कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांच्या वतीने आयोजित तेराव्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड .
![]()

कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांच्या वतीने आयोजित तेराव्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड .
डॉ.श्रीकांत पाटील हे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावचे राज्य संपर्कप्रमुख आहेत कोल्हापूर येथील डॉ. श्रीकांत पाटील हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक असून राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत. १९९५ मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांना भारताचे अणुऊर्जा आयोगाचे सदस्य आर. चिदंबरम यांच्या हस्ते राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा पारितोषिक मिळाले आहे. तर २०१४ मध्ये भारताचे राष्ट्रपती महामहीम प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. आजपर्यंत त्यांनी मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी विपुल प्रमाणात साहित्य लेखन केले आहे. बालसाहित्यामध्ये कादंबरी, बालकविता, एकांकिका, भाषणाची पुस्तके, संपादने, निबंधमाला, व्याकरण विषयक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. ज्येष्ठांसाठी कादंबरी, कविता, चरित्र लेखन, माहिती वजा आधारित साहित्य, स्फुटलेखन, संपादन, साहित्य संशोधन, समीक्षा लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळले आहेत. लॉकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या त्यांच्या चर्चेतील कादंबऱ्या असून फिनिक्स, जिगरबाज गोट्या, सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल या बालकादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत. झाडोरा हा त्यांचा बालकविता संग्रह एकरेषीय असून त्यात ५१ झाडांची व त्यांच्या औषधी गुणधर्मासहित मुलांना ओळख करून दिली आहे. शब्द तरंग, माती आभाळाशी बोले, काळ्या दगडावरची रेघ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. उस्मानाबाद येथे झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादामध्ये निमंत्रित वक्ता म्हणून त्यांचा सहभाग होता. तसेच वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कृषी जीवनातील स्थिरता रक्षक आणि मराठी लेखकांची भूमिका या परिसंवादामध्येही त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. विविध ग्रामीण आणि बालसाहित्य संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपदे भूषविलेली आहेत. अनेक साहित्य संमेलनातील परिसंवादांची अध्यक्षपदेही भूषविलेली आहेत. त्यांची ३५ हून अधिक ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. मराठी बालकुमार साहित्य सभेचे ते उपाध्यक्ष असून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगरचे ते कार्यवाह आहेत. २५ व्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती. चौथे संवाद साहित्य संमेलन शिरढोण, तसेच जागृती साहित्य संमेलन पोहाळे, सृजन साहित्य संमेलन कोगनोळी, साप्ताहिक वारणेचा वाघ साहित्य संमेलन कोडोली, शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे आयोजित पहिले शिव बाल, किशोर, युवा मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर, बालकुमार साहित्य संमेलन वाडा जिल्हा पालघर, मातृस्मृती साहित्य संमेलन कामेरी येथील साहित्य संमेलनांमध्ये अध्यक्ष पदावरून त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. श्रीकांत पाटील हे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जि. जळगावचे राज्य संपर्कप्रमुख सुद्धा आहेत.

