पातरखेडा अनुदानित आश्रमशाळेत कांजण्यांचा प्रादुर्भाव; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची तातडीने भेट*
![]()
*पातरखेडा अनुदानित आश्रमशाळेत कांजण्यांचा प्रादुर्भाव; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची तातडीने भेट*
जळगाव दि. २६ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – पातरखेडा (ता. एरंडोल) येथील अनुदानित आश्रमशाळेत कांजण्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शाळेला तातडीने भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित विद्यार्थ्यांवर जळगाव, एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून इतर सर्व विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शाळेतील एकूण 388 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 76 विद्यार्थ्यांना कांजण्याची लागण झाल्याचे प्राथमिक लक्षणे निदर्शनास आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह शाळेची पाहणी करून तातडीने वैद्यकीय उपचारांची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच शाळा परिसर निर्जंतुक करणे, स्वच्छता राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे व इतर विद्यार्थ्यांचे नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले.
कांजण्याचे प्राथमिक लक्षणे असलेल्या 76 विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र एरंडोल, व जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या प्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भांयेकर, स्थानिक प्रशासन, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधत योग्य मार्गदर्शन केले आणि सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.

