कामगार कल्याण मंडळाच्या योजनांच्या आर्थिक लाभांमध्ये भरीव वाढ करावी: राज्य गुणवंत कामगार संघटनेची मागणी
प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने विविध योजना व उपक्रम संपुर्ण राज्यभर राबविले जातात. ज्यायोगे राज्यातील कामगार वर्गाची सर्वांगिण उन्नती व प्रगती साधली जाते. यामध्ये विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती व गंभीर स्वरूप आजार या योजनांचा देखील समावेश आहे. सध्याची वाढती महागाई व त्या अनुषंगाने उच्च शिक्षणासाठी व गंभीर स्वरूप आजार यासाठी होणारा खर्च यांचा ताळमेळ बसविणे सर्वसामान्य कामगारांना अवघड झाले आहे. यापूर्वी देखील मंडळ प्रशासनास कोणतेही योग्य कारण न देता बंद करणेत आलेल्या सर्व योजना पूर्ववत सुरु करणेबाबत पत्रव्यवहार व प्रत्यक्ष सकारात्मक चर्चा देखील केलेल्या आहेत. सदर पत्रव्यवहारांच्या अनुसंगाने सध्याच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती व गंभीर स्वरूप आजार या योजनांच्या निधीमध्ये पाच पट वाढ करावी. तसेच सध्या बंद असलेल्या अनेक योजना पूर्ववत सुरु कराव्यात, यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रशासनास योग्य ते आदेश पारित करावेत, अशा आशयाचे लेखी निवेदन राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उप मुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री मा. सुरेश खाडे, प्रधान सचिव व मंडळाचे कल्याण आयुक्त मा. रविराज इळवे यांना पाठविले असलेचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी भगवान माने, संजय सासणे, सुभाष पाटील, महादेव चक्के, संभाजी थोरात, अनिता काळे, शिवाजी चौगुले, सुरेश पोवार, बाळासाहेब कांबळे, श्रीकांत पाटील, रमेश तळसकर, मुनीर मुल्ला आदी. मान्यवर उपस्थित होते.