विष्णू पाटील यांनी गावपण जपले- ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
![]()
विष्णू पाटील यांनी गावपण जपले… ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
पुणे भोसरी(दिघी): जीवनामध्ये प्रत्येकाने समाजऋण फेडण्याचा यथाशक्ती प्रयत्न करून अडलेल्या व्यक्तींना सहकार्याची भावना ठेवावी. तसेच गुणीजनांच्या गुणांची पारख करावी त्यांना प्रोत्साहन द्यावे,व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन करावे. कार्यसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. आपली सुखदुःखे आप्तस्वकीयांसोबत वाटून घेण्याचा प्रयत्न करावा, हाच धागा पकडून विष्णू पाटील यांनी विदर्भातील कुंडा सारख्या ग्रामीण भागात राहून खडतर परिस्थितीतून शेती करून मुलांवर योग्य संस्कार केले. व आज श्री संतआदिशक्ती मुक्ताई देवस्थान सेवक म्हणून ते वारकरी सांप्रदायाची पताका घेऊन भक्तीरसाचा मळा फुलवीत आहेत.त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून विदर्भातील ग्रामीण भागातून येऊन सुद्धा आज पुणे दिघी येथेते समाजऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहेत. श्री विष्णू पाटील यांनी गावपण जपले ,असे मत ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री विष्णू नामदेव पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान भोसरी दिघी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उरुळी कांचन येथील जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी श्री विष्णू पाटील यांना पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठान उरुळी कांचन व डॉ. रवींद्र भोळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मानपत्र प्रदान केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ भोळे पुढे म्हणाले की पुण्यासारख्या या अत्यंत सर्व क्षेत्रात प्रगल्भ शहरांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक पोट भरण्यासाठी आलेत,वास्तव्यात आलेत. काही लोक खूप मोठे उद्योजकही झालेत ,अनेकांनी आपले संस्कार मांडलेत. तरी अजून सुद्धा अनेकांनी आपले गाव पण सोडले नाही. सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामीलकीचे जाण व भान ठेवून प्रत्येकाने समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करावा ,असेही मत डॉ. भोळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान अध्यक्ष अमोल विष्णू पाटील, नितीन विष्णू पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अण्णासाहेब पाटील, नितीन बोंडे, यांचे सह अनेक मान्यवर, उपस्थित होते. ह्यावेळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

