मातृसेवा, समाजसेवा आणि आदर्श कर्तृत्वाचा संगम — कळमसरेच्या चौधरी परिवारास ‘श्रावण बाळ सन्मान पुरस्कार’
![]()
मातृसेवा, समाजसेवा आणि आदर्श कर्तृत्वाचा संगम — कळमसरेच्या चौधरी परिवारास ‘श्रावण बाळ सन्मान पुरस्कार’
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
समाजसेवेचा, मातृसेवेचा आणि माणुसकीचा अनोखा संगम घडवणाऱ्या कळमसरे येथील श्री गणेश चिंधा चौधरी व श्री रमेश चिंधा चौधरी या बंधूंच्या कुटुंबाचा नुकताच ‘श्रावण बाळ सन्मान पुरस्काराने’ सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान, अमळनेर आणि डाॅ. सौ. माधुरी मनोहर भांडारकर बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला.
तालुक्यातील तसेच परिसरातील १२ व्यक्तींना “श्रावण बाळ सेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आले होते. या सर्व पुरस्कारांचे वितरण १९ ऑक्टोबर (रविवार) रोजी एक भव्य सोहळ्यात करण्यात आले. या प्रसंगी वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मा. सुभाष चौधरी, कामगार उपायुक्त विजय चौधरी, त्र्यंबकेश्वर येथील डीवायएसपी वासुदेव देसले,
तसेच बाजार समितीच्या संचालिका सुषमाताई देसले, साने गुरुजी वाचनालयाचे माजी अध्यक्ष
आत्माराम चौधरी, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
बालवयात पितृछत्र हरवून आईच्या मायेच्या सहवासात वाढलेले हे कुटुंब आज समाजात सेवेचा आदर्श ठरले आहे. आईच्या मार्गदर्शनाखाली संघर्षातून उभं राहिलेलं हे कुटुंब आज समाजातील अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.
आईंच्या शताब्दी वर्षानिमित्ताने (१०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल) चौधरी बंधूंनी गावातील १०० महिलांना साड्यांचे वाटप, शैक्षणिक संस्थांतील गरीब विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य वितरण, तसेच नाशिक येथे अन्नदान उपक्रम अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले. त्यांच्या प्रत्येक कार्यात आईप्रती कृतज्ञता आणि समाजसेवेची भावना दृष्टीस पडते.
त्यांच्या या कार्याची दखल घेत मा. सुभाष आण्णा चौधरी यांच्या हस्ते दोन्ही बंधूंचा सपत्नीक सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मानानंतर परिसरातील नागरिक, नातेवाईक, हितचिंतक व मित्रपरिवाराने चौधरी कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांची मातृसेवा, सामाजिक बांधिलकी आणि नि:स्वार्थ योगदान हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
चौकट
पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी नानासाहेब गणेश चिंधा चौधरी व आबासाहेब रमेश चिंधा चौधरी हे दोघेही सहकुटुंब उपस्थित होते. या प्रसंगी कुटुंबातील जावई श्री संजय चौधरी तसेच मुलगी सौ. प्रतिभा चौधरी यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
पुरस्कार स्वीकारतांना आपल्या भावना व्यक्त करताना चौधरी कुटुंबाने म्हटलं —
> “कोणतंही कार्य मनापासून आणि निःस्वार्थ भावनेतून केलं, तर तेच खरे पूजन आहे. आई-वडिलांची सेवा यासारखं पुण्य या जगात दुसरं नाही. वर्णेश्वर संस्थेने आमचा सन्मान करून आम्हाला जे आत्मिक समाधान दिलं आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद न देता ऋणात राहू इच्छितो.”
त्यांच्या या शब्दांतून कृतज्ञता, संस्कार आणि मातृसेवेची गोड झुळूक जाणवत होती.
अशा कुटुंबामुळेच समाजात माणुसकी, आदर्श आणि संवेदनशीलतेची परंपरा आजही जिवंत आहे.

