महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा माजी खासदार कै. भाऊसाहेब के. एम. पाटील
![]()

महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा माजी खासदार कै. भाऊसाहेब के. एम. पाटील
जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुका आहे. त्या अमळनेर तालुक्यातील गांधली या गावातील एक बहुजन समाजाचा शून्यातून विश्व निर्माण करणारा घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना स्वतः मोलमजुरी करून दुसऱ्याच्या घरी जेवण करून आपले शिक्षण पूर्ण करून बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारा एक असामान्य व्यक्तिमत्व असलेले अमळनेर तालुक्याचे माजी आमदार जळगाव जिल्हा परिषदेचे पहिलेच लोकनियुक्त अध्यक्ष व जळगाव लोकसभेचे माजी खासदार कै. भाऊसाहेब कृष्णराव माधवराव पाटील (भाऊसाहेब के. एम. पाटील) आणि माझे आवडते भाऊकाका यांना त्रिवार वंदन करून त्यांना एक कडकडीत काँग्रेसी सलाम देऊन मी माझ्या लेखाला सुरुवात करीत आहे.
आमच्या भाऊकाकांचा जन्म दिनांक 11 मार्च 1918 रोजी चोपडा तालुक्यातील हातेड येथे मामांच्या घरी झाला. भाऊ अवघ्या दोन वर्षाचे असताना त्यांचे वडील माधवरावांचा गांधली येथे शेतात सर्प दंशाने मृत्यू झाला होता. आई यशोदा या मातेने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अत्यंत काबाडकष्ट करून घर चालविण्यास सुरुवात केली. माझा कृष्णा हा शिकला पाहिजे. ही तिची मनापासून इच्छा होती. व बाळकृष्णाला देखील मातेची इच्छा पूर्ण करण्याची तळमळ होती. त्यासाठी दोघेही मायलेकांचे मोठे कष्ट करण्याची तयारी होती. भाऊकाकांचे प्राथमिक शालेय शिक्षण गांधली हातेड येथे झाले. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण धुळ्यास पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. ते जुन्या जमान्यातील बी.ए.एल.एल.बी. होते. बी. ए.ला असताना अर्थशास्त्र व इंग्रजी हे दोन विषय त्यांचे आवडीचे होते. त्यांचे दोन इंग्रजी वाक्य मला आयुष्यभर आठवणीत राहतील. ते मला नेहमी म्हणायचे I would like those peoples who is believe and love in Congress and Nehru Gandhi family. तसेच सन 1978 साली जिल्हा युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात त्यांचे प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गदर्शनपर भाषण झाले होते. त्यांच्या भाषणाचा विषय होता की, ‘what is fundamental basic of Congress’. त्या दिवशी मला आमचे भाऊकाका खऱ्या अर्थाने कळले होते. पांढराशुभ्र खादीचा नेहरू शर्ट, पांढरे शुभ्र धोतर, सावळा रंग मनामनात ठासून भरलेले गांधी विचार आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासाचे पूर्ण स्वप्न पाहणारा महापुरुष म्हणजे आमचे भाऊकाका. दिल्लीत जळगावचे प्रतिनिधित्व करणारे भाऊकाकांना सत्तेचा कधीही अहंकार चढला नाही. राजकारणातील विरोधकासहित सगळ्यांना दोन हात जोडून नमस्कार करणारे व सर्वांचे कामे करणारे भाऊकाका खऱ्या अर्थाने असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांचे आमच्या अंमळनेर येथील देशमुख वाड्यातील घरी नेहमीच येणे जाणे होते. ते माझे आदरणीय पिताश्री पत्रकार कै. माधवरावजी सुतार यांचे जीवश्च-कंठश्च मित्र होते. तसेच माझे आजोबा कै. रामजीबाबा मिस्तरी स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे आजोबांना भेटण्यासाठी आवर्जून येत असत. माझ्या आजोबांविषयी त्यांच्या मनात खूपच आदर होता. माझे आजोबा परमपूज्य सानेगुरुजींच्या सानिध्यात अनेक वेळा आल्यामुळे सानेगुरुजींच्या झालेल्या भेटी व त्या भेटीतील संवाद ऐकण्यासाठी भाऊकाका नेहमीच उत्सुक असत. माझ्या आजोबांची आणि भाऊकाकांची पहिलीच भेट दिनांक 27 डिसेंबर 1936 रोजी फैजपूर काँग्रेसच्या महाअधिवेशनात झालेली होती. काँग्रेसचे ग्रामीण भागात झालेले हे पहिलेच अधिवेशन होते. त्या अधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, दिनांक 4 फेब्रुवारी 1948 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमस्वरूपी बंदीचे आदेश देणारे खऱ्या अर्थाने लोहपुरुष असलेले सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चॅटर्जी, आचार्य विनोबा भावे, शंकरराव देव, सानेगुरुजी, अच्युतराव पटवर्धन आदी मान्यवरांच्या समावेश होता. जणू काही तो काँग्रेसचा महाकुंभमेळावाच होता. ह्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते स्वातंत्र्यसैनिक धनाजी नाना चौधरी (माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींचे पिताश्री) या अधिवेशनासाठी माझ्या घरचे 14 सदस्य गेलेले होते. त्यात माझे तिन्ही आजोबा, तिन्ही आजी, काका-आत्यांचा समावेश होता. जणू काँग्रेस आमच्या घराण्याच्या नसानसात भिनलेली होती.
भाऊकाकांच्या राजकारणाची सुरुवात फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनापासूनची झालेली होती सन 1939 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव देव यांच्यासोबत भाऊकाकांनी पक्षीय कार्याला सुरुवात केली. ते 1947 सालापासून भारत सेवक समाज संस्थेचे जिल्हा संघटक होते. सन 1951 साली त्यांचा आसोदा येथे वत्सलामाई यांच्याशी शुभविवाह झाला. त्यांच्या संसार वेलीवर तीन मुले व पाच मुली झाल्या होत्या. तिन्ही मुले अल्पवयातच जग सोडून गेले. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखाची त्यांनी आपल्या कुटुंबावर कधीही झळ पोहचू दिली नाही आणि आपल्या पाचही मुलींना मुले मानून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले. या कामी त्यांना त्यांच्या धर्मपत्नीची वत्सलाकाकूंची मोलाची साथ मिळाली. सन 1956 साली जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत शिक्षक व वस्तीगृह अधीक्षक म्हणूनही काम त्यांनी केले. माझ्या बहुजन समाजाचा विद्यार्थी हा शिकलाच पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. सन 1956 ते 1960 जिल्हा ग्रामीण विकास सचिव पदावर त्यांची नियुक्ती झाली. सन 1960 ते 1962 या दोन वर्षात अंमळनेर तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत केला. सन 1962 साली जळगाव जिल्हा परिषदेची पहिलीच निवडणूक झाली. त्यात भाऊकाका प्रचंड मतांनी विजयी झाले. 1962 ते 1967 ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते. सन 1967 साली ध्यानीमनी नसताना त्यांना अमळनेर विधानसभेची तिकीट मिळाले. आणि भाऊकाका प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या दरम्यान ते सन 1967 ते 1977 नूतन मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. तसेच ते जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ही संचालक होते. सन 1971 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जळगाव लोकसभेचे तिकीट मिळाले आणि यावेळी देखील ते प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले होते. लोकसभेत खासदार असताना त्यांची माजी पंतप्रधान व आयर्न लेडी श्रीमती इंदिराजी गांधींशी संबंध आला. त्यावेळी ते लोकसभेच्या अनेक समित्यांवर सन्माननीय सदस्य म्हणून कार्यरत होते. सन 1974 साली लोकसभेच्या अधिवेशनात खासदार अटल बिहारी वाजपेयींनी भारतातील काळया पैशाबाबत प्रश्न विचारला होता. त्याप्रसंगी श्रीमती इंदिराजींनी भाऊकाकांना सायंकाळी साडेसात वाजता पंतप्रधान कार्यालय 1 सफदरजंग रोड दिल्ली येथे बोलविले. काळया पैशाबाबत धारदार उत्तर देण्याची जबाबदारी भाऊकाकांवर सोपविली. शनिवारी, रविवारी संपूर्ण अभ्यास करून भाऊकाकांनी सोमवारी लोकसभेच्या अधिवेशनात जोरदार उत्तरे दिलीत. त्या उत्तराने जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयीजी हे चारी मुंड्या चीत झाले होते. त्यामुळेच इंदिराजींचा भाऊकाकांवर विशेष लोभ होता. महाराष्ट्राचा सह्याद्री जर यशवंतरावजी चव्हाण होते तर महाराष्ट्राच्या राजकारणातील कोहिनूर हिरा अर्थातच भाऊकाका होते. पंतप्रधान इंदिराजींनी भाऊकाकांना कोहिनूर हिरा ही पदवी दिली होती. भाऊकाकांसोबत जळगाव जिल्ह्यातील मंत्री गण प्रतिभाताई पाटील (माजी राष्ट्रपती), मधुकरराव चौधरी (माजी विधानसभा अध्यक्ष), माधव गोटू पाटील, अरुणभाई गुजराती, ईश्वरलाल जैन, अख्तर अली काझी, आबासाहेब के. डी. पाटील, रोहिदास दाजी पाटील आदींसोबत कामे केलेली होती. त्याचप्रमाणे अमळनेर तालुक्यात जगतराव बापू पवार, अमृता आप्पा पाटील, मल्हारी नाना पाटील, न्हानाभाऊ मन्साराम पाटील, व्यंकटराव केशवराव पाटील, पुंडलिक सहादू व पोपटराव सहादू पाटील, बाळासाहेब दाभाडे, भैय्यासाहेब पाटील, नानागीर गोसावी, धनगर अर्जुन पाटील निष्ठावंत कार्यकर्ते व नेते घडविले. त्याचप्रमाणे अमळनेर शहरात सर्वश्री देवाजी बुधा महाजन, रतनशेठ पहाडे, लोटन अण्णा चौधरी, भास्करराव चव्हाण, दाजीबा पाटील, आर के दादा पाटील, प्राध्यापक उ. भा. कोठारी सर, अब्बासभाई बोहरी, करीमखा जमशेदखा पठाण, हाजी शरफोद्दीन, एडवोकेट मो.द. ब्रम्हे, अमिरोद्दीन काझी आदी कार्यकर्ते नेते घडविले. सन 1977 साली भाऊकाका एरंडोल लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा पराभूत झाले. सुमारे एक महिन्यानंतर ते आमच्या घरी आले त्यांना पाहून मी ओक्साबोक्सी रडू लागलो. त्यावेळी माझी आई, वडील, भाऊ आणि मी व आमच्या सोबत भाऊकाका अर्धा तास कोणीच कोणाशी बोललो नाही. मी सतत रडत होतो कारण की माझे आवडते भाऊकाका हरले होते. थोड्यावेळाने भाऊकाकांचेही डोळे भरून आले होते. भाऊकाका तुम्ही का रडता आहात? त्यावेळी भाऊकाका बोलले की तुझे भाऊकाका हरलेत म्हणून तू ओक्साबोक्सी रडला आहे. पण माझी काँग्रेस देशात पहिल्यांदा पराभूत झाली म्हणून मी रडलो. त्यांच्या या उत्तराने आम्ही सर्वच नि:शब्द झालो. केवढी ही पक्षनिष्ठा. भाऊकाका तुम्हाला आमचा मानाचा मुजरा तुमच्यासारखे नेते होते म्हणून काँग्रेस टिकून आहे.
या लेखासाठी भाऊकाकाचे पुतणे संजय भीमराव पाटील गांधलीकर व नातू प्रा. राजेंद्र देशमुख जळगाव यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद..!
जय हिंद जय महाराष्ट्र….
सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे व या लेखाचे शब्दांकन श्री योगेश पाने यांनी केलेले आहे.

