अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र
![]()
अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी — माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे तहसीलदारांना पत्र
अमळनेर प्रतिनिधी :
खरीप हंगाम २०२५ मध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पारोळा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेळावे महसूल मंडळात १६ ऑगस्ट रोजी ८६.३० मिली आणि १७ ऑगस्ट रोजी तब्बल १२७.७० मिली इतक्या पावसाची नोंद झाली. सलग झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतजमिनी खचल्या, शेतीपिके वाहून गेली, विहिरी व सिंचन यंत्रणा उद्ध्वस्त झाली — परिणामी शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार, पारोळा यांना एक भावनिक निवेदन दिले आहे.
त्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की —
शेळावे मंडळातील राजवड शिवारात सौ. सायली धिरेन्द्र पाटील यांच्या मालकीचे ६.०६ हेक्टर क्षेत्रावर सन २००८ मध्ये “विनाअनुदानीत” वृक्षलागवड करण्यात आली होती, तर राज धिरेन्द्र पाटील यांच्या मालकीच्या ७.१८ हेक्टर क्षेत्रावर सन १९९१ मध्ये “साग” व २०२२ मध्ये “महोगनी” अशी यशस्वी लागवड करण्यात आली होती.
परंतु, खरीप २०२५ मधील अतिवृष्टीमुळे या “वनशेती” क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले असूनही, प्रशासनाने पंचनाम्याच्या वेळी या विभागाचा समावेश “वनशेती” या वर्गवारीत केला नाही. त्यामुळे त्या क्षेत्राचे पंचनामे रद्द करून नुकसानीची नवी तपासणी करून शेतकऱ्यांना न्याय्य मदत मिळावी, अशी ठाम मागणी कृषीभूषण पाटील यांनी केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की —
“शेतकऱ्यांचे श्रम आणि वर्षानुवर्षे जोपासलेले झाडांचे श्रममूल्य एका क्षणात पाण्यात गेले. शासनाने संवेदनशीलतेने विचार करून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला योग्य ती मदत द्यावी, हीच विनंती आहे.”
या पत्रामुळे शेळावे आणि परिसरातील शेतकरी वर्गात नव्याने आशेची किरणे जागृत झाली असून, तहसील प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पुनर्परीक्षण करून मदत वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

