प्रताप महाविद्यालयाची सातपुडा पर्वतावर निसर्ग भ्रमंती,पदभ्रमण विभागाचा उपक्रम
![]()


प्रताप महाविद्यालयाची सातपुडा पर्वतावर निसर्ग भ्रमंती
पदभ्रमण विभागाचा उपक्रम
अमळनेर : येथील प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयाच्या पदभ्रमण विभागाच्या वतीने नुकतेच सातपुडा पर्वतरांगेत पदभ्रमण पार पडले.
निसर्गप्रेमी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी चोपडा, गूळ प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पापासूनच या पदभ्रमणास सुरुवात झाली. सातपुड्याच्या जंगलातील विविध प्रकारची वृक्ष, फळे, फुले, पक्षी, फुलपाखरे, यांचे निरीक्षण करून सर्वांनी निसर्ग व जंगल भ्रमंतीचा आनंद लूटला.
निसर्गातील रंग, रूप, रस, गंध, स्पर्श या घटकांची निसर्गप्रेमींनी अनुभूती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी नागमोडी रुपात वाहणाऱ्या गूळ नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवान वाहणाऱ्या गूळनदीच्या प्रवाहात साखळी करून ऐलतीरावरून पैलतीरावर जाण्याचे धाडस केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.
पदभ्रमण समिती प्रमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विज्ञान विभागप्रमुख डॉ. जयंत पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “ मी विद्यार्थ्यांसह गेल्या तीस वर्षांपासून अविरत निसर्गभ्रमंती करीत आलो आहे. निसर्गात गेल्याने एक वेगळी ऊर्जा मिळते, सर्वत्र हिरवेपणाची अनुभूती मिळते. मनशुद्धीसाठी निसर्गाची मदत होते. त्याचा उपयोग बुद्धिमत्ता वाढीसाठी होतो. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक आहे.” असे मत व्यक्त केले.
यावेळी पदभ्रमण समिती सदस्य वसतिगृह प्रमुख डॉ. अमित पाटील, इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनंजय चौधरी, प्रा. संदीप नेरकर (विज्ञान विभाग), प्रा. आकाश चौधरी प्रा. उन्मेष जाधव आणि महाविद्यालयातील विविध विभागातील ३३ विद्यार्थी- विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले होते.
परतीच्या प्रवासादरम्यान मंगळग्रहदेव मंदिराचे दर्शन घेण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. बी. जैन यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम राबविण्यात यश आले.

