सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व : कर्तृत्व आणि दातृत्वाचा संगम – डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तृत्वाचा 2025” या सोहळ्यात पुरस्कार’ प्रदान
![]()
सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व : कर्तृत्व आणि दातृत्वाचा संगम – डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी
मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सन्मान कर्तृत्वाचा 2025” या सोहळ्यात पुरस्कार’ प्रदान
“नेतृत्व तेच जे स्वतःपेक्षा समाजाला मोठं मानतं, आणि मदत ही त्यांच्यासाठी कर्तव्य असतं — कर्तव्याची सवय ज्या व्यक्तीच्या रक्तात असते, ती म्हणजे डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी.”
सातपुड्याच्या डोंगररांगांतून, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लहानशा परिवर्धा या गावातून निघालेला हा माणूस आज महाराष्ट्रभर मानवतेचा संदेश देत आहे. मराठी लाईव्ह न्युजच्या “सन्मान कर्तृत्वाचा 2025” या राज्यस्तरीय सोहळ्यात डॉ. शिंपी यांना ‘आदर्श शिक्षाविध पुरस्कार’ जाहीर झाल्याने सर्वत्र आनंद व अभिमानाचे वातावरण आहे.
डॉ. शिंपी हे मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख तसेच रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून काम पाहतात. त्यांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सेवा, शिक्षण, सुरक्षा आणि संस्कार या चार मूल्यांचा अद्भुत संगम दिसतो.
साधेपणातले असामान्य जीवन
त्यांचे वडील श्री. रतिलाल अण्णा शिंपी हे आजही ७८व्या वर्षी शिवणकाम करून आपल्या हातावर पोट भरणारे कष्टाळू व्यक्तिमत्त्व आहे. अशा परंपरेतून वाढलेले मनिलाल शिंपी यांनी “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” ही विचारसरणी आत्मसात केली.
समाजसेवेचा विस्तार – ‘एव्हरी संडे रोटी डे ग्रुप’
डॉ. शिंपी यांनी स्थापन केलेल्या या उपक्रमातून आदिवासी पाडे, विटभट्टीवरील कामगार, कातकरी समाजातील कुटुंबे यांच्यापर्यंत दर रविवारी सकाळी मिष्टान्न भोजन पोहोचवले जाते.
तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, थंडीत ब्लँकेट्स, दिवाळीत आदिवासी भगिनींना सणाच्या भेटी — अशी अनेक माणुसकी जपणारी कार्ये ते न थांबता करीत आहेत.
समाजकल्याण न्यासाचे अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी भाऊबीज पाड्यांवर साजरी करून समाजातील भगिनींचा सन्मान करण्याची परंपरा निर्माण केली आहे.
रस्ता सुरक्षा जनजागृतीचा आदर्श
ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त मा. पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिंपी हे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाच्या विभागीय समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ‘ट्रॅफिक सेन्स’ निर्माण व्हावा, या हेतूने त्यांनी एन.एस.एस. छात्र सैनिकांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर करून व्यापक जनजागृती केली आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, निवडणुका वा मोठ्या यात्रांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ते स्वतः पोलिस प्रशासनासह खांद्याला खांदा लावून कार्यरत असतात.
शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान


एम. एल. म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयात क्रीडा संचालक व के.आर. मालदे इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा संघटक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे मोलाचे काम केले आहे.
सन्मान आणि गौरव
शैक्षणिक, सामाजिक व मानवसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे “समाजसेवा रत्न” व “महाराष्ट्र ब्रँड अॅम्बेसेडर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या कार्यामागे दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, डॉ. यशवंत म्हात्रे, डॉ. रामचंद्र देसले, डॉ. किशोर अढळकर, नीतिल चंदेया यांसारख्या सामाजिक सहकाऱ्यांचे बळ आणि प्रेरणा आहे.
डॉ. मनिलाल शिंपी यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे सेवाभाव, शिस्त आणि संवेदनशीलतेचं मूर्त रूप.
सामाजिक बांधिलकी जोपासणारे हे नेतृत्व आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहे.
“जिथे माणुसकी आहे तिथेच देव आहे” — हे वाक्य त्यांच्या जीवनातून दररोज साकार होत आहे.


