1 min read

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात जैताणेत 51 दात्यांचे रक्तदान; साक्री ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्य!

Loading

मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात जैताणेत 51 दात्यांचे रक्तदान; साक्री ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्य!

जैताणे-निजामपूर (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्था व साक्री ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 51 दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून दातृत्वाची अनोखी प्रचिती दिली. मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त जैताणे(ता.साक्री) येथील शिवाजी रोडवरील भारत सायबरजवळ हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने शिबिराचे उद्घाटन झाले.

साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिक्षिका डॉ.वैशाली शिरसाठ, संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते त्रिलोक दवे, युवा कार्यकर्ते भय्या गुरव, जैताणेचे माजी उपसरपंच नवल खैरनार, मुख्याध्यापक कमलेश भामरे, डॉ.भटनागर आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. सकाळी अकराला सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरात दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे 51 दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. दात्यांना मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फ टी-शर्ट, सन्मानपत्रे व अल्पोपहार देण्यात आला. तर जिल्हा रुग्णालयातर्फेही प्रमाणपत्रे व रक्तदान कार्ड देण्यात आले. रक्तदान शिबिराला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन मातोश्री सेवाभावी संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाला शुभेच्छाही दिल्या. मातोश्री सेवाभावी संस्थेच्या संचालक मंडळासह अखिल भारतीय माळी महासंघाच्या जैताणे शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

रक्तदात्यांना मातोश्री सेवाभावी संस्थेच्या संचालक मंडळातर्फे सन्मानपत्रे देऊन गौरविण्यात आले. अनावश्यक सत्कार व लांबलचक राजकीय भाषणे टाळून अतिशय साध्या पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. साक्री ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ.वैशाली शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षवर्धन चित्तम, रक्तपेढीचे प्रमुख डॉ.सुनील चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश गावित यांनीही उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात. रक्तदान करणाऱ्या 51 दात्यांना स्वतःला किंवा त्यांच्या नातेवाईक अथवा मित्रपरिवाराला तातडीच्या वेळेस रक्ताची गरज भासल्यास रक्तदानकार्ड दाखवून जिल्हा रुग्णालयातर्फे त्यांना तातडीने रक्त उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.महेश जोशी व जनसंपर्क अधिकारी चंदूलाल साठे यांनी दिले. डॉ.वैशाली शिरसाट यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे यांना रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजनारायण जगदाळे, सचिव सुशीलकुमार जगदाळे, खजिनदार जगदीश खैरनार, संचालक भारत जाधव, आशुतोष जगदाळे व अनुराग जगदाळे आदींनी परिश्रम घेतले. तसेच अखिल भारतीय माळी महासंघाचे जैताणे शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष रवींद्र देवरे, सचिव श्रीकांत खलाणे, खजिनदार सागर जगदाळे, कायदेशीर सल्लागार ऍड.विकास माळी, तुषार देवरे, नंदकुमार जाधव, अशोक पिंपळे, चेतन गवळे, छोटू जाधव आदींनी विशेष सहकार्य केले. साक्री ग्रामीण रुग्णालय, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रक्तसंकलन केंद्र, धुळे येथील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.महेश जोशी, जनसंपर्क अधिकारी चंदुलाल साठे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनील शिंदे, योगिता कोकणी, हेमंत देवरे, प्रयोगशाळा परिचर सिद्धार्थ भामरे, रुग्णवाहिका चालक दीपक कासार आदींनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले. “केवळ गटातटाचे व जातीपातीचे संकुचित राजकारण करण्यापेक्षा समाजहितासाठी विधायक उपक्रम राबवून समाजकारण करण्याचा संस्थेचा प्रामाणिक उद्देश असल्याची भूमिका प्रा.भगवान जगदाळे यांनी यावेळी बोलताना मांडली.” संस्थेचे सचिव सुशीलकुमार जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *