सत्यशोधक हा मराठी चित्रपट हृदयाला स्पर्श करणारा- ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर
![]()

आज संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे कृतीशील विचारधन प्रकट करणारा सत्यशोधक हा मराठी चित्रपट जळगावच्या आयनाँक्स चित्रपट पाहाण्याचा योग माझे मित्र आणि सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते विजयकुमार लुल्हे ,सहचारिणी कवयित्री उषा हिंगोणेकर यांचेसह आला. अप्रतिम अभिनय आणि हृदयस्पर्शी क्रांतिकारी विचारांनी पेरलेला हा केवळ चित्रपट नाहीय तर येणाऱ्या काळाचे आव्हान पेलण्याचे बळ देणारी प्रबोधनपर धगधगती सत्यकथाच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना गुरू का मानले याची प्रचिती देणारा हा चित्रपट पारंपरिक समाज व्यवस्थेच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा संदेश पेरणारा निश्चितच आहे. परिवर्तन आणि पुरोगामी विचारधारा अंगिकारणा-यांनी हा चित्रपट सहकुटुंब पहावाच.
या निमित्ताने माझी ज्योतिबा ही कविताही जरूर अनुभवावी. ज्योतिबा/शशिकांत हिंगोणेकर
ज्योतिबा,
कठीण आहे तुझा मार्ग
पण अटळच आहे
माझीही वाटचाल
जातीभेद
वर्णव्यवस्था
आणि धर्मव्यवस्था
सारीच छळव्यवस्था
नाकारलीस तू
परिवर्तनाची
पहिली ठिणगी होऊन
तू शिलगावलास
सारा विषम सभोवताल
तू झालास
प्रबोधनाचा भरभक्कम पाया
माझ्या भिमरायाचा
सावित्रीला शिकवून
मुलींसाठी भिडेवाड्यात
काढलीस पहिली शाळा
एवढेच नव्हे तर
अस्पृश्यांसाठीही काढलीस
वेताळपेठेत शाळा
विद्येविना अनर्थ होते आयुष्य
तुझ्यामुळेच आयुष्याला
नवा अर्थही आलाय
सामाजिक समतेच्या लढाईत
तू केवळ पाण्याचाच नव्हे तर
ज्ञानाचाही हौद खुला केला
गुलामगिरी झुगारून
अन्यायावर आसुड ओढून
असत्याची केलीस दमछाक
सत्यवर्तनी झालास
मानवतेचा सत्यधर्म दिलास
महात्मा झालास
सा-या जगताचा
आणि
निर्मिकही झालास
मानव्याचा


तू दिलेस
मला तृतीयनेत्र
मी झालोय आता डोळस
नाकारतोय सारेच
कावेबाज कसब
मी झालोय
आता तुझा पाईक
ठोकर मारतोय इथल्या छळव्यवस्थेला
ज्योतीबा,
तू झालाहेस माझा अखंड ध्यास
धगधगताहेत तुझ्या क्रांतीपर्वात
माझेही नवे श्वास
✍✍✍

