ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
![]()
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
जळगाव प्रतिनिधी
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्ययोध्दा व जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी भूषविले तर पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
बिरसा मुंडा यांच्या कार्यातून देशभक्ती, सामाजिक न्याय, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात प्रथम श्री. चंद्रकांत कोळी सरांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बिरसा मुंडा यांच्या ‘उलगुलान’ चळवळीचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करत अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची त्यांची जाज्वल्य वृत्ती विद्यार्थ्यांसमोर मांडली. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे महत्व सांगताना कोळी सर म्हणाले, “बिरसा मुंडा हे केवळ आदिवासी समाजाचे नव्हे, तर संपूर्ण भारताच्या संघर्षशक्ती व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत.”
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती प्रणिता झांबरे यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी बिरसा मुंडा यांच्या अल्पायुष्यातील विशाल योगदानाचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रेरणा विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडली. “स्वातंत्र्य म्हणजे विचारांची, श्रद्धेची आणि कृतीची मुक्तता. शिक्षण, सत्यनिष्ठता व धैर्य हीच समाजबांधणीची खरी साधने आहेत,” असे त्यांनी सांगितले.
झांबरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन सामाजिक समता, न्याय आणि जबाबदारीची जपणूक करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. शेवटी उपस्थितांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्य, त्याग व राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.

