1 min read

शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेला
कर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !!

Loading

शहाजीराजेंच्या स्वराज्य संकल्पनेला
कर्तृत्वाची सलामी देणारी माँ जिजाऊ !!

भारत बराच काळ परकीय शत्रूचा गुलाम देश होता.. येथील मूळ संस्कृती खूप महनीय होती.. ह्या सिंधु संस्कृतीने जगाला ज्ञान देण्याचे महान काम केले आहे..युरोपात निर्माण झालेली प्रबोधनाची सुरुवात भारतात चावार्क, बुद्ध यांनी कधीपासूनच सुरु केलेली होती.. त्यांनी कर्मकांड टाळून शुद्ध विचाराची पेरणी केली.. मातृसत्ताक विचाराची पेरणी झाल्याने पुढे समतेचे वारे वाहण्यास भूमी अनुकूल झाली होती.. पुन्हा भारतात मोगल, डच, पोर्तुगाल, इंग्रज यांची सत्ता आल्याने येथील गटागटातील राजे एक होऊ लागले.. काही मांडलिक झाले.अशाच काळात स्वराज्याची दिव्य कल्पना मांडण्याचा निर्धार मालोजीराजे यांचे सुपुत्र शहाजीराजे यांनी केला..अशा राजाच्या झुंजार अर्धांगिनी माँ जिजाऊ एक धाडसी, कर्तबगार, न्यायी, पराक्रमी, रणरांगिनी होत्या..
अशा माता जिजाऊ साहेबांचा जन्म सरदार लखोजी जाधव व म्हाळ साबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा ह्या गावी झाला.. माँ जिजाऊ साहेबांचे बालपण पिढीजात सरदारकी असलेल्या पराक्रमी घराण्यात झाला.. माँ जिजाऊ सुंदर, विचारी, मुत्सदी, संयमी, प्रसंगावधानी होत्या.. आईकडून नीतिमत्ता, दया, करुणा, पारखी नजर, सद्गुण घेऊन तर वडिलांकडून शौर्य, चलाखी, युद्धनीती, तलवारबाजी, दांडपट्टा , भलाफेक, घोडेस्वारी, न्यायनिवाडा, खऱ्या खोट्या गोष्टीची पडताळणी, समयसूचकता, गुप्तहेरगिरी, लढाईचे डावपेच अशा गोष्टी शिकून सर्वगुणसं पन्न कन्या होती.. अफाट दुर्दम्य इच्छा शक्ती असलेली विरांगणा होती..
मालोजी भोसले हे लखोजी जाधवांकडे देवगिरीच्या यादव घराण्याचा अंत झाल्यावर कामासाठी सरदार म्हणून आले होते.. अशातच माँ जिजाऊ व शहाजी राजे यांचा दोन्ही सरदार जाधव व भोसले घराण्याचा ऋणानुबंधातून नातेसंबंध जुळला.. माँ जिजाऊ श्रीमंत घराण्यातील तरबेज स्त्री होत्या.. अशा माँ जिजाऊ ह्या चार भावाच्या पाठी जन्मलेल्या शूरवीर कन्या होत्या..
राजाप्रमाणे सर्वगुणसंपन्न स्त्री भोसले घराण्याला मिळाल्या.. राजे शहाजी हे निजामशहा, आदिलशहा यांच्याकडे काम करणारे कर्तबगार सरदार होते.. त्यांचा त्या काळात मोठा दबदबा होता.. त्यांनी स्वराज्यावर आलेल्या गुलामीविरुद्ध माँ जिजाऊ व शिवबा यांच्यात प्रेरणा निर्माण केली.. लखोजी जाधवासोबत सर्व कामात लक्ष ठेवणारी माँ जिजाऊ परकीय गुलामीची, अत्याचाराची पूर्ण जाण असलेली महिला होती.. राजे शहाजी परकीय राजांकडे सरदार असतांना इकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजे शिवबाला स्वातंत्र्याचे बाळकडू पाजत होती..
राजे शिवाजी 14 वर्षाचे असतांना त्यांना जहांगिरी राजे शहाजींनी सोपविली होती..माँ जिजाऊच्या सोबत काही पारंगत सरदार पाठविले होते.. माँ जिजाऊवर राजे शहाजींचा विश्वास होता..पारख्या नजरेने माँ जिजाऊ साहेबांनी तानाजी मालुसरे, जिवा महाला, बहिर्जी नाईक, मदारी मेहतर, बाजीप्रभू, शिवा काशीद अशी धुरंधर मावळा उभा केला होता.. प्रत्येक मावळ्याशी अगदी जिवलग संबंध कसे ठेवावे, त्यांना कसे बक्षीस दयावे, त्यांच्या कुटुंबाला कसे सहयोग द्यावा यांचे सर्व ज्ञान शिवबा माँ जिजाऊकडून शिकले होते.. जीवाला जीव देणारे मावळे तयार केले होते.. घराण्यावर सर्वधर्म समभाव हा संस्कार होता तो पुढे माँ जिजाऊ व शिवबाने तोफखाना मुस्लिम मावळ्याच्या स्वाधीन करून सिद्ध केले.. गडावर मस्जिद व पिराचे स्थान तयार करून तथा कबर तयार करून बंधुता जपली.. न्यायासाठी कुणाचीही मुलाहिजा करता कामा नये ही शिकवण माँ जिजाऊंनी राजे शिवाजींना दिली होती.. माँ जिजाऊ युद्धनीतीत तरबेज होत्या.. वेळप्रसंगी तलवार घेऊन युद्धात लढल्या.. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही..
योग्य वेळी समयसूचकता, धोका ओळखून सरदार सोबत पाठविण्याची नीती अप्रतिम होती.. अफजलखान भेटी दरम्यान सय्यद बंडा ह्या दांडपट्टा व तलवार फिरविण्यात पटाईत तरबेज सरदाराचा बंदोबस्त करण्यासाठी जिवा महाला ह्या कौशल्य असलेल्या सरदाराची नियुक्ती करून माँ जिजाउंची हेरगिरीचे अचूक ज्ञान असल्याचे समजते.. त्यामुळेच म्हण तयार झाली “होता जिवा म्हणून वाचला शिवा “.
पन्हाळगडावर राजे शिवाजींना सिद्धी जोहरने वेढले असता माँ जिजाऊ स्वतः तलवार घेतात.. कुणाला न भिणार्या वाघाची त्या वाघिण तर रयतेसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या तडपणाऱ्या वीज होत्या.. माँ जिजाऊंनी सैन्यात जोश, आवेश, उत्साह, उमंग, त्याग, विरश्री, निर्धार निर्माण केला..
कोंढाणा किल्ला हा फार महत्वाचा होता त्यावेळी शिवबाला कोंढाणा जिकूंन घेण्याचा सल्ला दिला.. तानाजी मालुसरे व सूर्याजी यांचे बलिदान देऊन किल्ला आला परंतु तानाजी सारखा सिंह गेला.. तानाजीच्या मुलाचे लग्न स्वतःच्या मुलाप्रमाणे करण्याचा सल्ला शिवबास देऊन त्याच्या पराक्रमाबद्दल परिवाराला नजराणा पाठविला.. माणसे कशी जपावी ह्याचे अचूक ज्ञान माँ जिजाऊंनी शिवबाला दिले..आग्रा सुटकेच्या वेळेस शिवबा व बहिर्जीस योग्य सल्ला देण्याचे काम माँ जिजाऊंनी केले..राजे संकटात असतांना स्वराज्याची घडी विस्कटू दिली नाही.. आक्रमण होऊ दिले नाही… माँ जिजाऊ ह्याच शिवाबाच्या गुरु आहेत.. राजे शहाजी व माँ जिजाऊ यांनी मुलाला शत्रू सोबत कसे लढावे, राज्य कसे चालवावे याचे अचूक ज्ञान दिले.. गनिमी कावा ही पद्धत राजे शहाजी वापरत असलेली नीती होती. राजे शिवबा यांनी कधीही मुहूर्त न पाहता आमावस्या ह्या काळोखात शत्रू्ना चित केले.. हिंदवी स्वराज्य निर्माण न करता रयतेचे राज्य निर्माण केले.. अशा ह्या माँ जिजाऊंना विनम्र अभिवादन…
साहित्यिक सोपान भवरे
. 9284695140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *