चाकोरीबाहेरील कर्तृत्ववंत महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये दैदिप्यमान उत्साहात
![]()
चाकोरीबाहेरील कर्तृत्ववंत महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये दैदिप्यमान उत्साहात
पनवेल (प्रतिनिधी):
सामान्यतेच्या चाकोरी मोडून जिद्दीने स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या कर्तृत्वशाली महिलांचा गौरव करणे म्हणजे संपूर्ण समाजाला प्रेरणा देणे होय. या भावनेतून मनमुक्त फाऊंडेशन तर्फे “चाकोरीबाहेरील मैत्रीणी – कृतज्ञता सोहळा” हा भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम शनिवार, २० सप्टेंबर रोजी पनवेल येथील सुरुची हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
“व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” या ब्रीदवाक्याने समाजातील उपेक्षित घटकांसाठी नवा श्वास देणाऱ्या मनमुक्त फाऊंडेशनने आपल्या स्थापनेपासून मानसिक आरोग्य संवर्धन, विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन, युवक व्यक्तिमत्व विकास, अनाथ मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचा सन्मान अशा विविध सामाजिक क्षेत्रांत कार्य करून ठसा उमटवला आहे.
या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे १० कर्तृत्ववान महिलांचा सामूहिक गौरव. घरगुती जबाबदाऱ्या, सामाजिक बंधने, आर्थिक अडचणी यांवर मात करून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या मनीषा यादव, अनिता कोलते, गीता जुन्नरकर-राऊत, प्रतीक्षा वाडे, सुचित्रा घोगरे काटकर, नेहा दाबके, स्मिता गायकवाड, सुरेखा काटकर, संध्या गायकवाड आणि देवयानी गोविंदवार या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांचे कार्य वैयक्तिक यशापुरते मर्यादित नसून समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहे.
सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग), डॉ. वैशाली पाटील (सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट), तसेच ललिता बाबर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) यांनी या महिलांना मानाचा मुजरा अर्पण केला.
संचालक श्रीम. अस्मिता कालन, श्रीम. मनिषा कुन्हाडे व श्रीम. मुक्ता भोसले यांच्या प्रयत्नांतून हा वैभवशाली सोहळा यशस्वी झाला. सूत्रसंचालन डॉ. पराग कालन व श्रीम. दिव्या भोसले यांनी अप्रतिमपणे केले.
या प्रसंगी मनमुक्त फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले की – “हा सन्मान म्हणजे स्त्रीशक्तीला दिलेली आदरांजली आहे. तिच्या संघर्षातील प्रत्येक अश्रू, हास्य आणि परिश्रमाला कृतज्ञतेचा मुजरा वाहण्याचा हा सोहळा होता.”
डॉ. राजेंद्र कुन्हाडे यांनी व्यक्त केलेली मूल संकल्पना या कार्यक्रमातून मूर्त स्वरूपात साकारली. मराठी संस्कृती, भाषा आणि समाजातील स्त्रीशक्तीचा उन्नत संदेश देणारा हा सोहळा उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला

