1 min read

शिवजयंती निमित्त तुकोबाराय अभ्यासिकेचे उदघाटन…

Loading

शिवजयंती निमित्त तुकोबाराय अभ्यासिकेचे उदघाटन…

समस्त कुणबी पाटील पंच मंडळाचा अभिनव उपक्रम…

धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर

धरणगाव — येथील लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जगद्गुरू संत तुकोबाराय अभ्यासिकेचे उदघाटन तहसिलदार नितीनकुमार देवरे आणि पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरू तुकोबाराय, संत सावता महाराज, माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी चेतना जगदीश शिंदे (इ.४थी) या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी राजे आणि अफजल खान भेटीचे वर्णन करणारा पोवाडा सादर करून कार्यक्रमात उत्साह आणला. चेतना (चिऊला) देवरे साहेबांनी ५०० रुपयांचे रोख बक्षीस देऊन कौतुक केले. अतिथी मान्यवर नितीनकुमार देवरे आणि राहुलजी खताळ यांचा समाजाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कन्हेरे येथील रहिवासी व सध्या अरुणाचल प्रदेश येथे ITBP मध्ये सेवा बजावत असलेले महेंद्र नेरकर, प्रताप महाविद्यालयात कार्यरत असलेले, नुकतीच ज्यांना पीएचडी मिळाली असे प्रा.डॉ.रविंद्र मराठे यांचा, मास रेसलिंग मध्ये नावलौकिक मिळविलेल्या अक्षय सोनवणे यांचा तहसिलदार आणि पीआय साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर जगद्गुरू तुकोबाराय अभ्यासिकेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले. या अभ्यासिकेत समाजाचे सदस्य किशोर सुकलाल पाटील यांनी दिलेल्या ३१,००० रुपये देणगीची UPSC, MPSC, सरळसेवा, रेल्वे भरती, पोस्ट, बँक, पोलीस भरती इ. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं उपलब्ध आहेत.
कार्यक्रम प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतांना पीआय राहुलजी खताळ यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. वाचनाच्या प्रेरणेने व्यक्तिमत्त्व घडतं, शिवविचार अंगिकार करण्यासाठी असे उपक्रम राबविले पाहिजे असे प्रतिपादन, खताळ साहेबांनी केले. तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी आपले स्वानुभव कथन करून विद्यार्थांना मार्गदर्शन केले. राष्ट्रपुरुषांचे विचार फक्त नाचून नव्हे तर वाचून समजून घेतले पाहिजे. मुली देखील आयएएस – आयपीएस होऊ शकतात फक्त जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. तुम्हांला कधीही अडचण असल्यास हक्काने सांगा असे आवाहन देवरे साहेबांनी केले. कार्यक्रम प्रसंगी समस्त कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, जेष्ठ संचालक माधवराव पाटील, चुडामण पाटील, दत्तू पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, गणेश पाटील, वाल्मिक पाटील, परशुराम पाटील, जितेंद्र पाटील, किशोर पाटील, मंगेश पाटील शिपाई अशोक झुंझारराव यांच्यासह समाज बांधव, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत तुकाराम महाराज बीज उत्सव समितीच्या सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जगदंबा टेंट हाऊसचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *