महा अंनिस जळगाव शहर शाखेमार्फत सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप
![]()


महा अंनिस जळगाव शहर शाखेमार्फत सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप
जळगाव: येथील पिंप्राळा परिसरात महानगरपालिका, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या बलिप्रतिपदा या दिवशी सकाळी सफाई कामगारांना दिवाळीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमांतर्गत फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महा अंनिस राज्य कार्यवाहक वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग दिगंबर कट्यारे, ज्येष्ठ साहित्यिक व सत्यशोधक समाजाचे डॉ. मिलिंद बागुल, डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे, सफाई कामगार विभाग प्रमुख श्री कांबळे सर, चेतना व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख चेतना विसपुते, महा अंनिस जळगावच्या कार्याध्यक्षा कल्पना चौधरी तसेच महिला बचत गट कर्मचारी श्रीमती हेमांगी टोकेकर इत्यादी मान्यवर होते. सुरुवातीला सफाई कामगारांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रबोधन या विषयावर दिगंबर कट्यारे यांनी सफाई करताना गल्लीबोळातून, चौकातून आणि घराघरातून होणाऱ्या अंधश्रद्धा यावर प्रबोधन केले. यानंतर महा अंनिस कार्यकर्ते आनंद ढिवरे यांनी पाण्यावर दिवा पेटवून दाखविणे आणि तांब्या मधून पाणी गायब करणे आणि पुन्हा पाणी काढून दाखवणे असे प्रयोग दाखवून सप्रमाण प्रबोधन केले. यानंतर डॉ. मिलिंद बागुल यांनी पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकऱ्यांच्या मनगटावर उभी आहे असे प्रतिपादन केले. यानंतर चेतना विसपुते यांनी स्वतःचा विकास होण्यासाठी व्यसनमुक्त होणे आवश्यक असते म्हणून सुरुवातीपासूनच व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाच्या दरम्यान दरवर्षी फराळ वाटप करणारे समाजसेवक विजय लुल्हे यांचा यथोचित पुस्तक देऊन डॉ. मिलिंद बागुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज आहे असे अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जितेंद्र धनगर यांनी केले. कार्यक्रमाला सदिच्छा भेट म्हणून माजी नगरसेवक आबासाहेब कापसे आलेले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरीष चौधरी, सुभाष सपकाळे, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पिंप्राळा परिसरातील सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वात शेवटी सफाई कामगारांना फराळ व मिठाई देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

