खरगे यांच्या कथित अपमानाचा अमळनेर काँग्रेसकडून निषेध , संघटन बळकटीकरणासह आगामी जि.प.-पं.स. निवडणुकांच्या तयारीवर मंथन
1 min read

खरगे यांच्या कथित अपमानाचा अमळनेर काँग्रेसकडून निषेध , संघटन बळकटीकरणासह आगामी जि.प.-पं.स. निवडणुकांच्या तयारीवर मंथन

Loading

खरगे यांच्या कथित अपमानाचा अमळनेर काँग्रेसकडून निषेध

संघटन बळकटीकरणासह आगामी जि.प.-पं.स. निवडणुकांच्या तयारीवर मंथन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा बुधवारी सकाळी ११ वाजता साने गुरुजी विद्यालय, अमळनेर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संघटन बळकटीकरण, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका, युवकांचा पक्षातील सहभाग तसेच विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या जागेचे कथित शुद्धीकरण केल्याच्या घटनेचा सभेत तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकारामुळे खरगे यांचा अपमान झाल्याचे सांगत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी जाहीर निषेधाचा ठराव मांडला. हा ठराव उपस्थितांनी एकमताने मंजूर केला.

संघटन बांधणीवर भर
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस
संदीप घोरपडे यांनी संघटना बांधणीबाबत मार्गदर्शन करतांना बी.एल.ए. (ब्लॉक लेव्हल एजंट) यांची भूमिका तसेच संघटनेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचार मांडले. गावागावांत संघटन मजबूत करून युवकांना पक्षाच्या विचारधारेसोबत जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रा. श्याम पवार यांनी तालुक्यात काँग्रेसची परिस्थिती चांगली असल्याचे नमूद केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस भवनाच्या जागेबाबत माहिती
काँग्रेस चे गजेंद्र साळुंखे यांनी अमळनेर काँग्रेस भवनाच्या जागेबाबत माहिती दिली. जागेवरील उगवलेली झाडे तसेच बांधकामाचा मलबा साफ करण्याचे काम पूर्ण झाले असून, जागेच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय, अमळनेर येथे अर्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गावागावांत संघटन वाढविण्याचे आवाहन

ॲड. रज्जाक शेख यांनी वाड्या-वस्त्यांसह खेड्यापाड्यांमध्ये जाऊन संघटना मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. नवयुवक व तरुणांना मोठ्या प्रमाणावर काँग्रेस संघटनेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सर्वसाधारण चर्चेत ज्येष्ठ काँग्रेस नेते बन्सिलाल भागवत, पी. वाय. पाटील, राजेंद्र भिकन पाटील, रोहिदास कापडे, कन्हैयालाल कापडे, रामकृष्ण पाटील आणि दिलीप साहेबराव पाटील यांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर आपली मते मांडली.

सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम

सभेनंतर ईद सणाच्या शुभेच्छांचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच निम व करणखेडे या गावांच्या जिल्हा बँक मतदानासाठी विकास सोसायटीचे ठराव अनुक्रमे अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे चिटणीस राजेंद्र पोलाद पाटील व ताराचंद सूर्यवंशी यांच्या नावाने झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. गुणवंत पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, पितांबर पाटील आणि भगवान संदानशिव यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
सभेस राजू भाट, सईद तेली, शालिग्राम पाटील, अशोक पाटील, लोटन पाटील, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुधाकर भैसे यांनी आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने खेळीमेळीच्या वातावरणात सभेचे कामकाज समाप्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *