1 min read

जीवनशाळा हा आदिवासी शिक्षणाला दिशा देणारा प्रयोग

Loading

जीवनशाळा हा आदिवासी शिक्षणाला दिशा देणारा प्रयोग

संघर्ष व निर्माण हे नर्मदा जन आंदोलनाच्या कामाचे महत्त्वाचे सूत्र असल्याने संघर्षासोबत निर्माणाची उभी राहिलेली कामे खूप महत्वाची आहेत. “जीवन शाला की क्या है बात- लढाई-पढाई साथ साथ’’ ही घोषणा देत सुरु झालेल्या जीवनशाळा या केवळ शिक्षणाची केलेली सुविधा इतक्या मर्यादित अर्थाने मी त्याकडे बघत नाही तर जीवनशाळा हे आदिवासी शिक्षणाचे एक प्रारूप (मॉडेल) म्हणून मी त्याकडे बघतो. आदिवासी भागात सरकारने एक किलोमीटर मध्ये शाळा काढून, 1000 सरकारी व खाजगी आश्रमशाळा काढून, एकलव्य शाळांचा बजेटमध्ये गाजावाजा करूनही आदिवासी शिक्षणाला गती मिळत नाही, आदिवासी शाळांमधील गळती अजूनही कमी होत नाही.. आजही 8 वी पर्यंत 48 टक्के आदिवासी विद्यार्थी गळती होतात तर 10वी पर्यंत 63% विद्यार्थी गळती होतात. इतके हे प्रमाण मोठे आहे. आजही सर्व शिक्षा अभियान, शिक्षण हक्क कायदा, नवीन शैक्षणिक धोरण इतके सारे प्रयत्न करूनही त्याचा परिणाम होत नाही याची कारणमीमांसा करायला हवी. त्याची जी काही प्रमुख कारणे आहेत त्यात सर्वात महत्त्वाचे कारण हे आहे की आदिवासी संस्कृती, परंपरा, जीवनशैली, आदिवासी बोलीभाषा याच्याशी ते शिक्षण जोडलेली नाही. एनसीएफ 2005 मध्ये सरकारने बोलीभाषा व स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब शिक्षणात असेल असे स्पष्ट करूनसुद्धा अंमलबजावणी करण्यात आली नाही.

जीवनशाळांचे महत्त्व हे आहे की केवळ वर्षानुवर्षे आदिवासी संस्कृती शिक्षणाशी जोडा असे केवळ बोलले जात असताना नर्मदा नवनिर्माण अभियानात जीवनशाळांनी ते करून दाखवले.

आज जीवन शाळांच्या बालमेळ्यात प्रसिद्ध होत असलेले ‘आमर्‍या काण्या’ या पुस्तकाची आवृत्ती याच प्रयत्नाचा भाग आहे. बोलीभाषेला प्रतिष्ठा देणे म्हणजे त्या परंपरेला महत्त्व देणे होय. या शाळेतील सारे उपक्रम आणि आज सुरु असलेला बालमेळा हे त्याचे उदाहरण ठरावे. काल रात्रीच्या कार्यक्रमात ‘बिरसा मुंडा’ यांच्यावरील नाटक, आदिवासी लग्नाचे सादरीकरण यातून मुलांना हे शिक्षण आपले वाटते. त्यामुळे गळती थांबायला मदत झाली आहे आणि विकासाच्या प्रक्रियेत शिक्षण कसे महत्त्वाचे ठरते. हे जीवनशाळांनी अधोरेखित केले आहे. इतके महत्त्वपूर्ण काम होऊन त्या कामाला समाज म्हणून वंदन करण्याऐवजी काही व्यक्ती जीवनशाळांविषयी काहीही माहिती नसताना बेछूट आरोप करीत आहेत. जीवनशाळा चालत नाहीत असे आरोप करणार्‍यांनी आज या बालमेळाव्यात जरुर यायला हवे होते. शासकीय शाळा चालत नव्हत्या म्हणून या शाळा सुरु झाल्या आणि त्याच शाळांवर असे आरोप करणे हास्यास्पद व संतापजनक आहे. गेली 30 वर्षे या शाळांनी आदिवासी शिक्षण, बुडीत क्षेत्रातील शिक्षण आणि शेकडो तरुणांच्या आयुष्याला वळण दिले आहे त्या ऐतिहासिक प्रयत्नाला अवमानित न करता या शाळा प्रत्यक्ष येऊन बघायला हव्यात व सरकारने याचा अभ्यास करून या आधारे आदिवासी शिक्षणात यानुसार बदल करायला हवेत अशी शिक्षण क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना

-हेरंब कुलकर्णी

मु.पो. अकोले, जि. अहमदनगर

मो.82085 89195

काथर्दे दिगर (पुनर्वसन वसाहत)

ता. शहादा जि. नंदुरबार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *