आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांची घोषणा ६ जानेवारीला होणार
![]()
आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांची घोषणा ६ जानेवारीला होणार
पात्र तालुका संघांनी संपर्क साधावा : मराठी पत्रकार परिषदेचे आवाहन

मुंबई- मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचे २०२२ चे पुरस्कार वितरण आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा फेब्रुवारी 2023 मध्ये चाकूर (जि. लातुर) येथे करण्याचे नियोजन आहे.. त्यासाठी आदर्श तालुका आणि आदर्श जिल्हा पत्रकार संघाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.. ही जबाबदारी परिषदेचे उपाध्यक्ष आणि विभागीय सचिवांवर सोपविण्यात आली आहे.. उपाध्यक्ष आणि विभागीय सचिवांनी आपल्या विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका पत्रकार संघाच्या नावाची शिफारस परिषदेकडे करायची आहे.. यातून पुरस्कार प्राप्त संघांची अंतिम निवड परिषदेची पुरस्कार निवड समिती करील.. या पुरस्कारांची घोषणा पत्रकार दिनी म्हणजे ६ जानेवारी 2023 रोजी केली जाईल.. तालुका संघांची परिषदेकडे शिफारस करताना उपाध्यक्ष आणि विभागीय सचिवांनी प्रामुख्याने संघाचं संघटनात्मक कार्य, संघांचे आर्थिक व्यवहार, परिषदेच्या उपक्रमातील सहभाग, नियोजित वेळेत संघांच्या निवडणुका होतात की नाही?, सामाजिक उपक्रम या गोष्टींचा विचार करावा. असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले आहे.
परिषदेचे हे राज्यस्तरीय पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जातात.. राज्यभरातून ८०० च्या वरती पत्रकार आणि तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित असतात.. यापुर्वी पाटण, वडवणी, नागपूर, पालघर, गंगाखेड आदि ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळे झालेले आहेत.. यावेळेस लातुर जिल्ह्यातील चाकूर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.. चाकूर पत्रकार संघाने तशी विनंती परिषदेकडे केली आहे.. तेव्हा हा पुरस्कार मिळविण्यास आपण पात्र आहोत असे ज्या तालुका संघांना वाटते त्यांनी तातडीने आपले विभागीय सचिव आणि उपाध्यक्षांशी संपर्क करून आपली प्रवेशिका त्यांच्याकडे सुपूर्द करावीत असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेतर्फे करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातील तालुका संघांनी नाशिक विभागीय चिटणीस रोहिदास हाके (मो. 9765201877) यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र यांनी केले आहे.
मो. 94227 95910

