम्रेड पांडू डिसले, कॉम्रेड सरदेसाई, कॉम्रेड माशा निकालाय (रशिया), कॉम्रेड रमेश टिळेकर, कॉम्रेड धोंडू जोगी गुरुजी, कॉम्रेड भगवान थोरात, कॉम्रेड द. झ.पाटील, साथी एस एम जोशी आदींचा समावेश आहे. मार्क्सवाद आप्पांचा जीव की प्राण होता.
थोर विभूती व ध्येयवादी कर्मयोगी कॉम्रेड आप्पासाहेब स. ना. भालेराव यांना सन 1980 साली माझा भेटण्याचा सुवर्णयोग आला होता. जळगाव नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत प्रेसिडेंटचे चेंबरमध्ये आमची सुमारे एक तास भेट झाली होती. त्या भेटीत अनेक विषयावर चर्चा झाली होती तो दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्ण दिवस होता त्या दिवशी माझ्यासोबत जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाईसाहेब अख्तरअली काझी हे होते. एका लेखात मी त्यांचा जीवन परिचय मांडूच शकत नाही पुन्हा कधीतरी लिहीन. या लेखासाठी मला तेजोमयी भालेराव यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले.
जय हिंद जय महाराष्ट्र
सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे व या लेखाचे शब्दांकन श्री योगेश पाने यांनी केलेले आहे.

