1 min read

विद्यापिठ नामांतर सामाजिक अस्मितेचे प्रतिक
मुकुंद सपकाळे

Loading

विद्यापिठ नामांतर सामाजिक अस्मितेचे प्रतिक
मुकुंद सपकाळे

जळगाव – मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराने मराठवाड्याचीच नव्हे तर सार्‍या भारतीय समाजव्यवस्थेची स्वतंत्र अशी ओळख शिक्षणाच्या दृष्टीकोनातून जगभर पसरत नव्या पिढीला आपला नवा विचार, नवी जाणिव, नव्या महत्त्वकांक्षा प्राप्त झाल्याचे लक्षात येते. विद्यापीठ नामांतरासाठी त्याग, बलिदान करीत समाजातील कुजलेल्या मानसिकतेला सडेतोड उत्तर देत विद्यापीठ नामांतर हे सामाजिक अस्मितेचे प्रतिक असल्याचे समाजमनात रूढ करण्यात उपेक्षित वंचितांची चळवळ यशस्वी झाल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे राज्याध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी भिमरमाई प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगल बी. पाटील हे होते. ते याप्रसंगी बोलतांना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यामध्ये शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवल्याने सर्व जाती धर्माच्या युवकांना आपल्या शिक्षणाची वाट समृद्ध करता आली. त्यांचे योगदान भारतीय समाजव्यवस्थेसाठी अलौकीक असे होते. यामुळेच नव्या पिढ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी मराठवाडा विद्यापिठाचे नामांतर करणे अनिवार्य होते, असे मत त्यांनी मांडले.
डॉ. मिलिंद बागूल यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापिठाला देणे हा महापुरूषांच्या विचारजाणिवेच्या इतिहासाला पुढच्या पिढीपर्यंत नेणे होय. विद्यापिठाच्या नामांतर आंदोलनात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी एक नवा इतिहास निर्माण करत शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ नामांतर हे चळवळीसाठी आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने सामाजिक मानसिकता बदलविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर यांनी केले. सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी तर आभार विजय लुल्हे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला युवराज माळी व अनिल सुरळकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमास दिलीप सपकाळे,महेंद्र केदारे,वसंत सूर्यवंशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *