धुळे ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले गावी धुळ्यातील तिघा पत्रकारांचा अविस्मरणीय एस.टी. बस प्रवास
![]()

धुळे ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले गावी
धुळ्यातील तिघा पत्रकारांचा अविस्मरणीय एस.टी. बस प्रवास
खूप वर्षापूर्वीची गोष्ट, दिवस आणि सालही नीट आठवत नाही. पण जानेवारी महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. सहा जानेवारी हा कै. बाळशास्त्री जांभेकर यांचा पुण्यस्मरण दिवस, त्याच दिवशी ‘दर्पण’ हे नियतकालिक सुरु झाले. त्यामुळे तो ‘दर्पण दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. पुढे त्यालाच ‘पत्रकार दिन’ असे नामाभिधान झाले. नंतर केंद्र सरकारने पत्रकार दिवस दुसर्या तारखेला सुरु करण्याची घोषणा केली. त्यामुळे दर्पण दिनाला मराठी पत्रकार दिन म्हणू लागले. मराठी भाषेला ज्यामुळे वैभव प्राप्त झाले, त्यात पत्रकारितेचा महत्त्वाचा वाटा आहे. मराठी भाषेच्या पाऊलखूणा शोधतांना कर्नाटकातील श्रवणबेळगोळा येथील बाहुबलीच्या जैन शिल्पावरील “चामुण्ड राये करवियले’’ हा शिलालेखावरील मजकूर प्रमाणभूत मानला जातो. कोकणात कांही ‘शिलालेख’ नंतर आढळले, ते त्यापूर्वीचे असल्याचे म्हटले जाते. सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज यांनी, ‘माझ्या मराठीचि बोलू कौतुके, तरी अमृतातेही पैजांशी जिंके’, असे घोषित करून ज्ञानेश्वरीची रचना केली. सोबत अमृतातुळ, हरीपाठ, चांगदेव पासष्टी अशी श्रेष्ठ दर्जाची साहित्य रचना केली. त्यापूर्वीची ग्रंथरचना सांगितली जाते. मराठवाडा, विदर्भ, कोकण विभागात अशा साहित्य रचना, लोकगीते, लोकसंगीत, किर्तन, तमाशा यांच्या परंपरा आहेत. दोनशे वर्षापूर्वी मराठीत नाटक आले. संगीत नाटकांची परंपरा निर्माण झाली. पुढे कथा.. कादंबरी हे साहित्य प्रकार आले. लोकांत लिहिण्या-वाचण्याची कला रुढ झाली. इंग्रज सरकारने शाळा काढल्या. त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागातून घडामोडींचे वृत्त लोकांना समजू लागले. उच्च शिक्षित लोकांसाठी इंग्रजी भाषेत वृत्तपत्रे सुरु झाली. लंडन व युरोपिय देशातील वृत्तपत्रे येत होती. पुढे मुंबई, मद्रास व कलकत्ता येथून इंग्रजी वृत्तपत्रे सुरु झाली. हा एवढा सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठी की मराठी भाषा लिहिता-वाचता येणार्यांना आपल्या भाषेत नियतकालिके यावीत अशी भूक निर्माण झाली. त्यासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस या दिवशी, ‘दर्पण’ हे मराठी वृत्तपत्र काढले. त्यावेळी त्यांचे वय अवघ्या वीस वर्षांचे होते. कोकणात कुडाळ तालुक्यात खारेपाटण या गांवापासून कांही मैलांवर पोंभुर्ले हे गांव आहे. ते जांभेकर यांचे मुळ गांव आहे. तेथेच त्यांचा जन्म झाला. ते अतिशय हुशार-बुद्धीमान व कष्टाळु विद्यार्थी होते. त्यांनी शिक्षणात विक्रम स्थापन केले व मराठी-संस्कृतसह अनेक भाषा अल्पावधीत अवगत केल्या. इंग्रजी-फ्रेंच वगैरे भाषाही त्यांना उत्तम प्रकारे लिहिता व बोलता येत असत. त्यांना महाविद्यालयात सरकारने मानद प्राध्यापकाची नेमणूक आदरपूर्वक प्रदान केली होती. त्यांनी शैक्षणिक विश्वात अनेक प्रयोग यशस्वीपणे राबविले. मराठी भाषेत वृत्तपत्र काढण्याचा त्यांनी संकल्प केला व सिद्धीस नेला. हे नियतकालिक मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषात होते. हे द्विभाषिक वृत्तपत्र म्हणजे मराठी भाषेतील पहिले छापील नियतकालिक होते. म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आद्य मराठी पत्रकार आणि दर्पणला आद्य मराठी नियतकालिक म्हणतात.
धुळ्यातील आम्ही मित्रमंडळीने, लेखाच्या सुरुवातीस नमूद केल्याप्रमाणे, बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले गांवी सहा जानेवारीस जाण्याचा विचार केला. 5-6 जणांनी जावे असे ठरत होते. त्यात सहलींचा अनुभव आणि हौस असलेले आमचे मित्र मनोहर भगवान पाटील यांनी विशेष उत्साह दाखविला. त्यात ‘एकला चालो रे’ चे संपादक गो. पि. लांडगे यांनी भर घातली. माझा कांही वेगळा विचार नव्हता. त्यामुळे आम्ही तिघांनी मिळून जाण्याचा निर्णय केला. कोणतेही खाजगी वाहन करायचे नाही, कोणतीही विशेष सवलत घ्यावयाची नाही, आरक्षण करायचे नाही असे खडतर वाटणारे निर्णय आम्ही सर्वसंमतीने घेतले होते. त्यावेळी आम्ही तिघेही (मी अध्यक्ष, मनोहर पाटील सरचिटणीस व गो.पि. लांडगे प्रान्तिक प्रतिनिधी) धुळे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी होतो. आम्हा तिघांचे एस.टी. गाड्या जशा मिळतील तशा, रस्त्यावर चौकशी करून पुढचा प्रवास मुक्काम ठरवून निघण्याचे ठरले. त्यामुळे धुळ्याहून सुरुवातीस पुणे शहर गाठले. तेथून महाड मार्गे कोकणात पोहोचलो. लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहवयाची नसल्याने महाडहून चिपळूण पर्यंत गेलो. रात्र झाल्याने चिपळूण बस स्टॅण्डवरच दिवस उजाडेपर्यंत थांबण्याचे ठरविले. चिपळूण शहर मोठे आहे व बसस्थानकही चांगले बांधलेले आहे. पण अवेळ असल्याने कमालीची शांतता व उदास वातावरण होते. थोडेसे प्रवासी व गांवातून येणारे रिकामटेकडी मंडळी यांच्या सहवासांत गप्पा-गोष्टी, थट्टा विनोद करून आम्ही रात्र घालविली. पुढे संगमेश्वर-रत्नागिरीपर्यंत प्रवास केला. तेथे पुन्हा दुसरी रात्र सोबतीस आली. पहाटे तीनच्या सुमारास खारेपाटण गावाच्या जवळ, महामार्गावर उतरलो. गाव दोन किलोमीटरच्या जवळपास होते. पण चांगला डांबरी रस्ता होता. रस्त्यावर शुकशुकाट होता पण गांवातील एक दोन प्रवासी सोबत असल्याने, खारेपाटण गाव गाठले. थंडीचे दिवस होते. पण खानदेशातील थंडीपेक्षा तेथील थंडी बरीच सुसह्य होती. गांवाबाहेर एका जागी, उजेड आणि जाग दिसली. जवळ गेल्यावर ते चहाचे हॉटेल किंवा टपरी म्हणावे असे दुकान असल्याचे कळले. तेथे बाकावर तिघे जण विसावलो. अजून उजेड पडायला उशीर होता. त्यामुळे चहा घेण्याचे ठरविले. चहाची चौकशी केली. दुकानदाराने सांगितले की, दूध नाही. कारण दूध सकाळी सहा नंतर येते. कोल्हापूरहून दूधाचा टँकर येतो. पण आता शेळीचे दूध आहे. शेळीच्या दूधाचा चहा बनवून देतो. हवा असल्यास घ्या. आम्हाला कांही अडचण नव्हती. शेळीच्या दुधाचा मोठे कप-बशी भरून चहा दिला. त्यामुळे थकवा कमी झाला. त्याच जागी वेळ घालवून उजेड झाल्यावर आम्ही निघालो. ती जागा गांवाच्या एका टोकावर होती. तेथून संपूर्ण गांव, बाजारपेठ पार करून आम्ही सरकारी डाक बंगल्यावर पोहोचलो. डाक बंगला चांगला प्रशस्त व सर्वसोयींनी युक्त होता. पण इकडे कोणी फारसे येत नसल्याने तेथे आबाळ होती. आम्हाला सोय हवी होती, ती सहजपणे मिळाली. तेथून पुढे पोंभुर्ले येथे जायचे होते. तो कार्यक्रम दुसर्या दिवशी सकाळी होता. त्यामुळे त्या दिवशी खारेपाटणच्या विश्रामगृहातच थांबणे उचित होते. आम्ही गांवात फेरफटका मारून गांव पाहिले. टुमदार कौलारू घरे, माड्या, दुकाने होती. माणसे उद्यमशील दिसत होती. डाक बंगल्याचा खानसामा-शिपाई यांच्याशी गप्पागोष्टी करीत तो दिवस घालविला. दुसर्या दिवशी सकाळीच एस.टी. ने पोंभुले या गांवी दाखल झालो. ते गांव छोटेसे आणि विखुरलेले होते. पण ‘दर्पण’ दिनाच्या उत्साहाने सर्व जण हर्षभरीत होते. गांव पताका आणि केळीच्या घडांनी सजविलेले होते. ठिकठिकाणी कमानी उभ्या केलेल्या होत्या. खानदेशातील गांवासारखे सरळ सपाटीवरील ते गांव नाही. खाली-वर वाटचाल करणारे रस्ते, टेकडीवरील घरे अशी रचना दिसून आली. बाळशास्त्री जांभेकर यांचे वडिलोपार्जित घर-वाडा मुख्य आकर्षण होते. ते एका टेकडीवर स्वतंत्रपणे वसलेले आहे. नारळ-पोफळी-आंबे यांच्या झाडांची व वेलांची दारी हे घराचे वैशिष्ट्य आहे. इतर घरे थोड्याफार फरकाने तशीच दिसून आली. आम्ही कार्यक्रमाच्या जागी म्हणजे जांभेकर यांच्या वाड्याजवळ पोहोचलो. अजून उशिर असल्याने मोकळेपणाने सगळीकडे फिरता आले. राजापूरचे त्यावेळचे खासदार सुरेश प्रभू हे येणार होते. ते वेळेपूर्वी येऊन दाखल झाले. पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार वसंत काणे हे कार्यक्रमाचे मुख्य यजमान होते. त्यांची लगबग सुरु होती. परिषदेचे नेते एस.एम. देशमुख आलेले होते. रत्नागिरी, अलीबाग, चिपळूण, सावंतवाडी, कुडाळ, मालवण येथील पत्रकार मंडळी आलेली होती. खूप गर्दी नव्हती. गांवकरी तसेच परिसरातील कांही निवडक नेते मंडळी होती. त्यांचे सहवासात वेळ कसा गेला, हे कळले नाही. सुरेश प्रभू यांचे साधेपण व मोकळा स्वभाव प्रभाव टाकून गेला. ते सगळ्यांना भेटले. ओळखी करून घेतल्या. मुख्य समारंभ विशेष भाषणबाजी न होता पार पडला. गांवातील छोटीसी मिरवणूक काढून, स्मारकावर अभिवादन कार्यक्रम झाला. जांभेकरांच्या घराजवळ स्तंभ उभारला असून त्यावर त्यांचे विषयी माहिती नोंदविली आहे. स्तंभावर ‘दर्पण’ वृत्तपत्राची वैशिष्ट्येही नोंदविली आहे. हा कार्यक्रम आगळा-वेगळा वाटला. प्रवासही वेगळा आणि सगळा अनुभव वेगळा असल्याने हा अनुभव आम्हा तिघांच्या कायमचा स्मरणात राहिला.

