“उन्हात जनगणना म्हणजे तारेवरची कसरत!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा निवडणूक आयोगाला थेट इशारा ,  ४४ अंश तापमानात दुहेरी ड्युटीचा ताण; जनगणना जूनमध्ये घ्यावी, BLO शिक्षकांना सूट द्यावी अशी मागणी
1 min read

“उन्हात जनगणना म्हणजे तारेवरची कसरत!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा निवडणूक आयोगाला थेट इशारा , ४४ अंश तापमानात दुहेरी ड्युटीचा ताण; जनगणना जूनमध्ये घ्यावी, BLO शिक्षकांना सूट द्यावी अशी मागणी

Loading

“उन्हात जनगणना म्हणजे तारेवरची कसरत!” — शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा निवडणूक आयोगाला थेट इशारा

४४ अंश तापमानात दुहेरी ड्युटीचा ताण; जनगणना जूनमध्ये घ्यावी, BLO शिक्षकांना सूट द्यावी अशी मागणी

मुंबई/प्रतिनिधी :
राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांवर टाकण्यात आलेल्या जनगणना ड्युटीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४४ अंशांपर्यंत पोहोचले असताना, अशा भीषण उन्हात जनगणनेचे काम करणे म्हणजे शिक्षकांसाठी अक्षरशः “तारेवरची कसरत” ठरत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर कोकणचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. सध्या अनेक शिक्षक BLO (Booth Level Officer) म्हणून आधीच जबाबदारी सांभाळत असून, शालेय कामकाजासोबतच निवडणूक संबंधित कामेही ते प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा त्यांच्यावर जनगणनेची जबाबदारी टाकणे म्हणजे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
म्हात्रे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “शिक्षक हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून राष्ट्रहिताची अनेक कामे निष्ठेने करतात. मात्र सतत अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा टाकल्याने शिक्षकांची पिळवणूक होत आहे,” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
याशिवाय सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक मूळ गावी गेलेले असल्याने, जनगणना करताना माहिती संकलनात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. घराघरांत नागरिक अनुपस्थित असल्याने शिक्षकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागणार आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

त्यामुळे २ मे ते ३१ मे दरम्यान होणारी जनगणना पुढे ढकलून १ जून ते १० जून या कालावधीत घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच जे शिक्षक आधीच BLO म्हणून कार्यरत आहेत, त्यांना जनगणना ड्युटीतून कार्यमुक्त करावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
सध्या राज्यभरातील शिक्षकांमध्ये या निर्णयाविरोधात नाराजीची लाट उसळत असून, निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *