“जिद्दीचा प्रवास… संघर्षातून घडलेलं तेजस्वी व्यक्तिमत्त्व!” (डी. ए.) सोनवणे सर
![]()
“जिद्दीचा प्रवास… संघर्षातून घडलेलं तेजस्वी व्यक्तिमत्त्व!”
(डी. ए.) सोनवणे सर
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील पातोंडा या साध्या खेड्यात १ जून १९६८ रोजी जन्मलेले दंगलदास आधार सोनवणे उर्फ डी. ए. सोनवणे सर… नाव जरी साधं असलं तरी त्यामागे दडलेलं व्यक्तिमत्त्व मात्र असामान्य! वडील कै. आधार धुडकू सोनवणे व आई कै. दगूबाई सोनवणे यांच्या संस्कारातून घडलेलं हे व्यक्तिमत्त्व आज ३४ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित सेवेनंतर ३१ मे २०२६ रोजी सेवापूर्तीच्या उंबरठ्यावर उभं आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षणाची वाट चोखाळताना त्यांनी हार मानली नाही. प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथून बी.ए. मध्ये विभागात प्रथम येण्याचा मान मिळवला, तर धनाजी नाना बी.एड कॉलेज, खिरोदा येथून गुणवत्तेवर बी.एड पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच शिष्यवृत्ती मिळवून स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करणाऱ्या या जिद्दी प्रवासाला ३ ऑक्टोबर १९९२ रोजी श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर, अमळनेर येथे शिक्षक म्हणून सुरुवात झाली.
“कामातून वागणूक दिसे” हा त्यांचा जीवनमंत्र! उपक्रमशीलता, शिस्त, आणि विद्यार्थ्यांविषयी अपार प्रेम या गुणांनी त्यांनी शिक्षकी पेशाला खरी प्रतिष्ठा दिली. पुढे श्री विजय नाना पाटील आर्मी स्कूल, अमळनेर येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विज्ञान प्रदर्शनात महत्त्वाची भूमिका, पट नोंदणी पंधरवाडा, आणि महामानवांच्या जयंती-पुण्यतिथींच्या माध्यमातून मूल्यसंस्कार रुजवणे—हे सर्व उपक्रम त्यांच्या कार्यशैलीची साक्ष देतात.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि वक्तृत्व विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. “विद्यार्थी घडवणे म्हणजे राष्ट्र घडवणे” हा विचार त्यांनी कृतीतून जपला. त्यांच्या हातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत, हेच त्यांच्या कार्याचं खरं यश!
सोनवणे सरांचं व्यक्तिमत्त्व केवळ शाळेपुरतं मर्यादित नाही. समाजकार्याचीही त्यांना तितकीच आवड! मंगळ ग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त म्हणून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्यकर्ते म्हणून, तसेच ओबीसी शिक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनाला नवी उभारी मिळाली. राज्याध्यक्ष विलासराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून दिलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे निभावली.
“मोठं मन, मोठा मित्रपरिवार” ही त्यांची ओळख! पैशापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व देणारा, मित्रांना जपणारा, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा हा माणूस आजही सर्वांचा लाडका आहे. पशुपक्ष्यांवर प्रेम, साधेपणा, आणि सदैव हसतमुख राहणं ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत.
त्यांच्या यशामागे त्यांची पत्नी सौ. सुशीला (आहिरे) मॅडम यांचा मोठा वाटा आहे. स्वतः उपशिक्षिका असलेल्या मॅडम यांनी नेहमी सावलीसारखी साथ दिली. या दांपत्याचं प्रेमळ, समंजस आणि आनंदी नातं अनेकांसाठी आदर्श आहे. मुलगा विपुल—पुण्यात आयटी इंजिनिअर, तर मुलगी ऋचा—इंजिनिअरिंग शिक्षण घेत आहे; ही त्यांच्या कुटुंबाची शैक्षणिक परंपरा दर्शवणारी अभिमानास्पद बाब आहे.
डॉ. डिगंबर महाले सर यांना ते आपलं प्रेरणास्थान मानतात. त्यांच्या एका फोनमुळे मिळालेली नोकरी आज आयुष्यभराची दिशा ठरली—ही कृतज्ञतेची भावना ते नेहमी जपतात.
शिक्षणातून प्रपंच, आणि प्रपंचातून परमार्थ—अध्यात्माकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. सेवेत असताना कधीही थकवा न जाणवणारे, प्रत्येक काम वेळेवर आणि मनापासून करणारे सोनवणे सर आजही तितकेच कार्यक्षम वाटतात.
३४ वर्षांच्या या उज्ज्वल सेवेला सलाम करतांना, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधान लाभो, हीच प्रार्थना! संत गजानन महाराजांच्या कृपेने त्यांचे पुढील जीवन अधिक आनंदमय आणि समाधानकारक होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
— शब्दांकन : ईश्वर महाजन, पत्रकार, अमळनेर
📞 9860352960

