रक्षाबंधन विशेष
क्रिकेटच्या रणांगणावर लढलेल्या बहिण – भावाच्या जोडया !
![]()
रक्षाबंधन विशेष
क्रिकेटच्या रणांगणावर लढलेल्या बहिण – भावाच्या जोडया !

क्रिकेट हा खेळ किती मनोरंजक आहे हे आपणा सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. क्रिकेटच्या मैदानावर घडणाऱ्या अनेक चमत्कारीक घटना आपल्या सर्वांना क्रिकेटच्या मैदानावर ओढून नेतात. अगदी खुर्चीला खिळवून ठेवतात. क्रिकेट खेळ हा राजकारणासारखा फारसे घराणेशाहीला थारा देत नाही. एखाद्या नामवंत यशस्वी क्रिकेटपटूचा मुलगा क्रिकेट मध्ये यशस्वी होईलच याची कोणी शाश्वती देऊच शकत नाही. क्रिकेटच्या इतिहासात क्रिकेटचा वारसा लाभलेली काही कुटुंबे आहेत. याच पैकी सख्ख्या भावांच्या, जुळ्या भावांच्या जोडया आपण आंतरराष्ट्रीय पटलावर खेळताना बघितल्या आहेत. तसेच काही पिता - पुत्रांच्या जोडयाही आपण बघितल्या आहेत. मात्र येथे आज आपणास रक्षाबंधानाच्या सणानिमित्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या काही बहीण -भावाच्या जोड्यांचा परिचय आपणास करून देणार आहोत. ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेटपटू टेरी अल्डरमन व त्याची बहीण डेनिस अल्डरमन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे. ऑस्ट्रेलियाचा धारदार वेगवान गोलंदाज असलेला टेरी सतत हसतमुख असायचा म्हणून त्याचे सहकारी खेळाडू त्याला “स्माइलींग असेसिंन” म्हणून पुकारायचे. टेरीच्या नावावर एक अनोखा विक्रम असून तो अजून जगातला कोणताच गोलंदाज मोडू शकला नाही. कसोटी क्रिकेटच्या दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये ४० पेक्षा अधिक बळी घेणारा तो जगातला आतापर्यंतचा एकटाच गोलंदाज आहे. टेरी अल्डरमन पेक्षा चार वर्षांनी छोटी असलेली त्याची बहिण डेनिस अल्डरमन एक फलंदाज होती. तिने ७ महिला कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये तिने ४१.२७ सरासरीने ४५४ धावा केल्या आहेत. डेनिसने पुढे जात कसोटी पंच रॉस इमर्सनशी लग्न केले. टेरी व डेनिस या दोघांच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. तो म्हणजे ३ फेब्रुवारी १९८५ मध्ये टेरीने वाका स्टेडियममध्ये श्रीलंकेविरूद्ध सामना खेळला, तर डेनिसने मेलबर्न येथे इंग्लंड महिला संघाविरुद्ध सामना खेळला. त्यामुळे एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी ती जगातली पहिली बहीण - भावाची जोडी ठरली. न्युझिलंडची पीटर मॅकग्लाशन व सारा मॅकग्लाशन ही बहिण -भावाची जोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. त्यापैकी पीटरची कारकीर्द अल्प स्वरूपातच मर्यादित राहिली. पीटर न्यूझीलंडकडून ४ वनडे आणि ११ टी २० सामने खेळला. तर सारा भारतीय महिला आणि इंग्लंडच्या महिला संघा विरुद्ध २ महिला कसोटी सामने खेळली. तसेच तिने १३४ वनडे आणि ७६ टी-२० सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. नॅथन एस्टल न्यूझिलंडच्या यशस्वी व सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. त्याची विस्फोटक फलंदाज म्हणून मोठी ख्याती होती व उपयुक्त गोलंदाज म्हणून तो न्युझिलंडसाठी कायम मदतीला धावायचा. न्यूझिलंडसाठी नॅथनने ८१ कसोटी, २२३ वनडे आणि ४ टी २० सामने खेळला. परंतु त्याची बहीण लिसा एस्टल हिला आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ एकच वनडे सामना खेळायला मिळाला . लिसा सन १९९३ च्या महिला विश्वचषकातील डेन्मार्क महिला विरुद्ध हा वनडे सामना खेळली. स्कॉटलंडच्या सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक गॉर्डन ड्रममंडने आजवर ४७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने एक फलंदाज आणि मध्यमगती वेगवान गोलंदाज म्हणून चांगलाच नावलौकिक मिळविला आहे. त्याने स्कॉटलंडचे कर्णधारपदही भूषविले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची बहीण अॅनेटने पाच सामन्यात स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. आयर्लंडचे जॉयस कुटुंब हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक चमत्कारीक कुटुंब आहे. या घरातले तीन मुले व दोन मुली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. गुस, एड व डोम हे सख्खे भाऊ होते तर सेलेशिया आणि इसोबेल जॉयस या त्यांच्या दोन बहीणी होत्या. या पाचपैकी सर्वात ज्येष्ठ गुस जॉयस २००० मध्ये आयर्लंडकडून इंग्लंडविरुद्ध खेळला, परंतु दुर्दैवाने आयर्लंडला त्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला नव्हता. तर एड जॉयसने आयर्लंड व इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. एड जॉयसने प्रथम इंग्लंडकडून आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले आणि नंतर तो आयर्लंडमध्ये परत गेला व पुन्हा आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला डोम जॉयसची कारकीर्द छोटी होती. विशेष म्हणजे त्याने आयर्लंडकडून इंग्लंडविरूध्द आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्याच सामन्यात एडने इंग्लंडकडून आयर्लंड विरूध्द वनडेचा श्रीगणेशा केला. आयर्लंडच्या महिलांना कसोटीचा दर्जा मिळाल्यामुळे कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व करणारी इसोबेल ही जॉयस या कुटुंबातील एकमेव खेळाडू ठरली. तिने सन २००० मध्ये पाकिस्तानच्या महिला संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळताना दुसऱ्या डावात २१ धावात ६ गडी बाद केले होते. तिला पहिल्या डावात गोलंदाजी मिळाली नव्हती आणि ती फलंदाजीही करू शकली नाही. इसोबेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७९ वनडे आणि ५५ टी २० सामनेही खेळले आहेत. तिची जुळी बहीण सेलेशियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५७ वनडे आणि ४३ टी२० सामने खेळले आहेत. त्यांची आई मॉरीन ही दोन महिला वनडे सामन्यांमध्ये स्कोअरर होती.
लेखक –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

