1 min read

स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांचे समाजासाठी योगदान कौतुकास्पद, प्रेरणादायी

Loading

स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांचे समाजासाठी योगदान कौतुकास्पद, प्रेरणादायी

मंगल कार्यालय नामकरण प्रसंगी माजी आमदार चंद्रकांतभैय्या रघुवंशी यांचे प्रतिपादन

शेतकरी मुलाला मुली मिळत नाहीत ही शोकांतिका ! – प्राचार्य बी.एस.दादा पाटील

नंदूरबार- मराठा पाटील मंगल कार्यालयाची वास्तु सुंदर व देखणी असून ती उभी करण्यासाठी समाजधुरीणांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा वेळी समाजाने कष्टाने यातना भोगत काम करणाऱ्यांच्या पाठीशी तन-मन-धनाने उभे रहात एकजुटीचे दर्शन घडविणे हे समाजाचे कर्तव्य आहे. प्रत्येक समाजात दात्यांचे जतन केले पाहिजे. स्वत: मी देखील सर्वोतोपरी मदत करीन. समाजाने मला आपली स्टेपनी समजावे. हरीभाऊ पाटील यांचे योगदान कौतुकास्पद व प्रेरणादायी असून नंदूरबारशी त्यांचे घनिष्ट नाते होते’’ असे प्रतिपादन माजी आमदार भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार येथील धुळे रोडवरील ज्ञानदीप सोसायटीत तैयबी नगर मधील मराठा पाटील समाज मंडळाचे शाहीर हरिभाऊ मराठा पाटील नूतन मंगल कार्यालयाचे नामकरण व उद्‌घाटन समारंभ प्रसंगी केले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठा पाटील समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष, निवृत्त प्राचार्य दादासाहेब बी.एस. पाटील हे होते.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ख्यातनाम शाहीर हरीभाऊ पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती उषाताई हरीभाऊ पाटील यांनी हरीभाऊंच्या स्मरणार्थ हरीभाऊंची स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून या मंगल कार्यालयासाठी यावेळी 25 लाखाची उदार देणगी दिली. या शान्दार अशा समारंभ प्रसंगी नंदुरबारच्या माजी नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी, उद्योगपती, प्रा. डॉ. रविंद्रबापू चौधरी, माजी जिल्हा शल्य चिकित्सक , प्रा. जी. एन. मराठे, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ, प्रा. डॉ. दिपक अंधारे, सौ. स्मिताताई पाटील (सरपंच, तिलाली), सौ. रत्नमालाताई बाबूराव पाटीलआदींसह धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शाहीर हरीभाऊंवर प्रेम करणारे अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी उद्योगपती प्रा. डॉ. रविंद्र बापू चौधरी आपल्या भाषणात म्हणाते, ‘‘स्व. हरीभाऊ पाटील यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून नंदूरबारचे नाव राज्यभर केले. क्रांतीवीर नाना पाटील, उत्तमराव पाटील, लिलाताई पाटील अशा क्रांतीकारकांचा त्यांना सहवास लाभला होता. या मंगल कार्यास भाऊंचे नाव देणे उचितच आहे. मराठा पाटील समाजातही गरीब भरपूर आहेत. या गरीबांच्या उद्धारासाठी या मंगल कार्यालयामार्फत समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. एकत्र येत समाजाची एकजूट व सामर्थ्य, ताकद निर्माण करावी असे आवाहन केले.

स्व.शाहीर हरीभाऊ पाटील यांच्या पत्नी दानशूर श्रीमती उषाताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंगल कार्यालयासंदर्भात भाऊंची स्वप्नपूर्ती होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत असतांनाच त्या अधिक भावनाविवश झाल्या. त्यावेळी श्रोत्यांचेही डोळे पाणावले. नंदूरबार जिल्हा मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष व समारंभाचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य दादासाहेब बी.एस. पाटील अध्यक्षीय समारोप करतांना म्हणाले, ‘‘या मंगल कार्यालयाचा उद्देश व्यवसायासाठी नसून एक सामाजिक व्यासपीठ म्हणून वापरले जाणार आहे. राजकारणाचे जोडे बाहेर काढून संस्थेच्या घटनेप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक, आर्थिक, सहकार क्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने समाजातील गरीब दीनदुबळा माणूस केंद्रबिंदू मानून शेवटच्या घटकातील माणसाला सबळ करण्याचे काम येथे होईल. जाचक रुढी, परंपरा, प्रथा या विरुद्ध उभे राहिले पाहिजे. शेतकरी मुलाला लोक मुली देत नाही हा मोठा सामाजिक प्रश्न असून तो येथे सोडविण्याचा प्रयत्न व्हावा. समाजातील विधवा परित्यक्त्या यांचे येथे मेळावे घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न व्हावा. बेरोजगारांचा प्रश्न सोडवावा, दिपस्तंभ फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व्हावे. प्रकृती सदृढ राहण्यासाठी योगाचे वर्ग घेण्यात यावेत. येथून व्यसनमुक्तीचा प्रचार व्हावा. संघशक्तीच हे करू शकेल. तुम्ही संघटीत, प्रामाणिकपणे काम करा. समाज तुमच्याकडे आपोआप आकर्षित होईल. हे नुसते मंगल कार्यालय नसून स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक आहे, असे नमूद करीत प्राचार्य बी.एस. दादा पाटील यांनी गेल्या 42 वर्षातील संघटनेच्या कामाचा आढावा घेत समाजाचे दिवंगत नेते माजी जि.प. अध्यक्ष जी.टी. बापूजी पाटील यांच्यावर झालेल्या दगडफेकीतून समाज कसा संघटीत झाला याचा आढावा घेत समाजबांधवांनी आत्मपरिक्षण करावे असे आवाहन केले व मंगल कार्यालयास भरघोस दान देणाऱ्या उषाताईंसह मराठा पाटील समाजातील सर्व दात्यांचे आभार मानले. या प्रसंगी मंगल कार्यालयास आर्थिक योगदान देणाऱ्या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारंभ प्रसंगी अनेकांनी आपली मदत जाहिर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समाज मंडळाचे सचिव नानासाहेब यशवंत देवराम पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धुळ्याचे सुप्रसिद्ध निवेदक जगदीशदादा देवपूरकर व डॉ. माधवराव कदम यांनी केले. उमेश भदाणे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे, विश्वासराव पाटील, शालीग्राम पाटील, भूविकास बँकेचे माजी चेअरमन दिनकरआबा पाटील, भास्करराव पाटील, माजी नगरसेवक युवराज पाटील, माजी नगरसेवक कैलास पाटील, प्रा. व्ही. एस. अहिरराव, प्रा. आर. बी. पाटील, कवि निंबाजीराव बागुल, मधुकर पाटील, नितीन पाटील, राजु पाटील, अशोक शर्मा, आर. डी. मोरे, राजेंद्र बागुल, आदींसह समाज बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *