1 min read

साथी डॉ . दिनकर अण्णा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

Loading

साथी डॉ . दिनकर अण्णा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

अमळनेर – तालुक्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते साथी डॉ . दिनकरराव रामदास भदाणे ऊर्फ गोरगरीबांचे ‘ दिनकर अण्णा ‘ यांचे आज सकाळी मारवड ता. अमळनेर येथे (वय ८४ ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अन्त्ययात्रा उद्या बुधवारी सकाळी १० वाजता मारवड येथून निघेल .डॉ . दिनकर अण्णा हे मुळ धुळे तालुक्यातील बोरकुंड चे मुळ रहिवाशी परंतु अमळनेर तालुका ही त्यांची कर्मभूमी होती. माजी आमदार बापूसाहेब साथी गुलाबराव पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. आपल्या ‘लूना ‘ या लहानशा वाहनावरून अमळनेर तालुक्यात त्यांनी समाजवादी विचारधारेची बिजे रोवली, शेतकरी कष्टकरी , कामगार यांच्या न्याय मागण्यांसाठी अहोरात्र संघर्ष केला, जेल भोगली. ‘आपला माणूस’ म्हणून त्यांची सामान्य जनमानसात प्रातिमा होती .भाषणातून अक्षरश : ते आग ओकत असतर; परंतु त्यांची आग ही श्रमिकांच्या लढ्याला चेतवणारी होती. आपले नेते अल्पकाळासाठी तत्कालीन बलाढ्य काँग्रेस मध्ये गेले परंतु दिनकर अण्णांनी आपला काँग्रेस प्रवेशास नकार दिला. तालुक्यात समाजवाद, जनता दलाच्या बावट्या खाली ‘ एकला चलो रे ‘ आंदोलन सुरू ठेवले . अमळनेर पंचायत सामिती सभापती असतांना त्यांनी केलेली कामे आजही अजरामर आहेत. गुलाब बापूंसोबतच आयुष्यभर ‘लाल टोपी’ हीच अण्णांचीही ओळख होती.. अण्णांच्या पश्चात पत्नी, विजयराव, संजय ही दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मारवड परिसरात गेलो की अण्णांसोबत तासंतास चर्चा गप्पा गोष्टी करण्यात काही औरच मजा होती. प्रथमदर्शनी अण्णा रागीट वाटत पण हळूहळू त्यांच्या कोमल हृदयाचाही अनेकांना अनुभव आला आहे. अण्णा हाडाचे शेतकरी होते म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथांची त्यांना जाणिव होती प्रकर्षाने त्यांच्या भाषणातून प्रखरपणे ती व्यक्त होत होती. अण्णांच्या जाण्याने अमळनेर तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, श्रमि , शोषीत वर्गाचा ‘आपला माणूस ‘ निघून गेला आहे. अण्णा, ‘साथी तेरे अरमानोको मंझिल तक पहुंचायेंगे ‘ अशा प्रतिज्ञेने तालुक्यातील युवा पिढी नक्कीच वाट चाल करेल याविषयी मला खात्री आहे .. अण्णा , खरं म्हणजे आजच्या अंधःकारमय वातावरणात आपले नूसते अंधरूणावर असणे देखील गरजेचे होते . अण्णा आपण आयुष्यभर केलेल्या संघर्षाला सलाम , आपल्या लाल टोपीला आणि एकनिष्ठ राजकारणाला सलाम आपलाच साथी

गो .पि . लांडगे, धुळे

मो. 9422795910


मो. 9422795910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *