ब्रह्माकुमारीज अनिता दीदी यांना ‘आध्यात्मिक सेवा’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
![]()
ब्रह्माकुमारीज अनिता दीदी यांना ‘आध्यात्मिक सेवा’ राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
अमळनेर प्रतिनिधी :
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जीवनसाधना फाऊंडेशन व बीइंग ह्युमन केशव फाऊंडेशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात राजयोगिनी ब्रह्माकुमारीज अनिता दीदी — संचालिका, प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय, फरांदे पार्क, नांदेड — यांना ‘आध्यात्मिक सेवा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
अनिता दीदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राजयोग, ध्यान, मूल्याधिष्ठित जीवनशैली व आध्यात्मिक शिक्षणाच्या माध्यमातून समाजात शांतता, सकारात्मकता आणि नैतिकतेचा संदेश प्रसारित केला आहे. व्यक्तीच्या आत्मिक उन्नतीबरोबरच कुटुंब व समाजजीवनात समरसता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला डॉ. मारोतीराव कदम भाई, डॉ. रामरावजी जाधव भाई, डॉ. आनंदराव मनुरकर भाई, उद्योजक राजेंद्र शंकरपुरे भाई, भगवान कदम भाई, निळकंठ भाई, स्वामी भाई, जोगदंड भाई, रूपेश भाई, डॉ. कल्पना माता जाधव, गोरे माता, जोगदंड माता, शिवलीला बहन, सरोजिनी बहन, स्वामी माता, रोहिणी बहन, सूर्यवंशी भाई यांच्यासह फरांदे पार्क परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव भाई यांनी तर आभार प्रदर्शन कल्पना जाधव माता यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत समाजसेवा, अध्यात्म व मानवमूल्यांच्या संवर्धनाचा संदेश देणारा हा सन्मान सोहळा उपस्थितांच्या मनावर गडद ठसा उमटवून गेला.

