अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा!
![]()
अहाहा! काय भोव साक्रीरोडना रस्ता! काय त्या धव्याबंब पट्टा!
पाटील साहेब, तुम्हीन नवरी नटाडी पण सोपारीच नहीं फुटनी हो!

‘‘जीवनाला कंटाळलात? सुलभ मरण हवे? मोफत, मोफत, त्वरा करा, साक्री रोडवर या’’ या शिर्षकाखाली जनहित डोळ्यासमोर ठेऊन धुळे शहरातील साक्री रोडवरील पांढरे पट्टे विरहीत सदोष गतिरोधक व या गतिरोधकांवर होणारे रोजचचे लहान मोठे अपघात या संदर्भात थोड्या उपरोधिक शब्दात लिहिलेले माझे पत्रक वृत्तपत्र व समाज माध्यमांवर परवा झळकले होते. काही वर्ष आमच्या परिसरात रहिवास असलेले निवृत्त उपअभियंता विजय मंगळे साहेब यांनी संबंधित पोस्ट सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळेचे म. कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील साहेब यांच्याकडे फॉरवर्ड केली. पाटील साहेब यांनी त्वरीत दखल घेत माझ्या मोबाईलवर पाठविलेल्या संदेशात म्हटले, ‘‘वाचले, आपले सविस्तर म्हणणे आपल्या सोयीने समजून सांगावे’’ मीही संदेश पाठवून त्यांचे ऋण व्यक्त केले. तशी माझी त्यांच्याशी कधी प्रत्यक्ष भेट नाही अथवा ओळखही नाही. साक्री तालुका हा अभियंत्यांची खाण असलेला तालुका आहे. त्याच खाणीतील एक रत्न आर.आर. पाटील साहेब खोरी टिटाणे गावचे आहेत. आमच्या सुयोग परिवारातील ‘देवडॉक्टर’ दादासाहेब दिलीप पाटील यांचे ते लहान बंधू असल्याचे समजले. त्यांच्या संदेशाप्रमाणे मी त्यांना भेटायचे ठरविले आणि परवाच साक्री तालुक्यातील शेवाळी येथे आमच्या साक्री रोडवरील ‘रंगारंग’ गृपच्या मित्र परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र निवृत्त जिल्हा लेखा परिक्षक यशवंत पुंजू तथा वाय.पी. अण्णा पाटील यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी शेवाळी स्मशानभूमीत ते आल्याचे समजले आणि ही संधी साधून स्मशान भूमीतच त्यांची भेट घेतली. त्यांच्या संदेशाबद्दल ऋण व्यक्त करत असतांनाच साक्री रोडवरील गतीरोधकांबद्दलची व्यथा त्यांच्या कानावर घातली, सर्वच त्यांनी गंभीरपणे एैकुण घेतले. अंमलबजावणीचे आश्वासन देत असतांनाच मोतीनाला ते सुरेंद्र डेअरी पर्यंतचे कामास मंजुरी मिळाली असून ते काम सुरु होईल अशी ‘गुड न्युज’ ही दिली. आणि दुसऱ्याच दिवशी पहाटे त्यांनी माझ्या भ्रमणध्वनीवर सिंचन भवन जवळील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारलेले फोटो पाठविले. त्यांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल कौतुक आणि आश्चर्यही वाटले. गतिरोधकावरील पट्टे जणू नटलेल्या नववधु प्रमाणे दिसत होते. मोहन मेडीकल, राकेश इलेक्ट्रॉनिक्स, कृष्णा बेकरी समोरील गतिरोधकावर काही दिवसापूर्वी कुसुंबे येथील एक भगिनी शहीद झाली होती. काही वर्षापूर्वी सिंचनभवन जवळ एका शाळकरी मुलीचा बळी गेला होता. असंख्य गतिरोधक पांढरे पट्टेविना आजही आहेत. त्या दिवशी मॉर्निंग वॉकला जात असतांना सिंचन भवन जवळील गतिरोधकावरील पांढरे पट्टे मी स्वत: उघड्या डोळ्यांनी पाहिले. स्वत:चे डोळे चोळीत मी खात्री करून घेतली. मॉर्निंग वॉकला जाणारे व परिसरातील अनेकांनी भ्रमणध्वनीवर माझे अभिनंदन केले. मीही मनातल्या मनात आनंदाचे ढोल बडवत होतो. पण तो आनंद माझा काही तासच टीकला. भूताटकी-भूतबाधा व्हावी तसे ते पांढरे पट्टे एकदम गायब झाले. आता होते गेले कुठे? साहेबांनी लॉलीपॉप तर नाही दिला ना? तोंडात धरला आणि विरघळला. शांततेचे प्रतिक असलेल्या पांढऱ्या रंगात एव्हढी भेसळ ?अंधारी मारलेले पट्टे उजेड होताच धारातीर्थी पडावेत. फोटोत नटलेल्या नवरीप्रमाणे दिसणारे, पाटील साहेब यांनी ‘लगीनघाई’ करत सजवलेले गतिरोधक काही तासात होत्याचे नव्हते होणे म्हणजे नवरीला जणू लग्न होताच वैधव्य प्राप्त होणे समजावे काय? अधिकारी गतिरोधाकावरून अजून किती बळींची वाट पाहणार आहेत? ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असाच एकूण प्रकार होत असूनही सनदशिर शांततामय आंदोलन न करता मुकाटपणे सहन करणाऱ्या सहनशील साक्रीरोड वासियांना माझा साक्षात दंडवत. कारभारीसनं काय सांगवो-
‘‘आंधीनी गड जिका व माय
नांदी तव्हय खरं वो माय!’’
- गो.पि. लांडगे, ज्येष्ठ पत्रकार , मो. 9422795910

