देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी; जिल्हा परिषदेसमोर ७८०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
1 min read

देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी; जिल्हा परिषदेसमोर ७८०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Loading

देशव्यापी लाक्षणिक संप यशस्वी; जिल्हा परिषदेसमोर ७८०० अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

जळगांव प्रतिनिधी

दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपाला जळगाव जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे ७ हजार ८०० अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संपात सक्रिय सहभाग नोंदवत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला कर्मचाऱ्यांनी एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले.
केंद्र सरकारने विद्यमान कामगार हिताचे कायदे रद्द करून चार नवीन श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हा संताप व्यक्त करण्यात आला. या श्रम संहितांना कामगार व कर्मचारीविरोधी ठरवत त्या तातडीने रद्द कराव्यात, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. समन्वय समितीच्या निर्णयानुसार जिल्हाभरातील सेविका व मदतनीसांनी एकदिलाने संपात सहभाग घेत आंदोलन यशस्वी केले.
आंदोलनादरम्यान कामगारविरोधी कायदे रद्द करणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करणे, गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविकांना ₹२४,८०० व मदतनीसांना ₹२०,४०० वेतन देणे, प्रोत्साहन भत्ता मानधनात समाविष्ट करणे, सामाजिक सुरक्षा व दरमहा पेन्शन लागू करणे, योजनाबाह्य कामे बंद करणे, एक महिन्याची उन्हाळी सुट्टी व भरपगारी आजार रजा देणे, FRS मधील तांत्रिक अडचणी दूर करणे तसेच पोषण ट्रॅकरच्या कामासाठी ५ जी मोबाईल व वार्षिक रिचार्ज भत्ता देणे अशा विविध मागण्यांचा ठाम उच्चार करण्यात आला.
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) श्री. हेमंत भदाणे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. हे निवेदन शिफारशीसह शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, सविता महाजन, चेतना गवळी, रेखा नेरकर, सुनंदा नेरकर, पुष्पा परदेशी, शोभा जावरे, आशा जाधव, संगीता निंभोरे, नंदा देवरे, प्रतिभा पाटील, निता सुरवाडे, सलमा तडवी, कल्पना जोशी, शकुंतला चौधरी, रेखा गवारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या एकजुटीमुळे शासनावर सकारात्मक निर्णयाचा दबाव निर्माण झाला असून, आता त्यांच्या मागण्यांबाबत ठोस कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *