1 min read

क्रांतीज्योती सावित्रीमाईंना श्रद्धेय मानायचे आणि पोथ्यापुराण पारायणे व कर्मकांडही करायचे हे विसंगत दुटप्पी वर्तन महिलांनी थांबवावे

Loading

क्रांतीज्योती सावित्रीमाईंना श्रद्धेय मानायचे आणि पोथ्यापुराण पारायणे व कर्मकांडही करायचे हे विसंगत दुटप्पी वर्तन महिलांनी थांबवावे
‘ क्रांतीज्योती सावित्रीमाईंना श्रद्धेय मानायचे आणि पोथ्यापुराण पारायणे व कर्मकांडही करायचे हे विसंगत दुटप्पी वर्तन महिलांनी थांबवावे ‘ असे कळकळीचे आवाहन जेष्ठ सत्यशोधकी कार्यकर्ते प्रल्हाद लुलेकर ( छत्रपती संभाजी नगर ) यांनी केले.शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी रात्री आभासी पद्धतीने सत्यशोधक महिला संघ आयोजित पहिले महिला अधिवेशन दिनांक १० मार्च २०२४ रोजी होत आहे त्या अधिवेशनाच्या नियोजन व कार्यवाही संदर्भात चौथी मीटिंग झाली त्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना लुलेकर बोलत होते.
मिटींगला प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधकीय समाज अधिवेशनाचे माजी अध्यक्ष जी.ए.उगले ( पैठण ) सर उपस्थित होते.
प्रास्ताविक सत्यशोधक समाजाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार यांनी केले.मार्गदर्शनात लुलेकर पुढे म्हणाले की,’ शिकून महिलांना स्वतंत्रपणे विचार करता यावा ; निर्भयपणे तत्वनिष्ठ सद्वर्तन करता यावे ही अपेक्षा क्रांतीज्योती सावित्रीमाईंना होती.सावित्रीमाईंच्या साहित्याचे विश्लेषण करणारा आशा कांबळे लिखित ग्रंथ कार्यकर्त्यांनी वाचला पाहिजे.सावित्रीमाई आधुनिक काव्याच्या जनक आहेत असे कांबळेंनी अभ्यासपूर्ण मांडले.सावित्रीमाईंनी अदम्य जिद्दीने जमिनीत पाय रोवून नितीधैर्याने आकाशाला हात लावले ! धार्मिक आणि जातीय वातावरणाच्या बाहेर पडण्यासाठी फुले यांच्या विचारांशिवाय दुसरा मार्ग नाही.ज्योतिबांनी सामाजिक युद्ध केले ते सर्वांर्थाने समजून घ्या.बहुजन संस्कृतीचे जनक ज्योतिबा फुले यांचा विचार दीर्घकाळ घेऊन पुढे जाता आलं पाहिजे असे आवाहनही लुलेकरांनी कार्यकर्त्यांना केले.
सभेच्या प्रारंभी प्रस्तावनेनंतर सत्यशोधक समाजाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार यांनी संमेलनाला येणाऱ्या कार्यकर्त्या भगिनींचा आणि बांधवांचा संख्यानिहाय आढावा निवास व भोजन व्यवस्थेसाठी विभागीय नेतृत्व करणाऱ्यांतर्फे घेऊन महत्वपूर्ण सुचना केल्या. त्याचप्रमाणे अधिवेशनासाठी मदतनिधी कार्यकर्त्यांनी गतीने मिळवून आर्थिक बळ वाढवल्याशिवाय संमेलन निर्विघ्न यशस्वी होणार नाही याची सांगोपांग चर्चेने जाणीव करून वेळ कमी असल्याने अधिक जोमाने प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचे कळकळीचे आवाहन केले. महाराष्ट्रात सर्वत्र सत्यशोधकीय विधी होत असल्याने महात्मा जोतिबांचे सत्यशोधकी विचार सर्वार्थाने सर्वसामान्यांच्या आचार विचारात रुजू लागल्या बद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केलं.नाशिक व नायगाव अधिवेशनाच्या स्मरणिका ११ मे २०२४ रोजी प्रकाशित होतील.तसेच प्रमोद पाटील ( धरणगाव ) लिखित ‘ आदर्श महामाता ‘ चरित्रात्मक लघुपुस्तिका नायगाव अधिवेशनात प्रकाशित होईल हे खैरनार यांनी जाहिर केले.संस्थापक राज्यसचिव डॉ. सुरेश झाल्टे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,’ सत्यशोधक कल्चर रुजवणे अधिवेशनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.अंधश्रद्धा व रुढीपरंपरा नष्ट करून महिलांनी सत्यशोधकी संस्कृती कटाक्षपूर्वक आचरणात आणावी.राजकीय क्षेत्रातील भगिनी सहज उपलब्ध होत नसल्याने पुरोगामी परिवर्तनाची धुरा सांभाळणाऱ्या सर्वसामान्य भगिनींना सर्वतोपरी मोठे तथा अभ्यासू कृतीशील परिपूर्ण सक्षम कार्यकर्त्या घडविणे काळाची नितांत गरज आहे.कृषी संस्कृती नव्याने पुनर्जिवीत करणेही कालौघात अत्यावश्यक असून बळीराजाचे नैतिक व आर्थिक मनोधैर्य वाढवणे व सामाजिक सन्मान प्रस्थापित करणे सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे.’ सत्यशोधक चळवळीचे चालते बोलते विद्यापीठ तथा माजी अध्यक्ष जी.ए. उगले सर मार्गदर्शनात म्हणाले की, ‘ संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्षा,स्वागताध्यक्षा ,समारोपाध्यक्षा व संमेलनातील ठराव यांचे पुस्तक खैरनार साहेबांनी प्रकाशित करावे.हा संघटनेचा महत्वपूर्ण दस्तावेज पुढील कार्यकर्त्यांना ऐतिहासिकदृष्ट्या दिशादर्शक असून चळवळीचा प्राणवायू असतो.कार्यकर्त्यांनी एकमेकांना ‘ जय सत्यशोधक ‘ हे अभिवादन कटाक्षतेने करावे.या अभिवादनातून आत्मबल व आत्मविश्वास वाढून कार्यकर्त्यांची विशिष्ट प्रतिमा जनमानसात समोर येते अन् रुजते.’ कुऱ्हा पानाचे (जळगाव ) संमेलनात महात्मा फुले प्रणित सत्यशोधकी ध्वजवंदनाने शुभारंभ करून ऐतिहासिक पायंडा अरविंद खैरनार साहेबांनी रुजविल्याबद्दल उगले सरांनी कौतुकाचा वर्षाव करून खैरनार यांचे सहर्ष अभिनंदन केले.खैरनार साहेबांनी कार्यकर्ता म्हणून दैनिक रोजनीशी आवर्जून लिहावी ही आग्रहाने प्रेमळ सूचनाही उगले सरांनी दिली.सत्यशोधक किरण इंगोले (पुणे) यांनी अधिवेशन दिवसाच्या अन्नदानासाठी आर्थिक योगदान देण्याबाबत उत्स्फूर्त जबाबदारी घेणार असल्याचे जाहिर केले.विजय लुल्हे (जळगाव ) यांनी विनम्र सुचना मांडली की, ‘ सत्यशोधक चळवळीचा अभ्यास व महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे समग्र वाङ्मय तसेच हरी नरके,जी.ए.उगले व प्रल्हाद लुलेकर यांची ग्रंथसंपदा अधिवेशनात कार्यकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी.यावर उगले सर व लुलेकर सरांनी सायन प्रकाशन तसेच शासकीय मुद्रणालयातून पुस्तके उपलब्ध करून द्यावी अशा मार्गदर्शक सुचना बिनीचे कार्यकर्ते भगवान रोकडे यांना हक्काने केल्या.
ऑनलाइन मिटींगला राज्यभरातून महिला भगिनी कार्यकर्त्यांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त आणि प्रेरणादायी मिळत आहे.मिटींगला वंदना वनकर,उज्ज्वला तांबे,सविता हजारे ,हेमलता पिंपरे,अनिता मंडलिक,मीनल राणे,मीरा मदन,छाया पवार यांसह भागवत रामचंद्र (दौंड ) विधीकर्ते भगवान रोकडे ( चाळीसगाव ) व कोथिंबीरे,किरण इंगोले,कृष्णा मलिक,बाजीराव खैरे,डॉ.देविदास शेंडे,रमेश वराडे ( जामनेर ),रवींद्र तितरे व विजय लुल्हे ( जळगाव ), प्रमोद पाटील व हेमंत माळी (धरणगाव ),राजकिशोर तायडे (धुळे ),वसंत शिंदे ( सातारा ),सुकदेव महाजन यांसह एकूण ५३ बंधु भगिनी उपस्थित होते.आभार प्रदर्शन रिंपल जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *