राष्ट्रसेवेच्या ३५ वर्षांच्या गौरवशाली पर्वाला सलाम!  सैन्यातून निवृत्त झालेल्या सूर्यकांत पंचगल्ले यांचा उदगीरमध्ये अभूतपूर्व सत्कार
1 min read

राष्ट्रसेवेच्या ३५ वर्षांच्या गौरवशाली पर्वाला सलाम! सैन्यातून निवृत्त झालेल्या सूर्यकांत पंचगल्ले यांचा उदगीरमध्ये अभूतपूर्व सत्कार

Loading

राष्ट्रसेवेच्या ३५ वर्षांच्या गौरवशाली पर्वाला सलाम!

सैन्यातून निवृत्त झालेल्या सूर्यकांत पंचगल्ले यांचा उदगीरमध्ये अभूतपूर्व सत्कार

उदगीर प्रतिनिधी : देशसेवा हीच ईश्वरसेवा मानत भारतीय सैन्यदल आणि वायुदलात तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्कलंक आणि कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अतनूर (ता. जळकोट) येथील सुपुत्र तथा सैनिक सूर्यकांत वैजनाथराव पंचगल्ले यांचा उदगीर येथे पंचगल्ले परिवार, जिव्हाळा ग्रुप आणि मित्र परिवाराच्या वतीने जल्लोषपूर्ण व संस्मरणीय सोहळ्यात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि मानपत्र देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

सूर्यकांत पंचगल्ले यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात सुरुवातीची २२ वर्षे भारतीय सैन्यदलात (आर्मी) सेवा बजावली. या काळात जम्मू, राजस्थान, पंजाब, लडाख, पुंछ यांसारख्या देशाच्या अतिसंवेदनशील आणि आव्हानात्मक भागांमध्ये सुरक्षेच्या विविध विभागांत त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यानंतर भारतीय वायुदलाच्या डिफेन्स सेक्युरिटी विभागात १३ वर्षे त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. अखेर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी बिदर येथील तळावरून ते सेवानिवृत्त झाले.

जल्लोषात स्वागत; औक्षणाने भावनिक क्षण

दीर्घ सेवेनंतर सूर्यकांत पंचगल्ले उदगीर येथील आपल्या स्वगृही परतत असल्याने पंचगल्ले परिवार आणि जिव्हाळा ग्रुपच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यांच्या आगमनावेळी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. परिवारातील महिलांनी आकर्षक रांगोळी काढून औक्षण केले. या भावनिक स्वागत सोहळ्यामुळे वातावरणात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

जिद्द, चिकाटी आणि परिश्रमातून देशसेवेचा मान — डॉ. अनिल भिकाने

स्वागत सोहळ्यात पशुशल्य चिकित्सक डॉ. अनिल भिकाने यांनी मार्गदर्शन करताना मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर देशसेवेचा बहुमान कसा मिळविला, याचा त्यांच्या संघर्षमय प्रवासाशी संदर्भ देत गौरवपूर्ण आढावा घेतला. पंचगल्ले यांच्या प्रदीर्घ सेवेला सलाम करत त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

देशसेवा करा, शिस्तप्रिय बना आणि व्यसनांपासून दूर राहा’ — सूर्यकांत पंचगल्ले

सत्काराला उत्तर देताना सूर्यकांत पंचगल्ले यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. देशसेवा करताना आलेली आव्हाने, लष्करी शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यावर त्यांनी प्रकाश टाकला.

विशेष म्हणजे, आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता त्यांनी अत्यंत आदर्श, संयमी आणि शिस्तबद्ध जीवन जगले. युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “देशसेवा करा, शिस्तप्रिय बना आणि व्यसनांपासून दूर राहा. सेवानिवृत्तीनंतर उरलेले आयुष्य गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व एकोपा निर्माण करण्यासाठी समर्पित करेन.”

कुटुंब आणि देशसेवेची सांगड घालण्याचे आव्हान

प्रा. विजया बेलकेरी यांनी कुटुंबात राहून देशसेवा करताना येणाऱ्या विविध अडचणी, जबाबदाऱ्या आणि त्यांची योग्य सांगड कशी घालावी लागते, याबाबत आपले विचार व्यक्त केले.

या देशभक्त सैनिकाच्या गौरव सोहळ्याने उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेमाची नवी भावना जागृत झाली. सूर्यकांत पंचगल्ले यांची ३५ वर्षांची देशसेवा, त्याग, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा ही नव्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यास जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, प्रमुख पाहुणे डॉ. अनिल भिकाने (समन्वयक, जिव्हाळा ग्रुप), श्री. विठ्ठल फुलसे मामा, श्री. देवदासजी नादरगे (माजी अध्यक्ष, जिव्हाळा ग्रुप), श्री. दशरथ शिंदे (माजी अध्यक्ष), जिव्हाळा ग्रुपचे सदस्य श्री. सचिन बापूरे, श्री. हावगी आचारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमाकांत बनशेलकीकर यांनी केले. ऑनलाइन माध्यमातून श्री. अशोक हले, श्री. बाबुराव वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. वैजनाथ पंचगल्ले, शिवराज पंचगल्ले, बाबुराव पंचगल्ले, बंधू प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्राध्यापिका विजया बेलकेरी, गुरुवर्य प्रा. महादेव गंदीगुडे, सोमनाथ निरणे यांच्यासह आप्तेष्ट, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.

३५ वर्षे राष्ट्रसेवेला वाहून घेतलेल्या या कर्तृत्ववान सैनिकाचा सन्मान म्हणजे देशसेवा, शिस्त आणि राष्ट्रभक्तीच्या मूल्यांचा गौरवच ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *