श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन
![]()

श्री तुलसी विवाहानिमित्त मंगळग्रह मंदिरातर्फे भव्य शोभायात्रा, वृक्षदिंडीचे शनिवारी आयोजन
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता विविध मूर्तींची भव्य शोभायात्रा काढण्यासह पर्यावरणविषयक जनजागर करण्याच्या उद्देशाने वृक्षदिंडीचेही आयोजन केले आहे.
शोभायात्रेत देशभरासह परदेशातही गाजलेले तरुण-तरुणींचे आणि कसरतींयुक्त नाशिक येथील गुलालवाडी ढोलपथक, मुंबईतील तरुणींचा म्युझिकल ग्रुप आणि बरेच काही असणार आहे. याच दिनी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत वर राजा भगवान श्री विष्णूजी व वर राणी माता श्री तुलसी देवी यांना हळद, मेंदीचा तसेच फक्त माता – भगिनींसाठीच संगीतसंध्येचा कार्यक्रम होईल. यात माता-भगिनींना पूर्णपणे प्रायव्हसी असेल. त्यामुळे नृत्यकलेसह पारंपरिक तथा सांस्कृतिक कला सादर करण्याची अनोखी संधीही उपलब्ध होणार आहे. उपस्थित माता-भगिनींसाठी शोभायात्रेच्या प्रारंभी नाश्ताची व शोभायात्रा संपल्यानंतर मंदिरात सायंकाळी ७ वाजता स्रेहभोजनाची व्यवस्था असेल.
सदर शोभायात्रेत भाविकांनी पारंपरिक भारतीय वेषात, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शक्य झाल्यास गणवेशात तसेच माता-भगिनींनी डोक्यावर सजवलेला कलश अथवा छोटेखानी तुलसी वृंदावन घेऊन नऊवारी साडी परिधान करुन अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
असा असेल शोभायात्रेचा मार्ग
संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानापासून शोभायात्रेचा प्रारंभ होऊन सराफ बाजार-दगडी दरवाजातून तिरंगा चौक-कोंबडी बाजार-नगरपालिकेच्या पाठीमागून सुभाष चौक-राणी लक्ष्मीबाई चौक-मोठा बाजार- फरशी पूल-चोपडा नाका-श्री मंगळग्रह मंदिर येथे सांगता होईल.

