व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला पत्रकार अधिवेशनाला सुरुवात , लातूरमध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचा दोन दिवसीय मेळावा; महिला पत्रकारितेला बळ देण्यासाठी सकारात्मक पाऊल , राज्यभरातून अनेक पत्रकार महिला उपस्थित

लातूर, प्रतिनिधी : पत्रकारितेला नवी ऊर्जा देतानाच महिला पत्रकारितेला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि प्रतिष्ठित बनविण्याच्या उद्देशाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगच्या वतीने लातूर येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका सुनंदाताई पवार, प्रसिद्ध वृत्तनिवेदिका व पत्रकार फराह खान आणि लातूर जिल्हा परिषद सदस्या आशा भिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. महिला पत्रकारांच्या कर्तृत्वाचा गौरव, त्यांच्या समस्या आणि आव्हानांवर चर्चा तसेच पत्रकारितेतील त्यांचे स्थान अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय संघटक व सर्व विंगप्रमुख रश्मी मारवाडी, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, उपाध्यक्ष संगम कोटलवार आणि महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे अधिवेशनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी ‘व्हॉईस ऑफ मीडिया वर्ल्ड’ या मुखपत्राच्या महिला पत्रकार अधिवेशन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील महिला पत्रकारांचा जीवनप्रवास, त्यांचे संघर्ष, कर्तृत्व आणि पत्रकारितेतील योगदान यांचा वेध या विशेषांकातून घेण्यात आला आहे. कार्यकारी संपादक रश्मी मारवाडी आणि वैशाली पाटील यांनी महिला पत्रकारांच्या कार्याचा आणि अनुभवांचा शब्दरूपात मागोवा घेतला आहे. महिला पत्रकारांच्या कार्याची दखल घेणारा आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा देणारा हा विशेषांक अधिवेशनाचे एक महत्त्वाचे आकर्षण ठरला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्हॉईस ऑफ मीडियाची वाटचाल, संघटनेचे कार्य आणि पत्रकारितेतील बदलती आव्हाने याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. महिला पत्रकारांना संघटित व्यासपीठ मिळणे, त्यांच्यात परस्पर संवाद आणि सहकार्य वाढणे तसेच त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी नव्या संधी उपलब्ध होणे, या दृष्टीने अशा अधिवेशनांची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
आजच्या बदलत्या माध्यमविश्वात महिला पत्रकारांना केवळ व्यावसायिक स्पर्धेलाच सामोरे जावे लागत नाही, तर सुरक्षितता, कामाच्या ठिकाणचे प्रश्न, आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांसारख्या अनेक आघाड्यांवरही संघर्ष करावा लागतो. या पार्श्वभूमीवर महिला पत्रकारांचे हक्क, त्यांची सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक सक्षमीकरण यांवर विचारमंथन घडवून आणणे, हा या अधिवेशनामागील प्रमुख उद्देश आहे. महिला पत्रकारांना सक्षम करण्यासाठी सकारात्मक दिशा देणारे आणि त्यांच्या प्रश्नांना संघटित आवाज देणारे व्यासपीठ म्हणून या अधिवेशनाकडे पाहिले जात आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण सहा ते आठ सत्रांच्या माध्यमातून महिला पत्रकारितेशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. अनुभवी महिला मार्गदर्शकांच्या सहभागातून पत्रकारितेतील संधी, आव्हाने, अधिकार आणि स्वावलंबनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. पहिल्या दिवसाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून, रविवारी अधिवेशनाचा समारोप होईल.
महिला पत्रकारांच्या अनुभवांना व्यासपीठ देणे, त्यांच्या प्रश्नांवर सामूहिकपणे विचार करणे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांना अधिक सक्षमपणे वाटचाल करता यावी यासाठी प्रेरणा देणे, या उद्देशाने लातूरच्या भूमीत सुरू झालेला हा दोन दिवसीय मेळावा महिला पत्रकारितेच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरण्याची अपेक्षा आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्...