1 min read

स्मृतीशेष—गुरवर्य डॉ. गंगाधर पानतावणे सरांना विनम्र अभिवादन!

Loading

स्मृतीशेष….

गुरवर्य डॉ. गंगाधर पानतावणे सरांना विनम्र अभिवादन!

अस्मितादर्श हे आम्हा आंबेडकरवादी कवी लेखकांसाठी विश्वविद्यालयच होते. या विश्वविद्यालयाचे आमचे कुलगुरू गुरूवर्य डॉ. गंगाधर पानवणे सर होते. अस्मितादर्श नसते तर…
स्वातंत्र्यानंतर जे आंबेडकरवादी साहित्य निर्मिती झाली. तिचा पायाच अस्मितादर्श हे आंबेडकरी मुखवटा असलेले त्रैमासिक होते. यात दुमत नाही. अस्मितादर्शने केवळ लिहितेच केले नाही तर प्रबोधनपर चळवळीसाठी सिद्धही केले. डॉ. गंगाधर पानतावणे हे सर्व आंबेडकरवादी कवी,लेखक आणि विचारवंतासाठी प्रेरणास्थान होते. हेही आवर्जून नमुद करावेसे वाटते. एखादे वाड़्मयीन नियतकालिक पन्नास वर्षे नियमित चालवणे किती जिकरीचे असते. याची प्रचीती आज येतेय. सरांनी अथक परीश्रमाने ध्येयनिष्ठतेने अस्मितादर्श चालवले हेकुणालाही नाकबुल करता येणार नाही. अस्मितादर्शने साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाच्या चळवळीसाठी अस्मितादर्श मेळावे पुढे साहित्य संमेलने घेतली. वंचित लेखकांसाठी हे हक्काचे साहित्य आणि विचारमंच ठरले. यातही शंका नाही. माझा स्नेहसंबंध सरांशी १९७९ ला जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयात शिकत असताना प्रथमच आला. आमचे प्राचार्य डॉ. के. आर. सोनवणे हे मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे डॉ. पानतावणे यांचे सोबत अध्यापन करत होते. त्यामुळे डॉ. पानतावणे यांना महाविद्यालयात एका साहित्य समारंभासाठी निमंत्रण देणेसाठी मी औरंगाबाद येथे लक्ष्मी कॉलनी छावणी येथे सरांच्या घरी गेलो होतो. अतिशय अगत्यपूर्वक स्वागत सरांनी केले होते. नवलेखक आणि विद्यार्थी म्हणून त्यावेळेस मी अतिशय भारावून गेलो होतो. तिथेच ऋणानुबंधाच्या गाठीत बांधलो गेलोही. आमचे महाविद्यालयात सरांचे “आंबेडकरी विचार प्रवाहातील समज आणि गैरसमज” या विषयावर चिंतनीय व्याख्यान झालेले अजूनही स्मरणात आहे. पुढे अस्मितादर्शने माझी पहिली वाड़्मयीन नियतकालिकातील कविता प्रकाशित केली. सरांच्या प्रोत्साहनाने मी सातत्याने अस्मितादर्श मध्ये कविता लेखन करीत होतो.आजपर्यंत जवळ जवळ ५०कविता अस्मितादर्शने माझ्या प्रकाशित केलेल्या आहेत. माझेवर आणि माझ्या कवितेवर असलेले प्रेमापोटीच हे साध्य झालेय.अस्मितादर्शचा कवी म्हणून माझी एक स्वतंत्र ओळखही यामुळे झाली. माझ्या पहिल्या कवितासंग्रहाला ‘युद्ध सुरू आहे’ सरांचीच अंतर्भेदी प्रस्तावनाही लाभली. अस्मितादर्श मुळेच “युद्ध सुरू आहे” ते “युद्धरत” असा माझा कवितेचा प्रवास सुरूच आहे. सरांनी एक पालक म्हणूनही माझेकडे विशेष लक्ष दिले. माझे अधिकारी होणेतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. केवळ कवी म्हणून नव्हे तर जीवनसंघर्ष पेलण्याचे वेळोवेळी बळही सरांनी मला दिलेले आहे. मी बुलढाणा,भुसावळ,नाशिक आणि जळगाव येथे शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असतांना सर अनेकवेळा भेटीसाठी मुक्कामी यायचे ते क्षण माझेसाठी लाखमोलाचे असायचे. उषा हिंगोणेकर यांच्याही कवितालेखनाला सरांनी प्रेरणा देऊन अस्मितादर्श मध्ये उषा हिंगोणेकर यांचा दहा कवितांचा एक बंचच प्रकाशित केला आणि उषाच्या कवितेलाही अस्मितादर्शनेच प्रथम वाट दिली. “मुद्रालेख” या उषाच्या कवितासंग्रहालाही डॉ. पानतावणे सरांचीच चिंतनशील अशी प्रस्तावन लाभलीय. उषाचा पहिला “मुद्रालेख”आणि माझा “अंतर्भेदी”या दुस-या कवितासंग्रहाचे प्रकाशन भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालयात एकत्र झाले होते.त्यावेळेस डॉ. श्रीपाल सबनीस,डॉ. मनोहर जाधव आणि कवीमित्र अशोक कोतवाल उपस्थित होते. या समारंभामुळे दोघांच्याही कवितेकडे सरांनी लक्षवेधी केली होती. त्यामुळे अधिक जबाबदारी कवितेच्या प्रातांत आम्हा दोघांवर आली होती. २००२ ला नागपूर ये अस्मितादर्शचे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन भरले होते. डॉ. गंगाधर पानतावणे सर हे अध्यक्ष होते. या संमेलनास उद्घाटक म्हणून अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखिका डॉ. एलिनार झेलीएटही आल्या होत्या . त्या संमेलनात उषा हिंगोणेकर यांच्या “मुद्रालेख” या कविता संग्रहाला अस्मितादर्श वाड़्मय पुरस्कार घोषित झाला होता. तो डॉ. एलिनार झेलीएट यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला होता. पुरस्कार प्रदान करताना डॉ. झेलीएट उषा म्हणाल्या होत्या “उषा तुझी कविता मी अस्मितादर्श मधून वाचली आहे. अंतर्भेदी आहे तुझी कविता”या शब्दात उषाचा गौरव या संमेलनात झाला होता. तो फार सुखद क्षण होता. हिंगोणेकरांच्या कवितेला हा प्रथम पुरस्कार होता. आम्ही दोघे भारावून गेलो होतो. माझ्या पहिल्याही संग्रहाचे प्रकाशन १९९९ ला जळगाव येथे सरांचे हस्तेच झाले होते. आम्हा दोघांच्याही कवितेच सर असे प्रेरणास्तंभ झाले होते. सर ,म्हणजे आमचेसाठी आठवणींचे प्रेरणादायी भांडारच आहेत. डॉ. गंगाधर पानतावणे सर आज देहाने आपल्यात नाहीत. पण विचाराने आणि कार्य कर्तृत्वाने सतत मनात प्रकाशत आहेत. शेवटच्या काही दिवसात त्यांचे आजारपणात दवाखान्यात असताना मी आणि उषा त्यांना जाऊन भेटलो होतो. त्यावेळेस सरांची कन्या निवेदीता हीने सरांना आवाज देऊन जागे केले होते. "शशीकाका आलेयेत बाबा भेटायला" या आवाजाने सरांनी डोळे उघडून आम्हा दोघांना हात उंचावून आशिर्वाद दिला होता. तो क्षण अजूनही हृदयात घर करून आहे. सर दिसत नाहीत पण ते हृदयात वसून आहेतच.

सरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!💐💐💐 - शशिकांत हिंगोणेकर -उषा हिंगोणेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *