1 min read

संघर्षाची दामिनी माजी प्राचार्या श्रीमती किमया अनिलराव कदम

Loading

संघर्षाची दामिनी माजी प्राचार्या श्रीमती किमया अनिलराव कदम

मुंबईतील दादर येथील श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या ज्युनिअर कॉलेजच्या माजी प्राचार्या श्रीमती किमया अनिलराव कदम या नुकत्याच आपल्या 35 वर्षाच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. किमया कदम मॅडम म्हणजे प्रभावी वक्त्या उत्तम सूत्रसंचालक व अभिनयाचे व्यासपीठ. त्यांनी मुंबई व नवी मुंबई येथील अनेक शाळा कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेऊन शेकडो उत्तम व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती घडविलेले आहेत. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या कदम मॅडम हे एक चालते बोलते व्यक्तिमत्व विकासाचे व्यासपीठच आहे. अशा या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षित सुकन्येस आमचा मानाचा मुजरा ! व त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळानंतर त्यांच्याकडून अशीच असामान्य समाजासाठी सेवा घडो हीच प्रभु चरणी विनम्र प्रार्थना !! त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो !!!
दादर मुंबईच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या त्या आजीव सभासद असून रत्नागिरी जिल्हा मराठा समाजाच्या सन्माननीय सभासद आहेत. त्याचबरोबर त्या कोकणभूमी डेव्हलपर्सच्याही सन्माननीय सदस्या आहेत. लायन्स क्लबतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त ग्राफॉलॉजी या हस्ताक्षरावरून व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणाऱ्या त्या तज्ञ मार्गदर्शिका आहेत. अनेक प्रकारच्या वकृत्व, कथाकथन स्पर्धांसाठी एक नामांकित परीक्षिका म्हणून ख्यातनाम आहेत. त्याचप्रमाणे प्रभावी वक्तृत्व व सूत्रसंचालन कसे करावे याविषयी त्यांचे युट्युब वर शैक्षणिक व्हिडिओज उपलब्ध आहेत. त्यांचे शिक्षण एम ए, एम एड, डी एस एम झालेले आहे. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व मुंबई रोटरी क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अनेक नामवंत संस्थांच्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालन केलेले आहे. कथाकथन सादरीकरणात त्यांची ‘मास्टरकी’ आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक कवींच्या कवितांचे अभिवाचनही केलेले आहे. मुंबईच्या साहित्य जगात त्यांचे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे.
श्रीमती किमया कदम मॅडम यांचे माहेर दादर-मुंबईचे. त्यांचा जन्मही दादरचा. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव कु.किमया छोटालालजी परळकर. तीन बहिणी व एक भाऊ, आई, वडील असा छोटासा परिवार. किमयाजी वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत नीट बोलूही शकत नव्हत्या. परंतु वडिलांना पूर्ण आत्मविश्वास होता की, किमया आयुष्यात एक नवा इतिहास घडवेल. किमयाजींनी ख्यातनाम वकील व्हावे अशी त्यांची इच्छा होती, परंतु नियतीने त्यांना आदर्श शिक्षिका बनविले. त्यांची आई ही एक साक्षात अन्नपूर्णा होती त्यासोबत ती एक चांगली गायिकाही होती. तोच गुण किमयाजींमध्ये उतरला. लग्नाअगोदर त्या बी.ए., बी.एड. होत्या आणि लग्नानंतर स्वतःचा संसार व्यवस्थित सांभाळून त्यांनी एम ए, एम एड हे शिक्षकी शिक्षण पूर्ण केले. डी एस एम (डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट) हेही शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांची शालेय शिक्षण दादरच्या आय.ई.एस. गर्ल्स स्कूल्स नंबर वन मध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण दादरच्या कीर्ती एम. डुंगूरसी कॉलेजला झाले. तसेच बी. एड. चे शिक्षण दादरच्या गोखले एज्युकेशन सोसायटीत त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्यांना दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर संचलित डी.एड. कॉलेजमध्ये इंग्रजी व मानसशास्त्राच्या अध्यापनाची नोकरी लागली. मुळातच शिकविण्याची व बोलण्याची आवड असल्यामुळेच बघता बघता 35 वर्षे पाच महिन्यांची नोकरी कशी झाली हे कळलेच नाही. सन 1986 पासून ते नोव्हेंबर 2022 पर्यंत अनेक क्षेत्रातील नामवंत विद्यार्थी किमया मॅडम यांनी घडविलेले आहे.
या लेखाचे शीर्षकच मी ‘संघर्षाची दामिनी माजी प्राचार्या श्रीमती किमया अनिलरावजी कदम’ असे टाकलेले आहे. खरंच किमयाजींनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात खूप मोठा संघर्ष केलेला आहे. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला दिसून आले. किमयाजीची व माझी ओळख आठ महिन्यापूर्वीच जून महिन्यात 2022 च्या व्हिनस टूरच्या उत्तराखंड सहलीत झाली होती. आम्हा दोघांना बोलण्याची आवड असल्यामुळे आम्ही दोघेही छान मित्र झालो. माझ्यापेक्षा माझी सौभाग्यवती सौ कल्पना सुतार यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री जमली. श्रीमती किमयाजी व त्यांचे पतीराज कै. अनिलजी कदम हे एकाच महाविद्यालयात शिकत होते. परंतु त्यांची औरंगाबादच्या शैक्षणिक कार्यक्रमात एक वेगळीच ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दिनांक 12 डिसेंबर 1990 रोजी कु. किमया परळकर या सौ. किमया अनिलजी कदम झाल्यात. पतीराजांच्या घरची नाराजी पत्करून या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. वैवाहिक आयुष्यात खूप कठीण प्रसंग आलेत. परंतु दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास होता म्हणूनच सही सलामत आयुष्य गेले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 2002 च्या जुलै महिन्यात किमयाजी मोठ्या अपघातातून वाचल्या. त्यांचा पुनर्जन्मच झाला. श्री स्वामी समर्थांवर त्यांची निस्सीम श्रद्धा असल्यामुळेच त्या या संकटातून बाहेर निघाल्या. एवढ्यावरच नियतीचे समाधान झाले नाही. जुलै 2007 मध्ये त्यांचे पतीराज अनिलरावांना ब्रेन पॅरालिसिस झाला. त्यानंतर ते सहा वर्षे अंथरुणावर पडून होते. त्या काळात किमयाजींनी अनिलरावांची खूप सेवा केली. एकीकडे स्वतःची नोकरी सांभाळून पतीची रुग्ण सेवा करणे ही मोठी तारेवरची कसरत होती परंतु विल पॉवर स्ट्रॉंग असलेल्या किमयाजींनी परिस्थिती पुढे कधीही हार मानली नाही. सहा वर्षाच्या रुग्णसेवेनंतरही दिनांक 18 फेब्रुवारी 2013 रोजी नियतीने पुन्हा घात केला आणि अनिलभाऊ कदम सर्वांना सोडून निघून गेले. किमयाजीवर एक मोठा आघातच होता. परंतु संघर्षाच्या या दामिनीने स्वतःचे दुःख बाजूला ठेवून आपली एकुलती एक सुकन्या अंकिताच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. अंकितानेही आपल्या आईला चांगली साथ दिली व तिनेही आपली बी.एससी.चे शिक्षण पूर्ण करून एमबीए फायनान्स पूर्ण करून नोकरी मिळवली. ती अगोदर कॅप जेमिनी या कंपनीत एच. आर. म्हणून कार्यरत होती आणि आता ती Axentine या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करीत आहे. सन 2015 मध्ये तिचा श्री सुदीप राणे यांच्याशी प्रेमविवाह झाला. तीही आईसारखी खंबीर व समजदार असल्यामुळे त्यांचे सर्वच व्यवस्थित सुरू आहे आज या दोन्हीही मायलेकी या कळवा येथे एकाच सोसायटीमध्ये राहत आहेत. या सर्व संघर्षात किमयाजींसोबत भाऊ-बहिणी व विशेष म्हणजे आईसारखी माया करणारी नणंदबाई होत्या. त्यामुळेच त्यांनी सर्वच परिस्थितीवर मात करून जीवन सार्थकी लावले.
कोणाचेही वाईट करू नका, जगात चांगली माणसं पण आहेत यावर विश्वास ठेवा. प्रत्येक घटना घडते ती विधीलिखितच असते, त्यासाठी कोणालाही दोष देऊ नका, देवावर श्रद्धा ठेवा, त्याच्याकडे काहीही मागू नका, आपल्या आयुष्यात जे काही चांगले आहे ते द्या आणि दुसऱ्याचं चांगलं घ्या. Be Happy Forever.
जय हिंद जय महाराष्ट्र….
सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे व या लेखाचे शब्दांकन श्री योगेश पाने यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *