आज माझी आई अक्काचा ६ वा स्मृतीदिन* *अक्का-बापू म्हणजे माझे “पॉवर हाऊस”.. संकट कसलेही असो..लढून जिंकायची “पॉवर ” तेच द्यायचे!* *त्यांच्या स्मृती चरणी लवकरच “बापाची पेंड ” हे माझे आत्मकथन अर्पण करण्याचा संकल्प!*
![]()
*आज माझी आई अक्काचा ६ वा स्मृतीदिन*
*अक्का-बापू म्हणजे माझे “पॉवर हाऊस”.. संकट कसलेही असो..लढून जिंकायची “पॉवर ” तेच द्यायचे!*
*त्यांच्या स्मृती चरणी लवकरच “बापाची पेंड ” हे माझे आत्मकथन अर्पण करण्याचा संकल्प!*
देवाच्या मानव निर्मिती फॅक्टरीत “आईं-बाप” हे प्रॉडक्ट बनवताना देवाच्या रिसर्च टीमला कित्ती कित्ती कसब पणाला लावले असेल? फॉर्म्युला तयार करताना आपल्या लेकरांवर जिवापाड प्रेम करण्याबरोबरच लेकरासाठी त्याग आणि टोकाची सोशिकता त्या फॉर्मुल्यात ठासून भरण्यात देव विसरला नाही! त्यामुळे भूतलावरील कुठलेही आई – बाप असो फॉर्म्युला एकच!जगातले सर्वात श्रीमंत आणि जगातले सर्वात दरिद्री असो,”आई – बाप” म्हणून देवाने त्यांना बहाल केलेला फॉर्म्युला आणि डीएनए एकच! बिलकूल भेदभाव नाही.. रिझर्व्हेशनचा कोटा तर नाहीच नाही! आज माझ्या आईची म्हणजे अक्काची पुण्यतिथी..२६ मे ला बापूंची पुण्यतिथी असते. दोघांना जावून पाच वर्षे झाली.. खूप खूप सांगण्यासारखं आहे.नेहमीच आठवणी दाटून येतात.. माझ्या संपूर्ण आयुष्यात अक्काने मला मारल्याचे आठवत नाही.. बापूंनी मात्र त्यांच्या खिशातला मी दीड रुपया चोरला म्हणून मी चौथीत असताना मला एक झापड लगावली होती. आयुष्यात तेवढी एकच झापड खाल्ली..बाकी कितीही गरिबी असली तरी राजा अक्का -बापूंचा लाडकाच!..हे लाड पुरवतानाही बापू कधी रागाने तर कधी हसत – हसत मला म्हणायचे.. तुझ्या बापाची पेंड हाय का?.. म्हणूनच एका सामान्य आई -बापाच्या माझ्या सारख्या सामान्य लेकरांच्या आत्मकथनाला “बापाची पेंड” हे शीर्षक देवून लिहिण्याचा श्रीगणेशा करणार आहे.. अक्का – बापूंच्या स्मृती चरणी ते पुस्तक वाहणार.
जय हो!
आपला,
*राजा माने.*

