1 min read

भीमा कोरेगावची लढाई सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठीचा एल्गार होता- भरत शिरसाठ

Loading

भीमा कोरेगावची लढाई सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठीचा एल्गार होता- भरत शिरसाठ

एक जानेवारी 1818 रोजी दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रजांमध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेले युद्ध हा सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी शोषितांमार्फत करण्यात आलेला एल्गार होता, असे प्रतिपादन समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी बोरगाव तालुका एरंडोल येथे आयोजित करण्यात आलेल्या 206 व्या भीमा कोरेगाव शौर्य दिवस प्रित्यर्थ आयोजित अभिवादन सभे प्रसंगी केले. भारतीय बौद्ध महासभा शाखा बोरगाव च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कॅप्टन फ्रान्सिस स्टाॅन्टन याच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रंट्री च्या दुसऱ्या बटालियन मध्ये 500 महार सैनिक व जवळपास 300 अन्य बहुजन सैनिकांचा समावेश होता. दुसरा बाजीराव पेशव्याच्या दिमतीखाली असलेल्या 28 हजार सैनिकांना या महार व अन्य बहुजन सैनिकांनी त्यावेळेस आसमान दाखवले होते. अचूक तोफांचा मारा व कुशल युद्धनीतीचा वापर करून मोजक्या सैन्यांनी त्यावेळेला पेशव्यांच्या सैन्याला सडो की पडो करून सोडले होते. पेशवाई मध्ये अस्पृश्यता पदरी पडल्यामुळे शोषित समाजाचा इंग्रजांच्या बाजूने लढून पेशवाईविरुद्ध उगारलेला हा एल्गार होता. जातीयतेतून व गुलामीतून मुक्ती हा त्या एल्गारा मागील आवाज होता. सदर लढाई ही कोणत्याही विशिष्ट जाती विरुद्ध किंवा धर्माविरुद्ध नव्हती तर साम्राज्यवादाच्या या लढाईला जातीयता व वर्णव्यवस्थेच्या विषमतेचे पंख होते. त्या वादळा सारखा झंजावात असणाऱ्या 500 महार सैनिकांचा तडाखा पाहून बाजीराव पेशव्यांच्या सैन्याला पळून जावे लागले होते. या विजया प्रित्यर्थ इंग्रजांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभ उभारलेला असून त्या विजयस्तंभावर लढणाऱ्या महार सैनिकांची व बहुजन सैनिकांची नावे कोरलेले आहेत. त्या ठिकाणी जगभरातील शोषित- वंचित सामाजिक समतेसाठी आग्रही असणारे लोक जगभरातून या ठिकाणी भेट देत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे स्वकीयां विरुद्ध असणारी ही लढाई भूषणावह जरी नसली तरी त्यामागे सामाजिक संदर्भ आहेत जे अस्पृश्यता व गुलामी पर्यंत जाऊन पोहोचतात. म्हणून एक जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी भेट दिली असल्याचे भरत शिरसाठ यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे ग्रामिण उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष पुंडलिक शिरसाठ, संरक्षक गौतम सोनवणे, सरचिटणिस किरण नेतकर, संघटक गोपीचंद सोनवणे, समता सैनिक दलाचे संजय सोनवणे, महिला अध्यक्षा अंजलि सोनवणे, उपाध्यक्षा ज्योती सोनवणे, महिला संघटक ऊषाबाई नेतकर, कल्पना शिरसाठ, प्रमिला सोनवणे, छायाताई, प्रतिक्षा सोनवणे, करुणा सोनवणे, प्रज्ञा सोनवणे, तोषानि सोनवणे, अपेक्षा सोनवणे तसेच मोठ्या प्रमाणावर बोरगाव येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक किरण नेतकर यांनी केले तर आभार प्रतीक्षा सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *