दिरंगाईतून दिलासा : शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने उपोषण स्थगित उपोषणस्थळीच तोडगा : चार दिवसांत सर्व माहिती, पुढील आठवड्यात विशेष सभा
![]()
दिरंगाईतून दिलासा : शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने उपोषण स्थगित
उपोषणस्थळीच तोडगा : चार दिवसांत सर्व माहिती, पुढील आठवड्यात विशेष सभा
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारानंतरही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने ‘शैक्षणिक व्यासपीठा’तर्फे ११ डिसेंबर २०२५ पासून साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला होता. जिल्ह्यातील शिक्षकांकडून सातत्याने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे विविध मागण्यांची मांडणी, कामकाजातील त्रुटींची नोंद, तसेच प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा सुरु होता. मात्र दिनांक ०६ नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या सात पत्रांना आणि ०१ डिसेंबर रोजी देण्यात आलेल्या तीन पत्रांना आवश्यक माहिती न देणे, चर्चेत मान्य केलेली प्रकरणे मंजूर न करणे, वेतन पथकाकडून अपूर्ण माहिती मिळणे, तसेच कार्यालयात उपस्थिती आणि कामकाजाबाबत उदासीनता — या कारणांमुळे शिक्षकांमध्ये नाराजी वाढत गेली. जिल्हाभरातून आलेल्या शिक्षकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून कार्यालयीन दिरंगाई, टप्पा अनुदान आदेश वितरणातील विलंब, विविध प्रकरणांवरील अडवणुकीचे धोरण यामुळे साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.
उपोषणस्थळी आज शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती कल्पना चव्हाण स्वतः दाखल झाल्या व त्यांनी अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर येत्या चार दिवसांत सर्व मागितलेली माहिती उपलब्ध करून देण्याचे, तसेच पुढील आठवड्यात प्रलंबित प्रकरणांवर संघटनेसोबत विशेष सभा घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. हे आश्वासन संस्था चालक महामंडळाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले असून, त्यांच्या हस्ते पत्र देत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
या निर्णायक बैठकीला यु.यु. दादा पाटील (अध्यक्ष – समन्वय समिती), जे.के. पाटील, एच.जी. इंगळे, एस.डी. भिरुड, सी.सी. वाणी, प्रा. सुनिल गरुड, योगेश भोईटे, साधना लोखंडे, डी.ए. पाटील, अरुण सपकाळे, एन.ओ. चौधरी, एस.के. पाटील, डिगंबर पाटील, आ.डी. चौधरी, मनोहर सुर्यवंशी, नितीन महाजन, सिद्धेश्वर वाघुळे, जयंत चौधरी, आबा पाटील, जे.पी. सपकाळे, आर.आर. र्धनगर, संभाजी अस्वार, संदीप डोलारे, चंपालाल चौधरी, सचिन पाटील, अजित पाटील, प्रमोद चिलाणेकर, मिलिंद जावळे, धनंजय फिरके, गिरीश भारंबे, आर.एल. बाविस्कर, गिरीष भंगाळे, नरेंद्र दोडके, व्ही.व्ही. पाटील, नितीन सोनवणे, मनोहर पाटील, चेतन तळेले, गजानन किनगे, सुनिल तायडे, पी.व्ही. वाणी, डी.टी. पाटील तसेच अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाधिकारींच्या आश्वासनामुळे शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, पुढील आठवड्यातील बैठकीकडे शिक्षक बांधव व भगिनी आशेने पाहत आहे.


