छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला पण दुर्लक्षित असलेला वेताळवाडी किल्ला
1 min read

छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला पण दुर्लक्षित असलेला वेताळवाडी किल्ला

Loading

छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेला पण दुर्लक्षित असलेला वेताळवाडी किल्ला

जळगाव जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेला,शेंदुर्णी पासून काही किलोमीटर अंतरावर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी गावापासून काहीच अंतरावर, वेताळवाडी किल्ला आहे. या किल्ल्याला स्थानिक “वसईचा किल्ला” व “वाडी किल्ला” म्हणून ओळखतात.
अजिंठा डोंगर रांगांमध्ये १९०० फूट उंचीचा , मध्यम श्रेणीचा, गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे.
भव्य तटबंदी, अनेक बुरुज, किल्ल्यावरील इमारतीचे अवशेष आजही शिल्लक आहेत. त्यामुळे किल्ला पाहण्याचे समाधान लाभते.

 

हा किल्ला कोणी व कधी बांधला याचा अजूनही ठोस पुरावा मिळालेला नाही. साधारणतः ६व्या शतकात गुप्तांचा राजा विक्रमादित्य याने हा किल्ला बांधल्याचा इतिहास सांगितला जातो.तर पुरातत्त्व खात्याच्या नोंदीनुसार हा किल्ला १२व्या शतकात उभारला गेलेला असावा. हा किल्ला चालुक्य किंवा यादवकालीन असावा असेही म्हटले जाते. १५व्या शतकात अहमदनगरचा निजामशाह नंतर मुगल बादशाह नंतर हैद्राबादच्या निजामांकडे व पुढे मराठ्यांकडे या किल्ल्याचा ताबा असावा असा अंदाज बांधला जातो.

*बुरुज व प्रवेशद्वार*:- किल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. पहिले प्रवेशद्वार वेताळवाडी गावाच्या दिशेने आहे. या बाजूने किल्ल्यावर लवकर जात येते . पण या वाटेने झाडे झुडपे वाढल्याने व चढणीची वाट असल्याने हा मार्ग जवळजवळ बंद झालेला आहे. दुसरे प्रवेशद्वार जंजाळा किल्ल्याच्या दिशेने असल्यामुळे या प्रवेशद्वाराला “जंजाळा दरवाजा” असेही म्हटले जाते. हळदा घाट रस्ता तयार झाल्यामुळे या बाजूने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सहज पोहोचता येते.
किल्ल्यावरील शिल्लक अवशेषांमध्ये प्रामुख्याने बुरुजांचे अवशेष व तटबंदीचे अवशेष आजही चांगल्या स्थितीत दिसतात. किल्ल्यावर साधारणपणे पाच बुरुज आहेत. प्रवेशद्वाराच्या अगोदर बुरुज लागतो. या बुरुजापासून प्रवेशद्वाराच्या दरवाजापर्यंत फारसबंदी केलेली वाट आहे. ही वाट काटकोनात वळून प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. जंजाळा किल्ल्याच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वाराची उंची 20 फूट आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला “शरभ शिल्प” कोरलेली आहे या प्रवेशद्वाराला प्राचीन दरवाजा होता पण कालांतराने तो नष्ट झाला आहे.आजही दरवाजा असल्याची साक्ष आपण अवशेषांवर पाहू शकतो.

*तळघर*:- प्रवेशद्वारातून पुढे जाताना थोडे वर चढल्यावर एक तळघट दिसून येते . या तळघरात अंधार आहे .पूर्वीच्याकाळी या तळघरात उजेड रहावा यासाठी देवळी बांधत असत . या तळघराच्या समोरच देवळी बांधलेली दिसून येते. त्यामुळे तळघरात उजेड पडण्याची सोय होत असे. किल्ल्याच्या बुरुजावर व तटबंदीमध्येही शत्रू वर हल्ला करण्यासाठी देवळया बांधत अशा अनेक देवळया किल्ल्यावर बांधलेल्या दिसून येतात. यातून पाहिल्यास किल्ल्याबाहेरील निसर्ग अनुभवता येतो.
*प्राचीन तोफ*:- प्रवेशद्वारापासून वर चढल्यावर थोड्याच अंतरावर एक प्राचीन तोफ ठेवलेली आढळून येते. ही तोफ फार प्राचीन आहे. तोफ ठेवण्यासाठी एक गाडा बनवलेला आढळून येतो. हा गाडा मात्र अलीकडच्या काळा बनवलेला आहे. या तोफेतून प्रवेशद्वारावर आक्रमण करणाऱ्या सैन्यावर हल्ला केला जात होता.
या तोफेपासून थोडे वर गेल्यावर बुरुज व किल्ल्याची तटबंदी डोळ्यास पडते. या तटबंदी व बुरुजावरून हळदा घाटातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येतो.
*किल्ल्यातील वाड़े*:- बुरुज व तटबंदीपासून थोडे वर चढल्यावर किल्ल्याचा सपाट भूभाग सुरू होतो. हा किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. या सपाट भागावर आता झाडे वेली वाढलेल्या आहेत.या झाडे वेलींमध्ये वाड्याचे अनेक अवशेष आढळतात. या अवशेषांच्या आधारे किल्ल्यात अनेक वाडे होते हे सिद्ध होते. दोन वाड्यांमध्ये अंतर असल्याचे आढळून येते .
*नमाजगिर*:- नमाजगिर नावाची इमारत म्हणजे मजीद होय . आज ही इमारत पडक्या अवस्थेत आहे. या इमारतीच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह व क्रॉस कोरलेला दिसतो. नमाजगिरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली एक कबर आहे . ही कबर कोणाची असावी याचा मात्र अंदाज बांधता येत नाही.
*तलाव*:- नमाजगिर इमारतीच्या समोर एक तलाव बांधलेला दिसून येतो.पावसाळ्याच्या दिवसात हा तलाव पाण्याने भरला जाईल , व नंतर हे पाणी वापरण्यात येत होते. या तलावाच्या एका बाजूला बागेचे अवशेष आढळतात. या बागेला लागूनच एक वाडा होता. हा वाडा मात्र पूर्णपणे पडलेला आहे .वाडयाचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.
*तेलातूपाचे टाके*:- तलावापासून थोड्याच अंतरावर तेलातुपाचे टाके आढळून येतात. या टाक्यांमध्ये आता मात्र घाण व गाळ भरलेला दिसतो.
*धान्याचे कोठार*:- तेलातुपाच्या टाक्यांपासून काहीच अंतरावर धान्याच्या कोठाराची इमारत आहे . या किल्ल्यावर दोन धान्य कोठारांचे अवशेष दिसून येतात. या कोठारांचा खालचा भाग पूर्णपणे ढासळलेला आहे. येत्या काही वर्षांमध्ये ही धान्याची कोठारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
*रांजण*:- पूर्वीच्या काळी बनवलेला रांजण किल्ल्यावर आढळून येतो. किल्ल्यावरील हा रांजण मोठा व खोल होता असे जाणकार सांगतात. काळओघात या रांजणात आता गाळ भरलेला आहे. अनेक झाडेवेली वाढलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा आकार, खोली , व मोठेपण अनुभवता येत नाही.
*छत्रपती शिवराय व जिजाऊ माता यांच्या मुक्कामाचा वाडा*:- किल्ल्याच्या एका उंच टेकडीवर एक वाडा पडक्या अवस्थेत दिसून येतो. असे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ या किल्ल्यावर येणार असल्यामुळे, त्यांच्या येण्या अगोदर हा वाडा बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ सिंदखेडला जात असताना वाटेत या किल्ल्यावर थांबले, व दोन दिवस या वाड्यात मुक्काम केला. आज मात्र हा वाडा जीर्ण अवस्थेत आहे.
*चोर दरवाजा*:- शत्रुने किल्ला जिंकला,तर महत्त्वाच्या व्यक्ती , सैनिक, व मौल्यवान साधन-संपत्ती किल्ल्याबाहेर काढण्यासाठी, घनदाट जंगलाच्या बाजूने किल्ल्यावर एक चोर दरवाजा आहे. आता मात्र झाडे वेली वाढून घनदाट जंगल झाले आहे. शिवाय हळदा घाटाच्या जंगलात हिंस्र प्राण्यांचा वावर असल्यामुळे या दरवाज्याच्या वाटेने जाणे शक्य नाही.
अलीकडच्या काळात किल्ल्याचे काही काम शासनाने केलेले आहे. पण ते थोड्या प्रमाणातच आहे. शिवाय किल्ल्यावर कसल्याही प्रकारची सोय नाही. अशीही पवित्र वास्तू काळओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वास्तूचे संरक्षण व्हावे, जेणेकरून पुढील पिढीला इतिहासाचा अनुभव घेता येईल एवढीच माफक अपेक्षा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या चरणस्पर्शाने पावित्र्य झालेली वास्तू एकदा तरी पाहायलाच हवी.
श्री अजय अशोक पाटील
(एम.ए.डी.एड. इतिहास- सेट)
पदवीधर शिक्षक :- श्री स्वामी समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर जळगाव

( लेखकाचे “सिंधू संस्कृती” भारतीय इतिहासाचे एक सोनेरी पान. हे पुस्तक अथर्व पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले असून कविवर्य बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव इतिहास विभागात संदर्भ ग्रंथ यादीत समाविष्ट आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *