जुन्या पेंन्शनसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप..
![]()
जुन्या पेंन्शनसाठी १४ मार्च पासून बेमुदत संप..
संपात सहभागी होण्याचा मराठवाडा शिक्षक संघाचा निर्णय…

बीड दिनांक २१ फेब्रुवारी: अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेंन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक १४ मार्च पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपात सहभागी होण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षक संघाने घेतला असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिली.
या बाबतीत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जुन्या पेंन्शनसाठी होत असलेल्या संपा बाबत निर्णय घेण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांचे अध्यक्षतेखाली काल मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणीची झुम बैठक संपन्न झाली. मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक पी. एस. घाडगे यांचेसह सर्व केंद्र कार्यकारिणी सदस्य बैठकीस उपस्थित होते. राज्यकर्ते स्वतः साठी अतिशय आकर्षक पेंन्शन योजना लागू करून घेत असताना कर्मचारी शिक्षकांना मात्र अतिशय बोगस आणि कुचकामी असलेली अंशदायी पेंन्शन योजना लागू केली आहे. या योजनेचा फोलपणा लक्षात आल्यावर राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी जुनी पेंन्शन योजना लागू केली. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांनी नवीन पेंन्शन योजना स्वीकारलीच नाही. यातील कोणतेही राज्य दिवाळखोरीत गेलेले नाही. असे असताना महाराष्ट्रात जुनी पेंन्शन योजना स्वीकारली तर राज्य दिवाळखोरीत जाईल हे राज्यकर्त्यांचे विधान हास्यास्पद आणि दिशाभूल करणारे आहे. राज्यातील शिक्षण विभाग प्रश्न ग्रस्त बनला आहे. वीस बावीस वर्षां पासून हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन वा अल्प वेतनावर काम करीत आहेत. उच्च शिक्षित युवक तासिका तत्वावर अत्यल्प मानधनावर काम करत आहेत. ही एकविसाव्या शतकातील वेठबिगारीच आहे. शिक्षक,- प्राध्यापक भरती बंद असल्याने शाळा, महाविद्यालयात शिकविण्यासाठी शिक्षक प्राध्यापक नाहीत. ‘१९७७ साली राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीने ५४ दिवस संप करून केंद्रा प्रमाणे वेतन आणि भत्ते हे सुत्र मिळवले’ आता जुनी पेंन्शन योजना मिळवण्यासाठी सरकारने कर्मचारी शिक्षकांवर बेमुदत संपावर जाण्याची वेळ आणली आहे. देशातील सर्वात प्रगत राज्याला आपल्या कर्मचारी शिक्षकांना सेवानिवृत्ती नंतर वा-यावर सोडणे शोभा देणारे नाही. त्यामुळे अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेंन्शन योजना जो पर्यंत लागू करून करत नाहीत तोपर्यंत कर्मचारी शिक्षक बेमुदत संप करणार असल्याचे मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

