पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता  पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर
1 min read

पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

Loading

पत्रकारितेच्या सक्षमीकरणाचा निर्धार; व्हॉईस ऑफ मीडिया च्या राष्ट्रीय अधिवेशनाची उत्साहात सांगता

पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

नवी दिल्ली –
देशभरातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणणारे, पत्रकारितेच्या वर्तमान आणि भविष्यातील दिशेचा वेध घेणारे व्हाईस ऑफ मीडिया आणि व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय मंच यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, बदलते माध्यमविश्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संघटन विस्तार आणि पत्रकार कल्याण या विषयांवर सखोल चर्चा करत अनेक महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
नवी दिल्ली येथील विश्व युवा केंद्रात झालेल्या या अधिवेशनाला देशातील विविध राज्यांतील पत्रकार, पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक वानखडे यांच्यासह विविध मान्यवरांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
अधिवेशनातील विशेष सत्रात माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ गगनजी महोत्रा यांनी आधुनिक पत्रकारितेत समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेसाठी समाजमाध्यमे अत्यंत प्रभावी साधन ठरत असून त्यांचा जबाबदारीने आणि परिणामकारकपणे वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सन २०१४ नंतर समाजमाध्यमांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून पत्रकारांनी पारंपरिक माध्यमांसोबत आधुनिक माध्यमांचाही प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. दृकश्राव्य माध्यमे, समाजमाध्यमे आणि अन्य आधुनिक साधनांच्या माध्यमातून पत्रकारांना व्यापक जनसंपर्क साधण्याबरोबरच स्वतःचे स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याची संधी उपलब्ध होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पत्रकारांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात केली तर पत्रकारितेची विश्वासार्हता आणि प्रभाव अधिक वाढेल, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक वानखडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पत्रकारांच्या हक्कांसाठी, अडचणींसाठी आणि कल्याणासाठी हिमालयासारखी भक्कमपणे उभी राहणारी व्हाईस ऑफ मीडिया ही एकमेव जागतिक स्तरावर कार्य करणारी संघटना आहे. अनेक संघटना अस्तित्वात असल्या तरी पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करणारी आणि देश-विदेशातील पत्रकारांना एकत्र आणणारी ही संघटना वेगळी ओळख निर्माण करत आहे.
पत्रकारिता कधीही संपणार नाही, पत्रकारांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. मात्र बदलत्या काळात पत्रकारांसमोर अनेक प्रकारची आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत पत्रकारांनी आपल्या मूल्यांशी तडजोड न करता सत्य, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता जपली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिवेशनात पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे, सामाजिक संरक्षण, आरोग्य सुविधा, शिक्षण, कौशल्यविकास, निवृत्तीविषयक प्रश्न, पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर उपाययोजना, आधुनिक पत्रकारितेसाठी प्रशिक्षण आणि संघटन विस्तार यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व विषयांवरील महत्त्वपूर्ण ठराव उपस्थित प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केले.
राष्ट्रीय स्तरावरील संघटन विस्तारासाठी विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या राज्यात संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्ष कौशिक अधिकारी, बन्सीलाल पांचाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, बिहारचे राजेश दुबे, आसामच्या सपना दत्त, उत्तर प्रदेशच्या रेखा शर्मा, गुजरातचे कन्नूभाई सोलंकी, पश्चिम बंगालचे सुमंत गांगुली, राजस्थानचे गोपाल गुप्ता, मध्य प्रदेशचे दीपक शर्मा, हिमाचल प्रदेशचे विकास शर्मा, नागालँडचे मॅक्स मझीस, मणिपूरचे जितेन, उत्तराखंडचे बेनीराम, सुनील जोसेफ आदींनी संघटना विस्तारासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र शिक्षण विभागाचे प्रमुख चेतन कात्रे यांनी पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, तर आरोग्य विभागाचे प्रमुख भीमेश मुतुला यांनी पत्रकारांसाठी आरोग्यविषयक योजनांवर मार्गदर्शन केले. याच अधिवेशनात दिगंबर महाले यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

देशभरातून आलेल्या पत्रकारांचा यावेळी अशोकराव वानखेडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. पत्रकारांच्या सक्षमीकरणासाठी, संघटन बळकटीसाठी आणि आधुनिक काळातील पत्रकारितेला नवी दिशा देण्यासाठी हे राष्ट्रीय अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केली.

अधिवेशनात मंजूर झालेले प्रमुख ठराव

राष्ट्रीय अधिवेशनात पत्रकारांच्या सर्वांगीण हितासाठी महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू करणे, पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापूर्वी पडताळणी समितीची स्थापना, पत्रकारांसाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा व आयुष्मान भारत योजनेचा लाभ, अपघाती विमा व आर्थिक सहाय्य, पेन्शन वाढ आणि डिजिटल पत्रकारांनाही पेन्शनचा लाभ, पत्रकारांसाठी परवडणारी घरे व प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन उभारणे, राष्ट्रीय पत्रकार कल्याण महामंडळाची स्थापना, नियमित कौशल्य विकास व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रशिक्षण, डिजिटल माध्यमांसाठी स्वतंत्र कायदा, दुर्गम भागातील पत्रकारांना विशेष संरक्षण, पत्रकारांच्या हक्कांचे कायदेशीर संरक्षण, लघु वृत्तपत्रांना प्रोत्साहन, मजीठिया वेतन आयोगाची प्रभावी अंमलबजावणी, भारतीय प्रेस परिषदेत व्हाईस ऑफ मीडियाला प्रतिनिधित्व, रेल्वे प्रवास सवलत पूर्ववत सुरू करणे तसेच जिल्हास्तरावर पत्रकार संघटनांमध्ये नियमित समन्वय बैठक घेण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.
——
फोटो कँप्शन

दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस, राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच संघटनेच्या कोअर टीमचे सदस्य सक्रियपणे सहभागी झाले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *