महाविकास आघाडी जागावाटपाचे ते वृत्त निराधार–भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार – दयानंद चोरघे
![]()

महाविकास आघाडी जागावाटपाचे ते वृत्त निराधार–भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार – दयानंद चोरघे
ठाणे:भिवंडी ( मनिलाल शिंपी):आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीत झळकले असून हे वृत्त निराधार असून असा कोणताही फार्मूला ठरला नसून भिवंडी लोकसभेची जागा सुद्धा काँग्रेस पक्षच लढविणार असल्याचे स्पष्टीकरण ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले आहे.
राज्यात व देशात शेकडो न्यूज चॅनेल असून सदर बातमी फक्त एकाच चॅनेलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. शिवाय या बातमीला महाविकास आघाडीमधील एकाही प्रमुख नेत्याने दुजोरा दिला नाही.देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणूक होत असून डिसेंबर महिन्यात निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून जागावाटप करणार आहेत.
दरम्यान काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग आढावा बैठकीत भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षालाच अनुकूल असून ही जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसनेच लढवावी अशी आग्रही मागणी दयानंद चोरघे यांनी केली असता प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आघाडी होवो अथवा न होवो भिवंडी लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष सोडणार नाही असे अभिवचन कार्यकर्त्याना दिले होते.त्यामुळे फक्त एकाच वृत्तवाहिनीमध्ये झळकलेले ते वृत्त निराधार असल्याचे दयानंद चोरघे यांनी म्हटले आहे.शिवाय कोकणातील पाचही जिल्ह्यात काँग्रेस एकही जागा लढणार नाही हे हास्यास्पद असून तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच विरोधकांनी ही बातमी दिली असल्याचा संशय दयानंद चोरघे यांनी व्यक्त केला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी या बातमीवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही चोरघे यांनी केले आहे.

