महाराष्ट्रात खळबळ : मनोहर मामा भोसले अटकेत; भक्तांकडून पैसे उकळल्याचे गंभीर आरोप पुण्यात झालेल्या अटकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या
![]()
महाराष्ट्रात खळबळ : मनोहर मामा भोसले अटकेत; भक्तांकडून पैसे उकळल्याचे गंभीर आरोप
पुण्यात झालेल्या अटकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या
पुणे / सोलापूर प्रतिनिधी :
स्वतःला संत बाळूमामांचे भक्त म्हणून ओळख निर्माण करणारे मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांना अखेर सोलापूर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस पथकाने ही कारवाई केली. पुण्यात झालेली ही अटक वरिष्ठ पातळीवरील आदेशाने केल्याचे समजते.
झालेल्या कारवाईमुळे अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या आधी बारामती पोलिस स्टेशनमध्ये भोसले यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना अटक ही झाली होती. अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
मनोहर भोसले हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील रहिवासी असून, त्यांनी गेल्या काही वर्षांत अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. संत बाळूमामांच्या नावाने मठ व मंदिर उभारून त्यांनी विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना उपाय सुचवण्याचा दावा केला होता. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होत होती.
मात्र, प्रसिद्धीसोबतच त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. भक्तांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आले. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील ग्रामस्थांनी आणि देवस्थानाशी संबंधित व्यक्तींनी मनोहर भोसले यांच्यावर संत बाळूमामांचे नाव वापरून लोकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. याबाबत ग्रामपंचायतीने निषेध ठरावही मंजूर केला होता.
याशिवाय, भोसले यांनी स्वतःला संत बाळूमामांचे वंशज असल्याचे भासवून लोकांचा विश्वास संपादन केल्याचाही आरोप करण्यात आला होता, जरी त्यांनी नंतर हा दावा फेटाळला होता. त्यांच्या नातेवाईकांकडूनही आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रारी समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले.
दरम्यान, उंदरगाव येथील त्यांचा मठ आणि मंदिर काही काळापासून बंद असल्याचेही दिसून आले होते. मनोहर भोसले बेपत्ता झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या; मात्र त्यांनी या अफवा फेटाळल्या होत्या.
आता अटकेनंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सोलापूरसह इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यांच्या आधारे त्यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील सत्य काय, हे आगामी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. आता अजून एक भोंदू बाबा पुढे आला आहे. अनेक बडे नेते बुवा च्या गळाला लागले होते याचा तपास पोलीस करीत आहेत.

