संघटनेला शिस्त, नेतृत्व व कार्यकर्त्यांची साथ मिळाली तरच यश : मा. कपिलजी पवार अमळनेरला व्हाईस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय केटर कॅम्प उत्साहात
![]()
संघटनेला शिस्त, नेतृत्व व कार्यकर्त्यांची साथ मिळाली तरच यश : मा. कपिलजी पवार
अमळनेरला व्हाईस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय केटर कॅम्प उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी :
व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय केडर कॅम्पमध्ये आज आदिवासी विभागाचे उपायुक्त मा. कपिलजी पवार सर यांनी संघटना, शिस्त, नेतृत्व आणि शिलेदारांचे महत्त्व या संदर्भात अतिशय सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी संघटना कशी असली पाहिजे आणि तिचे शिलेदार म्हणजे कार्यकर्ते कसे असले पाहिजेत, याबाबत उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले.
पवार सरांनी सुरुवातीला संघटनेचे मूलभूत स्वरूप उलगडून सांगितले. त्यांनी नमूद केले की कोणतीही संघटना टिकाऊ आणि परिणामकारक व्हायची असेल तर तिच्या कार्यपद्धतीत शिस्त, जबाबदारी, एकजूट आणि स्पष्ट ध्येय असणे आवश्यक आहे. संघटनेचे काम हे केवळ पद, अधिकार किंवा प्रतिष्ठेसाठी नसून समाजहितासाठी व जनतेच्या प्रश्नांसाठी व्हायला हवे.
त्यांनी शिस्त आणि नेतृत्व यांचा परस्परांशी असलेला संबंध स्पष्ट केला. शिस्त नसलेली संघटना गोंधळात सापडते, तर योग्य नेतृत्व असलेली संघटना कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभी राहते. चांगला नेता फक्त आदेश देणारा नसून स्वतः उदाहरण घालून देणारा असतो. नेता हा कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेणारा, त्यांना मार्गदर्शन करणारा आणि अडचणींवर उपाय शोधणारा असावा, असे आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त कपीलजी पवार सरांनी सांगितले.
यशस्वी संघटनेसाठी कार्यकर्त्यांमध्ये असावे लागणारे काही महत्त्वाचे गुण त्यांनी उलगडून सांगितले. यात त्यागाची वृत्ती, सतत शिकण्याची तयारी, संवाद कौशल्य, नवोपक्रमशीलता आणि संघटनेशी निष्ठा हे गुण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेचे शिलेदार हेच तिचा खरा कणा आहेत. तेच संघटनेचे काम पुढे नेतात. आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारे शिलेदारच संघटनेला उभारी देतात.
मार्गदर्शन अधिक परिणामकारक करण्यासाठी पवार सरांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ग्राफ, आकडेवारी व वास्तव उदाहरणे वापरली. त्यामुळे उपस्थित पत्रकार बांधवांना विषय अधिक स्पष्टपणे व लक्षात राहील अशा पद्धतीने समजावून घेता आला.
यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात पत्रकार बांधवांकडून विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी संयमाने व सविस्तर उत्तरे दिली. संघटनेतील वाद कसे मिटवावेत, कार्यकर्त्यांना कसे प्रोत्साहन द्यावे, नेतृत्वाचे प्रशिक्षण कसे असावे, तसेच आधुनिक माध्यमांचा योग्य वापर कसा करावा यासंदर्भातील प्रश्नांचे निरसन त्यांनी केले.
या कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्राध्यक्ष मा. सुधीर काळे, राष्ट्रीय महासचिव भोसले मॅडम, राज्याध्यक्ष मस्के सर तसेच इतर सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी मा. कपिलजी पवार सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले.
अशा प्रकारे या मार्गदर्शनातून उपस्थितांना संघटना शिस्त, नेतृत्वाचे महत्त्व, कार्यकर्त्यांची भूमिका आणि प्रभावी संघटनात्मक कार्यपद्धती याबाबत सखोल व प्रेरणादायी ज्ञान मिळाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाची अमळनेर तालुक्याची सर्व टीम यांनी प्रयत्न केले. व्हाईस ऑफ मीडियाच्या दोन दिवशी केटर मेळाव्यामध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.. मंगळ ग्रह संस्थेतील सर्व विश्वस्त मंडळ सर्व सेवेकरी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली

