सशक्त लोकशाहीत नवमतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण-अनिकेत पाटील.
![]()



सशक्त लोकशाहीत नवमतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण-श्री.अनिकेत पाटील.
जळगाव: राष्ट्रनिर्मिती कार्यात युवांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. युवा वर्गाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन सारासार विवेकबुद्धीचा सुयोग्य वापर करून मतदान जरूर करावे. तसेच आपले आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक यांना देखील मतदान करण्यास उद्युक्त करावे असे आवाहन श्री.अनिकेत पाटील (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., जळगाव) यांनी नुकतेच के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ताबुला रसा उपक्रमाप्रसंगी विदयार्थ्यांना केले. मतदानाचा दिवस सुटीचा दिवस न मानता देशाप्रती कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित नवमतदारांना केले. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी, नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी डॉ.अतुल इंगळे (सहायक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी ताबुला रसा ही संकल्पना नेमकी काय आहे, यात नवमतदार पांढऱ्या स्वच्छ कागदावर मतदानासंबंधी कसे आपले विचार व्यक्त करू शकतात याचे सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना निबंध,चित्र, व्यंगचित्र,लेख, कविता यांच्या माध्यमातून मतदानासंबंधी आपले विचार मांडण्याचे आवाहन केले. तसेच देशात युवांचा टक्का मोठा असल्याने मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मतदान अवश्य करावे असे देखील त्यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी डॉ.संजय सुगंधी प्राचार्य (के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), प्रा.राहुल वराडे (सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांचेसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

