प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून भारतीय जवानांसाठी राखी निर्मिती, करुणा क्लबच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम
![]()
प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून भारतीय जवानांसाठी राखी निर्मिती
करुणा क्लबच्या माध्यमातून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूल, अमळनेर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत करुणा क्लबच्या माध्यमातून भारतीय जवानांसाठी राखी निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून त्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांना पाठविल्या.
भारतीय सैनिक देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करीत असल्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. देशरक्षक जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच त्यांच्याशी आपुलकीचा बंध निर्माण व्हावा, या उद्देशाने करुणा क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यासाठी मागील आठवड्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “आपण रक्षाबंधन साजरे करतो; मात्र देशाच्या सीमेवर तैनात असलेले भारतीय जवान हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करू शकतात का?” असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. त्यातून जवानांना राखी पाठविण्याची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. राखी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य व निर्मितीची पद्धत याबाबत कला विभाग प्रमुख डी. एन. पालवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
शनिवारी विद्यार्थ्यांनी घरून विविध साहित्य आणून शाळेत स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेचा संदेश दिला.
राख्या तयार झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी एनसीसी कार्यालयाला भेट देऊन भारतीय जवानांना राख्या पाठविण्यासाठी आवश्यक पत्ते मिळविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या सीमेवर तैनात भारतीय जवानांना पाठविण्यात आल्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशरक्षक जवानांपर्यंत आपुलकीचा धागा पोहोचविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
या उपक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक ए. डी. भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. करुणा क्लबच्या या उपक्रमाचे संचालन व राखी निर्मितीचे प्रशिक्षण कला विभाग प्रमुख डी. एन. पालवे यांनी केले.
उपक्रमासाठी शिक्षक सचिन अहिरे, कृष्णा कोळी, निखिल पाटील, जयश्री पाटील, सुहास खांजोडकर, नम्रता दोरकर, प्रसाद बुवा व सागर पवार यांनी सहकार्य केले.

