1 min read

माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क बहाल करणारा समाजसुधारक: – तात्यासाहेब जेतिरावफुले!!!

Loading

माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क बहाल करणारा समाजसुधारक: – तात्यासाहेब जेतिरावफुले!!!

जगात मानवानेच धर्म निर्माण केले. धर्माचा उद्देश जरी चांगला असेल तरी त्यात कालांतराने धर्मांधता वाढत गेली. धर्माच्या ठेकेदारांनी त्यात स्वार्थासाठी तसेच धर्मसत्ता अबादित राहण्यासाठी त्यांच्या मनाला पटतील तसे नियम लादून विशिष्ट गट त्याचा सर्वेसर्वा बनला. ही केवळ भारताची शोकांतिका नाही तर प्रगत ग्रीक पासून भारतापर्यंत सर्वच देशाची परिस्थिती होती. ह्या धर्ममार्तंडानी ग्रंथ निर्मिती करत हाच ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून वापरावा. हे त्यांचा फर्मान असायचे. यात धर्मानावाने काम करणारे उच्च, पवित्र, शुध्द असल्याचा भास केला. परकिय सत्तेपेक्षा भयानक त्रास समाजाला देण्यात आला. विदेशात पोप, पादरी, धर्मगुरू, मौलवी, तर भारतात पुरोहित वर्ग हुकूमशाही करु लागला. धर्मावर कुणी बोलले तर त्यांना मारले जायचे त्यात नावे घेता येतील गॅलिलिओ,सॉक्रेटिस, चार्वाक, नामदेव,कबीर, रविदास, तुकाराम, येशू यांना त्रास झाला. अशा पेशवेशाहीच्या अंतापर्यंत धर्माचा पगडा असलेल्या काळात कुणबी माळी समाजात कुटील व्यवस्थेला शह देण्यासाठी, शोषणाची परंपरा खंडित करण्यासाठी,मानवाला नैसर्गिक प्रकृतीने जगण्याला बळ देणारा द्रष्टा जन्माला आला. त्या महापुरुषाचे नाव आहे तात्यासाहेब जोतिराव फुले. जोतिरावाचा जन्म11 एप्रिल 1827 पुण्यात झाला वडिलांचे नाव गोविंदराव फुले तर आईचे नाव चिमणाबाई होते ज्योतिबाचे पूर्वज सातारा जिल्ह्यातील कटगुण चे रहिवाशी होते. त्यांचे कुळ गोऱ्हे होते. पणजोबा हे शेतकरी होते. ते वतनदार चौगुले होते. त्यांच्याकडे जसजसे वाढु लागले त्याप्रमाणे पुरोहित वर्ग चातुर्वर्ण्य पध्दतीने इतर जातींना अस्पृश्य मानीत. शूद्रांना संपत्ती बाळगणे सुध्दा पाप होते. याच कारणांनी पुरोहीत कुलकर्णीशी वाद होऊन पणजोबांनी कटगुण सोडले व खानवडी खेडयात पुण्याजवळ रहायला आले.त्यानंतर पुण्यालाआले.पंणजोबांना शेटिबा नावाचा मुलगा होता . राणोजी, कृष्णा, गोविंदराव हे शेटिबाची मुले होत. पुण्यात गोविंदराव यांचा फुले, हार, गुच्छ यांचा उदयोग वाढला. पुण्यात पेशवाई संपली होती पण तिची तीव्रता कमी झाली नव्हती. पुरोहित स्वत :ला उच्च मानीत अमानवी मनुस्मृतीचे नियम लादत असत. महात्मा फुले यांनी गफ्फार बेग व लिजीट साहेब ह्या लोकांच्या सहकार्याने इंग्रजी शिक्षण घेतले होते. त्यामुळे सर्व धर्मातील विचार त्यांना ज्ञात झाले. त्यांनी मित्राच्या लग्नात झालेल्या अपमानानंतर फार विचार केला. अतिशूद्र यांची सामाजिक परिस्थिती बघितली ती त्यांच्या परिस्थिती पेक्षा लज्जास्पद होती. अतिशूद्र लोकांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नव्हते. विहिर अपवित्र होण्याची पुरोहितांना भीती होती. ग्रंथात पुरोहितांनी त्यांच्या फायदयासाठी सर्व लिहुन ठेवले होते वर ते सांगायचे हे देवाने सांगितले. महात्मा फुले यांनी सर्व कर्मठ ग्रंथाची पोलखोल केली. खरा इतिहास पुढे आणला. पुरोहितांनी मांडलेला बाजार लोकांच्या लक्षात आणला. लोक जागृत झाले पुरोहितांना प्रश्न विचारु लागले. पुरोहितांच्या लुटीच्या विरुध्द आवाज उठविला. पर्यायी व्यवस्था उभी केली. शिक्षण हाच अज्ञान दुर करण्यावर उपाय आहे. फ्रेंच क्रांती नंतर प्रबोधनाची लाट आली होती. जग परिवर्तनाकडे जात होते. भारतात विषमतेचे पीक वाढले होते. अशा पिकाला उपटून फेकण्याचे काम जोतिराव फुले यांनी केले. आपली पत्नी सावित्रीमाई यांना शिकवुन स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविली. सन 1848 ला भिडेवाडयात मुलींसाठी पहिली शाळा काढली. सत्यासाठी मरायला तयार झालेले तात्यासाहेब हे कुणापुढे लाचार झाले नाही. सत्य हाच शिक्षणाचा पाया आहे असे ते म्हणत. त्याकाळात अनेक उच्चविद्याविभूषित पुरोहित होते परंतु सर्वसामान्य लोकांसाठी गरिब, वंचित, गरजू लोकांसाठी शाळा सुरु करण्याचे धाडस एकट्या जोतिरावांनी दाखविले. जोतिराव फुले हे उदयोजक होते. पुण्यात त्यांच्या कंपनीने उड्डाण फुल बांधले. टाक साळ तयार करण्याचा कारखाना ही त्यांचा होता. 100 एकर जमीन त्यांच्या पूर्वजांना मिळाली होती. त्यात शेतीवर उत्तम प्रयोग करुन कमी पाण्यावर शेती करण्याचा व सेंद्रीय पध्दतीने शेती करण्याचा त्यांनी प्रयोग करून दाखवला. त्याची नोंद इस्राइल देश याने घेतली. आज विकत पाणी घेणारा देश उत्कृष्ट शेती करित आहे. तात्यासाहेब बहुजनावर लिहणारे लेखक होते. काल्पनिक गोष्टीवर त्यांनी लिखाण केले नाही. शिवाजी राजावर पहिला पोवाडा त्यांनी लिहला. पुण्यात एकुण 18 शाळा काढल्या. शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय त्यांना जाते. समाज शिक्षित व्हावा त्याने सत्यशोधक बनावे हे तात्यासाहेब यांचे स्वप्न होते. मुर्ती पुजेच्या नावाने चाललेल पाखंड थांबविण्यासाठी निसर्गाला निर्मिक मानले. पुजा, अर्चा, साधना ही वैयक्तिक बाब आहे त्यासाठी पुरोहिताची मध्यस्थी नको असे ठणकावून सांगितले. समाज चिकित्सक झाला पाहिजे कर्मठ बनता कामा नये. त्यामुळेच त्यांनी पुराण, मनुस्मृतीचे लिखाण विषमतावादी लिखाण ठरविले. आज समाज शिक्षित झाला परंतु सत्यशोधक मार्गाकडे वळला नाही. सामान्य माणूस तरी लहान विधी करतो परंतु शिक्षित मोठमोठे खर्चीक विधी करुन अंधश्रद्धेला खतपाणी घालतो. नारायण नागबली, गृहशांती, पितृदोष, मंगळ दोष यासारखे विधी करुन शिक्षित झाल्याची खिल्ली उडवितो. त्याकाळात सामान्य ते शिक्षित लोक सत्यशोधक समाजात होते. तर्क, विवेक, चिकित्सा, कार्यकारण भाव, बुध्दीप्रामाण्यवाद अजून तरी जोपासला जात नाही. काही पुरोगामी, सत्यशोधक,विचारवंत भाषणे कर्मकांडावर देतात घरात मात्र सर्व अविवेकी परंपरा जोपासतात. श्रध्दा असावी परंतु ती विवेकावर, प्रयत्नांवर, अभ्यासावर, कष्टावर नशिबावर श्रध्दा ठेवुन काहीही उपयोग होणार नाही. धर्माने माणुस बदलला असता तर जगात परिवर्तन झाले असते. धर्म चिकित्सा करण्याचे मोठे काम तात्यासाहेब फुलेंनी केले. सावित्रीमाई यांनी हे काम पुढे चालु ठेवले. ह्या दांपत्याने समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला. आज जर त्यांच्या विचाराची ज्योत मनात लाऊन कृतीत उतरत असेल तरच त्यांचे विचार रुजल्याचे समाधान होइल.

एस.एच. भवरे
अतिथी संपादक
मराठी लाईव्ह न्यूज अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *