1 min read

नागपूर येथे बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी होणारे धरणे आंदोलन यशस्वी करण्याचा जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा निर्धार

Loading

नागपूर येथे बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी होणारे धरणे आंदोलन यशस्वी करण्याचा जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा निर्धार

जळगाव: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने यशवंत स्टेडियम नागपूर येथे येत्या बुधवारी म्हणजेच दि १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.संजयजी शिंदे व इतर सन्माननीय पदाधिकारी तसेच विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना अर्थात विजुक्टाने धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चालू हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित धरणे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करून आज दि.९ डिसेंबर रोजी जळगाव येथील बेंडाळे महिला महाविद्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये जनआक्रोश मोर्चा,धरणे आंदोलन व बेमुदत संपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने स्वयं प्रेरणेने सदर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील सोनार (सचिव) यांनी केले. सदर बैठकीमध्ये जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा.शैलेश राणे (कार्याध्यक्ष), प्रा.राजेंद्र चव्हाण (सहसचिव), उपाध्यक्ष सर्वश्री. प्रा.शरद पाटील, प्रा.गजानन वंजारी, डॉ.अतुल इंगळे आदी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
1)1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानामध्ये नियुक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा जुनी पेन्शन योजनेमध्ये समावेश करून त्यांच्यावर नियुक्ती निकषाद्वारे पेन्शनबाबत झालेला अन्याय त्वरित दूर करावा व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.
2)1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना 1982 प्रमाणे ती लागू करावी.
3) राज्यातील इ.11 वी व 12 वी कला व वाणिज्य शाखांमध्ये विद्यार्थी पटसंख्या सातत्याने कमी होत आहे, कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या माध्यमिक संलग्न तुकडीला किमान 21 विद्यार्थी व महाविद्यालय संलग्न तुकडीला किमान 31 विद्यार्थी हा निकष लागू करून तुकड्या कायम ठेवाव्यात व संच मान्यतेकरीता आधार वैधतेची अट न ठेवता प्रवेशित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड विचारात घेऊन संच मान्यता करावी व यापूर्वी याबाबत झालेला अन्याय त्वरीत दूर करावा.
4)वाढीव पदांना रुजू दिनांक पासून मंजुरी द्यावी व आय.टी. विषय अनुदानित करावा.
5)अंशतः अनुदानित उ.मा.वि./ क.म.वि.ला प्रचलित अनुदानाच्या निकषाद्वारे 100% अनुदान देण्यात यावे व अघोषितला 100% अनुदानासह घोषित करावे.
6)शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना त्वरित लागू करावी तोवर निवडश्रेणीची 20%ची अट रद्द करावी. 7)विनाअनुदानित व अंशतः अनुदानितमधून बदली स्थगनादेश मा. उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे त्यामुळे तातडीने बदली बाबतचे निर्देश शासनाने निर्गमित करावे.
8)ग्रॅज्युएटी (उपदनाची) मर्यादा केंद्राप्रमाणे 20 लाख करावी तसेच विद्यार्थी हितासाठी शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी.
9) एम.एड.,एम.फिल. पीएचडी.धारक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालययीन प्राध्यापकाप्रमाणे वेतन वाढ लागू करावी व केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे. 10)डीसीपीएस एन.पी.एस. योजना लागू केलेल्या शिक्षकांना त्यांच्या जमा पावत्यांचे हिशेब व शासनाच्या 23 फेब्रुवारी 2021 च्या शासनाच्या आदेशान्वये सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने अदा करावे.
11)कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्ष कमी झाला तरच त्याला अतिरिक्त घोषित करण्यात यावे तोवर मूळ आस्थापनेवर त्याला कायम ठेवावे.
12)घड्याळी तासिकेवरील अशासकीय संस्थेतील शिक्षकांचे मानधन शासकीय क.म.वि. शिक्षकांच्या दिनांक 27 मार्च 2023 च्या शासनादेशाप्रमाणे करण्यात यावे व भेदभाव संपुष्टात आणावा.
13)कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्त व प्राचार्य व उपप्राचार्य यांना पदोन्नतीची वेतन वाढ देण्यात यावी.
14)अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यास त्याच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतन वाढ व इतर लाभासाठी ग्राह्य धरावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *