प्रत्येक कालखंडात मराठी साहित्यविश्वाचे धुरीणत्व जळगाव जिल्ह्याने केले आहे : डॉ .अशोक कोळी
![]()

प्रत्येक कालखंडात मराठी साहित्यविश्वाचे धुरीणत्व जळगाव जिल्ह्याने केले आहे : डॉ .अशोक कोळी
” प्रत्येक कालखंडात मराठी साहित्य विश्वाचे धुरीणत्व जळगाव जिल्ह्याने केले आहे.जळगाव जिल्हा बोलीभाषांची खाण आहे. अहिराणी भाषा आपली राणी असून वग आणि वही गायन खानदेशची लोकसंगीत परंपरेला देण आहे . प्रत्येक पिढीची स्वतंत्र बोली असते.साहित्य ,संस्कृती व बोलीभाषा एकूण समाज जीवनाला प्रेरणा देतात “असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ.अशोक कोळी यांनी केले.
भाषा संचनालय व मूळजी जेठा ( स्वायत्त ) महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा औचित्याने आयोजित ३६ जिल्हे , ३६ व्याख्याने या राज्यव्यापी व्याख्यान मालिकांतर्गत रविवार दि .२३ जानेवारी २०२३ रोजी जूना कॉन्फरन्स हॉल , मू .जे.कॉलेज जळगाव येथे संपन्न झालेल्या ” मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती ” या विषयांन्वये डॉ.अशोक कौतिक कोळी मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य स.ना. भारंबे होते. विचार मंचावर प्रमुख अतिथी डॉ. संजय पवार , डॉ.विद्या पाटील ( मराठी विभाग प्रमुख ) प्रा. डॉ. योगेश महाले ( मराठी विभाग ) उपस्थित होते.
वक्ते डॉ.अशोक कोळी पुढील मार्गदर्शनात म्हणाले की,” युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर , रविकिरण मंडळाचे संस्थापक कवी माधव जुलियन ,आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसुत, निसर्गकवी त्र्यंबक ठोंबरे ( बालकवी ) व निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांनी साहित्याला नवी दिशा देऊन समृद्ध केले हे जळगाव जिल्ह्याला भुषणावह आहे. साठोत्तरी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे व साहित्य अकादमी पुरस्कृत ना.धो.महानोर हे हिरे तसेच शशिकांत हिंगोणेकर सारखे साक्षेपी संपादक साहित्यिक , आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सृजनशील चित्रकार मंगेश काळे हे अनमोल हिरेही खानदेशने दिले.मर्ढेकर , केशवसुत , माधव जुलियन साहित्यिक आमचे पूर्वज आहेत आणि बालकवी, बहिणाबाई यांचे आम्ही वारसदार आहोत हे सांगताना आमची छाती फुलून येते.निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी कवितेतून तत्त्वज्ञान ,मानवता व समतेची पेरणी केली.प्रामाणिकपणे लिहिले तर प्रचंड यश मिळते हे त्यांनी आपल्या वाङ्मयीन प्रवासाची सोदाहरण यशोगाथा विनयशीलतेने स्पष्ट करून सांगितले.विद्यार्थ्यांसाठी संशोधन व अभ्यासाच्या वाटा खुल्या व्हाव्या या उद्दिष्टाने पौराणिक साहित्य ,मध्ययुगीन वाङ्मय, आधुनिक वाङ्मय ,स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर साहित्याचा कालखंड , साठोत्तरी व नव्वदोत्तरी साहित्य आणि आजचे साहित्य याचा ओघवता आढावाही सप्रमाण घेतला.दिवंगत गुरुवर्य किसन पाटील , राजा महाजन,कवी गणेश कुडे ,भानू चौधरी, निळकंठ महाजन याचबरोबर अकाली निधन झालेल्या तरुण कवी विरहानंद सारंगी यांचे साहित्यिक कर्तृत्व आवर्जून अधोरेखित केले !
प्रारंभी प्रस्तावनेत महाराष्ट्र शासन मराठी विभाग भाषा संचनालयाचे प्रतिनिधी डॉ. संजय पवार यांनी मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाचा दुर्लक्षित विभाग असला तरी मोठ्या प्रमाणात मराठी भाषा प्रचार , प्रसार व संवर्धनाचे काम कशाप्रकारे विविध प्रकल्प व उपक्रमांनी करतो याची माहिती दिली. तसेच शासनाच्या संपूर्ण विविध प्रशासकीय विभागाचे अधिनियम ,कायदे , टिपण्या व माननीय मुख्यमंत्री, राज्यपाल यांची अभिभाषणे मराठीत तयार करण्याचे काम या विभागातर्फे केले जाते तसेच विविध ज्ञान शाखांना आवश्यक असलेले शब्दकोश व विश्वकोश निर्मितीचेही महत्त्वपूर्ण कामे केले जातात हे सांगितले.
कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भंडारी प्रा.गोपीचंद धनगर , प्रा.कविवर्य संजय हिंगोणेकर, डॉ.जयेश पाडवी, केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोतकर, प्रा.डॉ.अतुल पाटील, प्रा.डॉ.विलास धनवे म.सा.प.जळगाव शाखा कार्यकारी सदस्य विजय लुल्हे , शशिकांत पाटील यांसह महाविद्यालयाचे कला शाखेचे विद्यार्थी व साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.योगेश महाले यांनी केले.

